• Download App
    CM Fadnavis विरोधकांनी चहापानावर बहिष्काराची परंपरा पाळली; मुख्यमंत्री फडणवीसांनी भास्कर जाधवांसह वडेट्टीवारांचाही घेतला समाचार

    विरोधकांनी चहापानावर बहिष्काराची परंपरा पाळली; मुख्यमंत्री फडणवीसांनी भास्कर जाधवांसह वडेट्टीवारांचाही घेतला समाचार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांनी या चहापानच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला असे म्हणत खोचक टोला लगावला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

    देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने चहापानाचा कार्यक्रम होता आणि विरोधी पक्षाने परंपरा पाळत बहिष्कार टाकला, त्यामुळे आम्हाला आमचा चहा प्यावा लागला. आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशाजनक आणि त्रागा करणारी होती. खरे म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गमती झाल्या. भास्कर जाधव यांनी विजय वडेट्टीवार यांच्या मइकची बॅटरी बंद केली. भास्कर जाधव यांना अजून एक उपरती झाली की कॉंग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होती. होतीच म्हणाले ते आहे असे नाही म्हणाले, त्यामुळे त्यांना वस्तुस्थिती माहित आहे. तसेच शरद पवार गटाची त्यांच्या पत्रकावर नाहीये.

    महाराष्ट्र दिवाळखोर नाही

    पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विजय वडेट्टीवार एकदम जोरात होते त्यांनी विदर्भावर भाष्य केले. मला त्यांना सांगायचे आहे की 2014 पूर्वीचा आणि त्यानंतरचा विदर्भ त्यांनी बघावा. त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो. आताच गडचिरोली जिल्हा आणि पूर्वीचा जिल्हा जर त्यांनी बघितला तर त्यांनाही लक्षात येईल. एकूण आपण बघितले तर विरोधकांनी सरकारवर अनेक मुद्यांवरून टीका केली आहे. राज्य दिवाळखोर झाले असे दाखवण्याची घाई त्यांना झालेली आहे. पण मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की, राज्याची आर्थिक परिस्थिती जरी ओढाताणीची असली तरी राज्य कुठेही दिवाळखोरी कडे जात नाहीये. किंबहुना देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये आजही सर्वा निकषांमध्ये चढणारी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्राची आहे.

    विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर देण्यास तयार

    शेतकऱ्यांच्याबाबतीत बोलायचे झाले तर 92 टक्के शेतकऱ्यांना मदत मिळाली आहे. 8 टक्के जे शेतकरी आहेत त्यांच्या केवायसीचा प्रश्न आम्ही सोडवत आहोत. त्यांना देखील आपण पैसे देणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत असे म्हणणे म्हणजे अभ्यास न करता केलेले विधान आहे. शेतकऱ्यांना आपण पूर्णपणे मदत दिलेली आहे. एकूणच या संपूर्ण अधिवेशनाच्या निमित्ताने या सर्व विषयांवर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

    विरोधकांनी विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्ष नेत्यांचा निर्णय हा सर्वस्वी माननीय अध्यक्ष महोदय आणि सभापती महोदयांच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. खरे म्हणजे मुळातच मला असे वाटते की आत्ताचा विरोधी पक्ष हा दिशाहीन आहे. मुद्दे सुद्धा नाहीत आणि मुद्दे रेटण्यासाठी सुद्धा त्यांची इच्छा शक्ती देखील विरोधी पक्षात दिसत नाही. नागपूरच्या अधिवेशनात शेवटी आम्ही जे कामकाज करतो ते दुप्पट होते. त्यामुळे कामकाजाचे तास कुठेही कमी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



    18 विधेयक या अधिवेशनात मांडणार

    या पत्रकार परिषदेत अजित पवार उपस्थित नव्हते यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार बहरीनवरून आत्ताच ते इकडे लँड झाले असल्याने ते इथे येऊ शकले नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच 18 विधेयक आम्ही या अधिवेशनात मांडणार आहोत आणि या विधेयकांवर चर्चा करून ही विधेयक मंजूर व्हावीत असा आमचा प्रयत्न असणार आहे, असे फडणवीस म्हणाले.

    पायऱ्यांवर स्टंट मारण्यातच विरोधकांना धन्यता वाटते- एकनाथ शिंदे

    एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी अतिशय विस्तृतपणे आपल्यासमोर चर्चा केली आहे. महायुती सरकारचे साडे तीन वर्ष होत आहेत. दुसऱ्या इनिंगचे हे दुसरे अधिवेशन आहे. कालावधी कमी असला तरी विदर्भच्या प्रश्नांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. विरोधकांनी विदर्भावर चर्चा घडवली पाहिजे. चहापानाच्या कार्यक्रमावर तर त्यांनी बहिष्कार टाकलाच आहे. पहिल्या इंनिंगमध्ये विरोधक फार जोरात होते. सभागृहात कमी आणि बाहेर जास्त बोलत होते. आमची एवढीच भूमिका आहे की हे अधिवेशन जनतेच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी असते, विरोधकांना यात फारसे स्वारस्य राहिले नाही. पायऱ्यांवर स्टंट मारण्यातच त्यांना धन्यता वाटते. आताचा विरोधी पक्ष अतिशय निष्प्रभ दिसत आहे. त्यांची अवस्था जी आपण पाहत आहोत, त्यांचे नेते सगळे घरात आणि कार्यकर्ते वाऱ्यावर होते.

    संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा

    पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधी पक्ष या अधिवेशनात किती विदर्भचे प्रश्न उपस्थित करतो माहित नाही. पण सरकार सगळ्या प्रश्नांवर चर्चा करण्यास तयार आहे. जरी विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी आम्ही त्यांना गांभीर्यानेच घेऊ. त्यांचा एकच मुद्दा सुरू आहे की विरोधी पक्ष नेता का दिला नाही? लोकांनीच त्यांना झिडकारले आहे, त्यांची संख्याबळ कमी आहे. त्यामुळे संख्याबळ वाढवा आणि विरोधी पक्ष नेता मिळवा. अडीच वर्षात जे महायुतीने काम केले त्याची फलश्रुती विधानसभेच्या निवडणुकीत मिळाले आहे. आम्ही एक टीम म्हणून काम करत आहोत.

    विरोधी पक्षाकडून आमची एकच अपेक्षा आहे की त्यांनी लोकांचे प्रश्न मांडावे. लोकांचे प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेते पदावरच सवाल करतात. आम्ही विकासाचे काम पुढे नेत आहोत. आता ते म्हणतात उपमुख्यमंत्री पद घटनाबाह्य आहे. आधी मी मुख्यमंत्री होतो तेव्हा सुद्धा हेच म्हणत होते. थोडा अभ्यास करून बोलले पाहिजे. एकनाथ शिंदे कामातून उत्तर देत आहे. लोकांनी कामांना पोचपावती दिली आहे. आम्ही घरी बसत नाही. त्यांनी याचे आत्मचिंतन करावे आणि आत्मपरीक्षण केले पाहिजे. आधी अधिवेशनाला पूर्ण वेळ बसा आणि मग बोला, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

    CM Fadnavis Taunts Opposition Tea Boycott Bhaskar Jadhav Vadettiwar Winter Session Photos Videos Report

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना अटक; 30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप, पोलिसांनी मेहुणीच्या घरातून पकडले

    ही त्यांची जुनी पोटदुखी; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार, महाविकास आघाडीवरही साधला निशाणा

    संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!!