प्रतिनिधी
नागपूर : सीमा प्रश्न संदर्भात गेले काही दिवस शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे – फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीसह त्यांच्या जुन्या सगळ्या सरकारांचा इतिहासच काढला. गेल्या 60 वर्षात केंद्रात महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काँग्रेस आणि त्यांच्याच विचारांचे सरकार असताना सीमा प्रश्न त्यांनी सोडवला नाही आणि शिंदे – फडणवीस सरकार येऊन फक्त 6 महिने झाले, तर आमच्याकडून सीमा प्रश्न तातडीने सोडवण्याच्या अपेक्षा करतात, असा टोला एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस – राष्ट्रवादीला लगावला. CM Eknath Shinde targets past Congress NCP governments over belgam boundary issue also pinched Uddhav Thackeray
त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांची नावे घेऊन त्यांना चिमटे काढले. शिंदे – फडणवीस सरकार आल्यानंतर पहिल्या 6 महिन्यांतच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन त्यांना सीमा प्रश्नी हस्तक्षेप करायला लावला. पण पंडित नेहरू पंतप्रधान होते. मुंबई महाराष्ट्रात सामील करण्याच्या मुद्द्यावर त्यावेळचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी राजीनामा दिला होता. मुंबई सहज महाराष्ट्राला मिळाली नाही. त्यावेळी 106 लोकांना हुतात्मे व्हावे लागले पण ती आंदोलने कोणी केली?, याचे भान काँग्रेसने ठेवावे, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सुनावले.
त्यावेळी केंद्रात कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सरकारे होती. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री होते. पण कधीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यशवंतराव चव्हाणांकडे जाऊन सीमा प्रश्नावर बैठक घेण्याची गळ घातली नाही. त्यावेळी सीमा प्रश्न सोडवला नाही. 1978 मध्ये शरद पवार पुलोदचे मुख्यमंत्री बनले. ते कसे मुख्यमंत्री बनले या विषयात मी जाणार नाही. तेव्हा देखील यशवंतराव चव्हाण गृहमंत्री होते. पण शरद पवार त्यांच्याकडे सीमा प्रश्न घेऊन गेले नव्हते, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
सीमा प्रश्नावर या एकनाथ शिंदेने लाठ्या काठ्या खाल्ल्यात. तुरुंगवास भोगला. पण आता काही पोपट पिंजऱ्यातून बाहेर येऊन माझ्यावर बोलतायेत. मलाही खूप बोलता येईल. पण मी मर्यादा पाळतो. सीमा पाळतो. ओलांडत नाही म्हणून बोलत नाही. पण जेव्हा बोलायचे तेव्हा नक्की बोलेन, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
सीमा प्रश्नसंदर्भात 2006 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना आर. आर. पाटील गृहमंत्री होते तेव्हा नर्सिंग पाटलांनी सीमा प्रश्नावर सरकार गंभीर नाही, असे भर विधानसभेत सांगितले होते. त्यावेळी सरकारने काय केले?, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.
महाराष्ट्रात लागू असलेल्या सर्व योजना या बेळगाव, कारवार, निपाणी सह 856 गावांना लागू असतील. त्यात कोणतीही कसूर ठेवणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.
CM Eknath Shinde targets past Congress NCP governments over belgam boundary issue also pinched Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या