• Download App
    BJP corners Ajit Pawar in Pune and PCMC पुण्यात भाजपने लावली यंत्रणा कामाला; पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगेंना मुख्यमंत्र्यांचे "बळ"; दोन्हीकडे अजितदादा "कॉर्नर"!!

    पुण्यात भाजपने लावली यंत्रणा कामाला; पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगेंना मुख्यमंत्र्यांचे “बळ”; दोन्हीकडे अजितदादा “कॉर्नर”!!

    Ajit Pawar

    नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करून आपले सगळे बळ तिथे एकवटले खरे, पण त्यामुळे भाजपला इतर 27 महापालिकांमध्ये पूर्ण मोकळे रान मिळाले. ठाकरे बंधू मुळातच विरोधात गेल्यामुळे भाजपला मुंबईत एकनाथ शिंदे यांची साथ मिळाली आणि तिथे ठाकरे बंधूंना जखडून ठेवण्यात भाजपा यशस्वी झाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर भाजपला टार्गेट करणार त्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर द्यावे लागणार याची जाणीव भाजपच्या नेत्यांना होतीच त्यानुसार देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण, चंद्रकांतदादा पाटील, आशिष शेलार, अमित साटम या नेत्यांनी तशी तयारी केली होती ती तयारी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत उपयोगी ठरली.BJP corners Ajit Pawar in Pune and PCMC

    – अजितदादांनी पाळला नाही महायुतीचा धर्म

    महापालिका निवडणुकांच्या सुरुवातीलाच महायुतीतल्या घटक पक्षांनी शक्यतो एकत्र निवडणुका लढवायच्या गरज पडल्यास वेगवेगळ्या निवडणुका लढवायच्या, पण एकमेकांविरुद्ध टीका करायची नाही असे ठरविले होते ते भाजपच्या नेत्यांनी सुरुवातीला व्यवस्थित पाळले एकनाथ शिंदे यांच्या एक दोन नेत्यांचा अपवाद वगळता स्वतः एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा तेच पथ्य पाळले, पण अजित पवारांनी मात्र ते राजकीय पथ्य पाळले नाही. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये भाजपवरच भ्रष्टाचारी पक्ष म्हणून टीका करून भाजपला घेरले आणि तिथेच अजितदादा फसले



    भाजपच्या राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये स्थानिक नेत्यांना व्यवस्थित बळ दिले. पुण्यात मुरलीधर मोहोळ आणि पिंपरी चिंचवड मध्ये महेश लांडगे यांना चेहरा बनविले आणि त्या दोघांनी व्यवस्थित अजितदादांना टार्गेट केले.

    – अख्ख्या पवार फॅमिली ला उतरावे लागले प्रचारात

    अजितदादांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणच्या बळावर भाजपशी टक्कर घ्यायचा डाव खेळला. त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये ठाण मांडले अख्खी पवार फॅमिली प्रचारात उतरवली. रोहित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांना प्रचार करायला लावला. बैठका घ्यायला लावल्या. त्यामुळे पवारांची ताकद पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकवटल्याचे चित्र निर्माण झाले आणि अजितदादांनी त्याच्या पुढचा डाव खेळत पुण्याच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात मोफत बस सेवा आणि मोफत मेट्रो सेवेचा “राजकीय बॉम्ब” फोडला. त्यामुळे पुण्याचे आणि पिंपरी चिंचवडचे राजकीय चित्र फिरले आणि ते एकदम अजितदारांच्या बाजूने झुकले, अशी वातावरण निर्मिती मराठी माध्यमांनी केली. “अजितदादांचा “गेमचेंजर” जाहीरनामा”, “अजितदादांनी डाव टाकला” अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या.

    पण मोफत मेट्रो हा विषय अजितदादांचा घासच नाही. कारण तसं होणारच नाही महामेट्रो ही स्वतंत्र कंपनी आहे आणि तिच्या नाड्या राज्य आणि केंद्र सरकारच्या हातात आहेत याची जाणीव चंद्रकांतदादा पाटलांनी अजितदादांना करून दिली. त्यामुळे अजितदादांनी फुगवलेला मोफत मेट्रो प्रवासाचा फुगा एकाच दिवसात फुटला.

    – भाजपची यंत्रणा फुल ऍक्टिव्हेट

    पण अजितदादांनी केलेल्या गेममुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्ते जास्त सावध झाले. त्यांनी गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये सगळी यंत्रणा पुन्हा ऍक्टिव्हेट केली. प्रचाराची नवी स्ट्रॅटेजी आखली घराघरांमध्ये कार्यकर्ते पोचविले. प्रत्येक प्रभाग आणि प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक उमेदवार यांचा आढावा राज्यस्तरावरच्या नेत्यांनी घेतला. जिथे जी गोष्ट कमी पडली तिथे ती ताबडतोब पुरविली गेली. कुठेही यंत्रणांचा ढिलेपणा असेल तर तो ठीक केला गेला त्यामुळे गेल्या दोन दिवसांमध्ये भाजपने पुन्हा आपल्या टार्गेट नुसार प्रचारात आघाडी घेतली. अजितदादांनी माध्यमांच्या द्वारे फुगवलेला फुगा भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी फोडला. अजितदादांनी महायुतीचा धर्म पाळला नाही. त्यांनी भाजपवर टीका केली हे बरोबर केले नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी करून अजितदादांपर्यंत व्यवस्थित इशारा पोहोचविला. मी चुका दाखवून दिल्या म्हणजे युतीधर्म पाळला नाही का??, असा सवाल अजितदादांनी केला, पण फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा परिणाम भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आक्रमकपणा भरण्यात झाला.

    – महेश लांडगे यांच्या मदतीला गोपीचंद पडळकर

    त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक मधून आणि भोसरी मधून कार्यकर्त्यांमध्ये जोश भरला. आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका जिंकायच्या आहेत. आपल्याला कोणाची मदत घ्यायची नाही, हा “मेसेज” फडणवीसांनी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचविला. याचा परिणाम कार्यकर्त्यांवर झाला. फडणवीसांनी भोसरी मध्ये रोड शो घेतलाच. त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांना सुद्धा महेश लांडगे यांच्या मदतीला पाठविले. त्यामुळे महेश लांडगे यांनी अजितदादांच्या विरोधात केलेल्या प्रचाराला आणखी धार चढली. एका बाजूला पवार परिवाराने एकवटून महेश लांडगे यांच्यावर हल्ला केला, तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस यांनी महेश लांडगे यांना व्यवस्थित बळ देऊन गोपीचंद पडळकर यांना त्यांच्या मदतीला पाठवून पवार परिवाराला काटशह दिला. भाजपने या सगळ्या खेळीतून अजितदादांना सुरुवातीला पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये “कॉर्नर” केले. त्यातही अजितदादांना पुन्हा पिंपरी चिंचवड मध्ये अडकवण्यात भाजपचे नेते निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात सुद्धा यशस्वी झाले.

    BJP corners Ajit Pawar in Pune and PCMC

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांचा तुतारीवाला डाव्या हाताला ठेवून राज ठाकरेंचा गौतम अदानींवर हल्लाबोल!!

    नको बारामती, नको भानामती; पिंपरी चिंचवड मध्ये आठवण पार्थच्या पराभवाची!!

    दादा – ताईंच्या ऐक्यात प्रफुल्ल पटेलांची पाचर; केंद्रातल्या सत्तेच्या खुर्चीसाठी “पवार संस्कारितांची” तडफड!!