विशेष प्रतिनिधी
पुणे : CM Devendra Fadnavis बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर देवस्थानाच्या विकासकामांना वेग आला असून पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी येथील सुमारे 90 टक्के कामे पूर्ण होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी हा दावा केला.CM Devendra Fadnavis
मुख्यमंत्री म्हणाले की, भीमाशंकरचा विकास केवळ मंदिरापुरता मर्यादित नसून संपूर्ण परिसराचे नियोजनबद्ध रूपांतर करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात भीमाशंकरला येणाऱ्या भाविकांची संख्या पाच ते दहा पटींनी वाढण्याची शक्यता आहे.CM Devendra Fadnavis
150 कुटुंबांचे पुनर्वसन; उभारणार नवे गाव
मंदिर परिसर विकासासाठी सुमारे 150 घरांचे स्थलांतर करण्यात येत आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा करत या सर्व कुटुंबांसाठी जवळच नवीन आणि आधुनिक सुविधा असलेले आदर्श गाव वसविण्यात येणार असल्याचे सांगितले.
“स्थलांतरित कुटुंबांना उत्तम जागा देऊन सुंदर गाव उभारले जाईल. भीमाशंकरला येणारे भाविक या गावालाही भेट देतील. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि ग्रामस्थांच्या उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील,” असे फडणवीस म्हणाले.
वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन भीमाशंकरमध्ये येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग विकसित करण्यात येत आहेत. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होणार आहे.
तसेच ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग भाविकांसाठी पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्थानिक दुकानदारांचे पुनर्वसन करून त्यांची दुकाने नियोजनबद्ध पद्धतीने उभारली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
महाकाल कॉरिडॉरपेक्षा वेगळा असेल भीमाशंकर विकास आराखडा
उज्जैनच्या महाकाल कॉरिडॉरशी तुलना होत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी भीमाशंकरचा विकास आराखडा पूर्णपणे वेगळा असल्याचे सांगितले.
“महाकाल कॉरिडॉर शहरामध्ये आहे, मात्र भीमाशंकर हे जंगल, जैवविविधता आणि अभयारण्याने वेढलेले क्षेत्र आहे. त्यामुळे येथे कोणत्याही प्रकारे निसर्गाला धक्का न लावता विकास करण्यात येत आहे. उलट जैवविविधता आणि वनसंपदेचे संवर्धन करत हा परिसर विकसित केला जाईल,” असे ते म्हणाले.
त्यांनी पुढे सांगितले की, हा प्रकल्प धार्मिक पर्यटनाबरोबरच निसर्ग पर्यटनालाही चालना देणारा ठरेल. त्यामुळे भीमाशंकर परिसराला ‘नैसर्गिक कॉरिडॉर’ म्हणून विकसित करण्याचा सरकारचा मानस आहे.
कुंभमेळ्यापूर्वी कामांना गती
पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणांनी अत्यंत वेगाने आणि दर्जेदार काम केल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांचे कौतुक केले.
भीमाशंकराच्या चरणी पावसासाठी प्रार्थना
यंदा अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पावसाबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “राज्यावर कोणतेही पाणी संकट येऊ नये आणि राज्यात चांगला पाऊस पडावा, यासाठी भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना केली आहे.”
भाविकांसाठी मोठा बदल
भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखडा पूर्ण झाल्यानंतर भाविकांना अधिक प्रशस्त सुविधा, सुरळीत दर्शन व्यवस्था, वाहतूक कोंडीमुक्त परिसर आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा अनुभव मिळणार आहे. त्याचबरोबर स्थानिक ग्रामस्थांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासालाही या प्रकल्पामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Bhimashankar Temple Development: CM Devendra Fadnavis Announces Model Village Before Kumbh Mela
महत्वाच्या बातम्या
- FSSAI : मैगीवर पुन्हा प्रश्नचिन्ह? कीडे आढळल्याच्या तक्रारीनंतर FSSAI ची नेस्लेला नोटीस; KFC आणि फ्लिपकार्टकडूनही मागवला खुलासा
- Donald Trump : ट्रम्प यांच्या एका निर्णयाने नेतान्याहू चक्रावले? इराणबाबत अमेरिकेची नवी भूमिका; पश्चिम आशियात मोठ्या घडामोडी
- Elon Musk : इलॉन मस्क ठरले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’; स्पेसएक्समुळे संपत्तीत विक्रमी झेप, संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल!
- मोदींची तुलना नेहरूंबरोबर नकोच; पण पवारांची तुलना कुणाबरोबर करता येईल??