वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. त्यामुळे या परिस्थितीशी सामना करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अतिरिक्त मनुष्यबळ देण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी घेतला आहे. यानुसार 5200 वैद्यकीय अधिकारी आणि 15 हजार नर्सेस तातडीने उपलब्ध करुन देणे शक्य होणार आहे. 5200 medical officers, 15 thousand nurses will be made available immediately
राज्यातील शेवटच्या वर्षात वैद्यकीय पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षा 20 एप्रिलला संपणार आहे. या परीक्षेचा निकाल तातडीने लावून त्यांच्या सेवा इंटर्नशीपसाठी देण्यात येणार आहेत. यामुळे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त स्वरुपात डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती अमित देशमुख यांनी दिली.
राज्यातील नर्सिंग कॉलेजमधील जीएनएम आणि एएनएम हा अभ्यासक्रम आणि इंटर्नशीप पूर्ण झालेल्या 15 हजार नर्सेसच्या रजिस्ट्रेशनचे काम तातडीने पूर्ण करुन त्यांच्या सेवाही आरोग्यसेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या नर्सेसेच्या सेवा जिल्ह्यात कंत्राटी तत्वावर देण्यात येतील.