- एनसीआयतर्फे सर्व ती मदत करणार
- म्युकरमायकोसिसच्या नागपुरातील स्थितीचा सुद्धा घेतला आढावा
वृत्तसंस्था
नागपूर : कोरोना विषाणूच्या तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेता नागपुरात लहान बालकांसाठी 200 खाटांचे रूग्णालय सुसज्ज ठेवावे, अशी सूचना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेला करतानाच यासाठी आवश्यक ती सर्व मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटतर्फे करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी दिली. याशिवाय, म्युकरमायकोसिसच्या स्थितीचा सुद्धा त्यांनी या बैठकीतून आढावा घेतला. 200-bed hospital for children in Nagpur
देवेंद्र फडणवीस यांनी आज एक बैठक नागपूर महापालिकेचे अधिकारी, महापौर आणि अन्य लोकप्रतिनिधींसोबत नागपूर महापालिकेत घेतली. महापालिका आयुक्त, महापौर दयाशंकर तिवारी, आ. प्रवीण दटके, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्ता पक्षनेते अविनाश ठाकरे आणि इतरही यावेळी उपस्थित होते.
संभाव्य तिसर्या लाटेची शक्यता विचारात घेता काय उपाययोजना केल्या आहेत आणि आणखी काय करता येईल, याबाबत सुद्धा सविस्तर चर्चा यावेळी झाली. पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महापालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी 200 खाटांचे एक रूग्णालय तातडीने उभारण्यात यावे, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि यासाठी लागणारी सर्व ती मदत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या वतीने करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे रूग्णालय उभारताना विविध वयोगट विचारात घेण्यात यावेत. अगदी लहान बालके असल्यास त्यांच्या पालकांची व्यवस्था सुद्धा करावी लागेल. प्रत्येक वयोगटाच्या विविध गरजा लक्षात घेऊन याची रचना करावे लागेल, असे सांगताना त्यांनी अनेक उपयुक्त सूचना केल्या.
म्युकरमायकोसिस रूग्णांची नागपुरातील स्थिती, त्यासाठी केलेल्या उपाययोजना आणि संभाव्य तिसरी लाट विचारात घेता हाती घ्यावयाच्या उपाययोजना इत्यादींबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत झाली. म्युकरमायकोसिसच्या रूग्णांचे स्क्रिनिंग लवकर व्हावे, म्हणजे वेळेत उपचार करून त्या रूग्णाला लवकर दिलासा मिळेल, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. कॉल सेंटरची स्थापना करून स्क्रिनिंगची आणि वेळेत उपचारांची योग्य स्ट्रॅटजी तयार करण्यात यावी, अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला. पुरेशा प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध करून देत यासाठी ऑपरेशन थिएटर्सची संख्या वाढविण्याचा निर्णय सुद्धा यावेळी घेण्यात आला.
दरम्यान, यापूर्वी आज सकाळी नागपूर जिल्हा परिषदेतील भाजपा सदस्यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी भेट घेऊन ग्रामीण भागातील कोरोना स्थिती आणि इतरही विविध विषयांवर चर्चा केली. आ. समीर मेघे, टेकचंद सावरकर आणि इतर यावेळी उपस्थित होते.