संघ परिवाराशी संबंधित लोकप्रतिनिधींनी गाय किंवा गोमुत्राचे कौतुक केले तर त्याकडे विशेष कोणाचे लक्ष जात नाही. परंतु, कॉंग्रेसमधल्या आणि त्यातही सोनिया गांधी यांच्याशी एकनिष्ठ असणाऱ्या आणि त्यातही पुन्हा स्वतः कॅथॉलिक ख्रिश्चन असणाऱ्या ऑस्कर फर्नांडिस हेच जेव्हा गोमुत्राचे कौतुक थेट राज्यसभेत गाऊ लागतात, तेव्हा स्वाभाविकपणे सगळ्यांचेच कान टवकारले गेले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि खासदार ऑस्कर फर्नांडिस यांनी गोमुत्राचे गुणगान गायले. एवढेच नव्हे तर गोमुत्राचे नियमित सेवन करुन कर्करोगावर मात करणाऱ्या एका मनुष्याची यशोगाथाही त्यांनी कथन केली. विशेष म्हणजे मी गोमुत्रावर बोलत असताना माझे स्नेही जयराम रमेश माझे पाय खेचत होते, हेही फर्नांडिस यांनी सांगून टाकले. होमिओपॅथी आणि भारतीय पारंपरिक औषधशास्त्रावर राष्ट्रीय आयोग नेमण्यासंदर्भातली चर्चा राज्यसभेत चालू होती. या चर्चेत भाग घेतला असता फर्नांडिस यांनी हे वक्तव्य केले.
फर्नांडिस म्हणाले, की मेरठजवळच्या एका आश्रमाला मी एकदा भेट दिली होती. त्यावेळी तेथील एका व्यक्तीने गोमुत्र प्यायल्याने कर्करोग बरा झाल्याचा दावा केला होता. गोमुत्र हा कर्करोगावरील इलाज असल्याचा दावा यापुर्वी भाजपाच्या अनेक नेत्यांनी केला असता कॉंग्रेस नेत्यांनी वेळोवेळी त्यावर यथेच्छ तोंडसुख घेतलेले आहे. फर्नांडिस यांनी पारंपरिक भारतीय औषध शास्त्राचेही यावेळी गुणगान गायले.
फर्नांडिस म्हणाले, की जेव्हा त्यांना गुडघेदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांधेरोपण शस्त्रक्रियेचा सल्ला दिला. मात्र मी त्यास नकार देत ‘वज्रासन’ करण्यास सुरुवात केली. योगसाधना करु लागलो आणि आता मी कोणत्याही वेदनेशिवाय कुस्तीदेखील खेळू शकतो.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीदेखील गुडघेदुखीच्या त्रासाने व्यथीत होते. याचा दाखला देत फर्नांडिस पुढे म्हणाले, ”वाजपेयी यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली, तेव्हा त्यांचा आणि माझा पूर्वीपासूनचा परिचय असता तर मी नक्कीच त्यांच्याकडे गेले असतो आणि त्यांना वज्रासन करण्याचा सल्ला दिला असता. त्यामुळे त्यांना पूर्ण आराम मिळाला असता.” अमेरिकेत असताना आपण एका 104 वर्षांच्या व्यक्तीला भेटलो आणि तो आरामशीरपणे तारुण्याकडे वाटचाल करत असल्याचाही दावा फर्नांडिस यांनी केला.
योग ही भारताची संपत्ती आहे. तुम्ही नियमितपणे योगसाधना करत असाल तर तुमचा आरोग्यावरचा खर्च पन्नास टक्क्यांनी कमी होऊ शकतो. योग ही जीवन जगण्याची पद्धती आहे, असे फर्नांडिस पुढे म्हणाले. त्यांनी सांगितले, की डॉक्टरांकडे जाण्याआधीच आपल्या पारंपरिक भारतीय उपचार पद्धतींमधून आपल्याला आराम मिळू शकतो.
प्रस्तावित विधेयकाला फर्नांडिस यांनी पाठिंबा दिला मात्र त्याचवेळी योग आणि निसर्गोपचार यांना या विधेयकातून वगळल्याबद्दल आक्षेपही घेतला. या विधेयकात सुधारणा करावी किंवा योग आणि निसर्गोपचारासंबंधी स्वतंत्र विधेयक आणण्याचे आश्वासन मंत्र्यांनी द्यावे, असी मागणी त्यांनी यावेळी केली.
कोण आहेत ऑस्कर फर्नांडिस?
ऑस्कर फर्नांडिस यांची ओळख आहे. कर्नाटकातील कट्टर कॅथॉलिक कुटुंबात जन्माला आलेले ऑस्कर फर्नांडिस हे गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणारे ज्येष्ठ कॉंग्रेसनेते आहेत. तरुणपणी ते चर्च कार्यात व्यस्त होते. राजीव गांधी यांचे संसदीय सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निकटवर्तियांमध्ये त्यांचा समावेश होतो. गांधी घराण्याचे विश्वासू सल्लागार म्हणून त्यांना कॉंग्रेसमध्ये मान दिला जातो. सन 1980 मध्ये ते कर्नाटकातील उडुपी येथून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर याच मतदारसंघातून ते चारवेळा खासदार झाले. 1998 मध्ये ते राज्यसभेवर गेले. पुन्हा 2004 मध्येही त्यांची राज्यसभेवर निवड झाली. डॉ. मनमोहनसिंह यांच्या सरकारमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. सध्याही ते राज्यसभेचे खासदार आहेत.