• Download App
    कोरोना तपासणीत 'मेक इन इंडिया' : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट | The Focus India

    कोरोना तपासणीत ‘मेक इन इंडिया’ : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट

    विशेष प्रतिनिधी
    पुणे : पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्स प्रा. लि. या कंपनीने कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी लागणारे अवघ्या सहा आठवड्यांमध्ये तयार केले आहे. सध्या कोरोनाच्या चाचणीसाठी लागणारी किट जर्मनीहून मागवली जात आहेत. मायलॅबने तयार केलेले हे  भारतातील पहिलेवहिले किट ठरले आहे. ‘मायलॅब पॅथोडिटेक्ट कोव्हिड-१९ क्वालिटेटिव्ह पीसीआर किट’ असे या किटचे नाव आहे. भारत सरकारच्या अन्न आणि औषध प्रशासनाची या किटला मान्यता मिळाली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचीही या किटला मंजुरी मिळाली आहे.
    राज्य आणि केंद्र सरकारच्या पाठिंब्याने, जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमांनुसार संपूर्णत: भारतीय बनावटीचे किट विकसित करण्यात यश मिळाले आहे. सध्या देश कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या सावटाखाली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर किट विकसित करण्यात मिळालेले यश महत्वाचे मानले जात आहे. या किटचे मूल्यमापन इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या माध्यमातून करण्यात आले.
    ‘नवीन तंत्रज्ञान भारतातील नागरिकांना परवडेल अशा दरात उपलब्ध व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कोरोना विषाणूची चाचणी पॉलिमरेज चेन रिअ‍ॅक्शन (पीसीआर) या तंत्रज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील संसर्गाचे निदानही सहजपणे करता येऊ शकते. आयसीएमआरमध्ये याच्या अचूकतेची चाचणी करण्यात आली आहे, अशी माहिती मायलॅबमधील वरिष्ठ सुत्रांनी दिली.
    सध्या भारतात सर्वात कमी प्रमानात कोरोनाच्या चाचण्या होत आहेत. १० लाख लोकसंख्येपैैकी साधारणपणे केवळ ७ लोकांचीच तपासणी केली जाते. साऊथ कोरिया, सिंगापूर यांसारख्या देशांमध्येही तपासणीचे प्रमाण भारताच्या तुलनेत खूप जास्त आहे. सध्या केंद्र सरकारकडून जर्मनीहून टेस्टिंग किट मागवल्या जातात. किटसाठी इतर देशांवर पूर्णपणे अवलंबून राहणे फारसे उपयुक्त नाही. विमानसेवा बंद केली असल्याने किट मागवण्यावरही मर्यादा येत आहेत. त्यामुळे भारतीय बनावटीच्या किट वापरणे सध्या संयुक्तिक ठरु शकेल. मायलॅबच्या सुत्रांच्या माहितीनुसार, एक आठवड्यामध्ये १ लाख किट तयार करता येऊ शकतात. एक किटच्या माध्यमातून १०० रुग्णांची तपासणी करता येऊ शकते. पीसीआर तंत्रज्ञान उपलब्ध असलेल्या प्रयोगशाळेमध्ये एका दिवसात १००० रुग्णांची चाचणी होऊ शकते

    Related posts

    कोरोना तपासणीत ‘मेक इन इंडिया’ : पुण्यातील कंपनीने केले चाचणीसाठीचे किट

    बॉम्बस्फोट करणारा फरार बांगला देशी मुंबईजवळ पकडला

    बॉम्बस्फोट करणारा फरार बांगला देशी मुंबईजवळ पकडला