विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशात राज्यपाल लालजी टंडन आणि मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यात घटनात्मक लढाई जुंपली असून उद्याच (ता. १७) विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देणारे पत्र राज्यपालांनी कमलनाथ यांना पाठविले आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समवेत २२ आमदारांनी बंड केल्यानंतर ता. १४ रोजी पत्र पाठवून राज्यपालांनी कमलनाथ यांना विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बहुमत सिद्ध करण्यास सांगितले होते. मात्र कमलनाथ यांनी कोरोना व्हायरसच्या फैलावाचे निमित्त करून विधानसभा अध्यक्षांकडून सभागृह २६ मार्चपर्यंत स्थगित करवून घेतले. त्यावर भाजपचे नेते शिवराजसिंह चौहान सुप्रिम कोर्टात गेले. तर राज्यपालांनीही कमलनाथ यांच्या राजकीय खेळीवर तीव्र आक्षेप नोंदवत त्यांना पुन्हा पत्र पाठवून घटनात्मक कारवाईचा इशाराही दिला आहे. त्यामुळे मध्य प्रदेशाचे राजकारण निर्णायक राजकीय टप्प्यावर आले आहे.