विशेष प्रतिनिधी
मुंबई – मुंबईत असणाऱ्या तीन हजारांहून अधिक अँम्ब्युलन्स चिनी विषाणूच्या साथीत गेल्या कुठे, या अँम्ब्युलन्स मालकांवर कोणाचा वरदहस्त आहे, असा संतप्त सवाल भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कोरोना माहामारीच्या या भयंकर संकटात मुंबईतील रुग्णांना रुग्णवाहिकेसाठी 5 ते 15 तासांपर्यंत वाट पाहावी लागत आहे. 20 मार्चपर्यंत मुंबई आरटीओकडे रजिस्टर असलेल्या 2920 खाजगी अँम्ब्युलन्स सेवा देत होत्या. पण संकटाच्या गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीतच त्या अचानक गायब झाल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला.
मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत ठाकरे सरकारने खाजगी अँम्ब्युलन्सच्या मालकांवर कारवाई का केली नाही, असा प्रश्न सोमय्या यांनी उपस्थित केला.
सोमय्या यांनी या संदर्भात 5 एप्रिलला आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवले होते. मात्र अद्यापही पेशंटला यासाठी झगडावे लागत आहे. दीड महिन्यानंतरही राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली नाही. 108 क्रमाकांच्या सेवेवर निव्वळ 93 रुग्णवाहिका सुमारे सव्वा कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहरासाठी सध्या कार्यरत आहे.
देशात आणि राज्यात असलेल्या मेडिकल इमर्जन्सी अंतर्गत महापालिका आणि राज्य सरकारने ब-यापैकी आपला वापर केला आहे. मग खाजगी रुग्णवाहिका मालिकांवर कारवाई का नाही याबाबत स्पष्टता असायला हवी, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.
मुंबईतील बहुसंख्य रुग्णालयांमधील कामगार संघटना आणि अँम्ब्युलन्स चालक-मालकांवर शिवसेनेचा वरचष्मा आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या लोकांना संकटकाळातसुद्धा वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. पण यामुळे मुंबईतल्या सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो आहे. सर्वसामान्यांना वेळेत उपचार न मिळण्याचा धोकाही यामुळे वाढला आहे.