- संरक्षण – व्यापार संबंधांची अमेरिकेकडून व्यूहात्मक जोडणी
विनय झोडगे
कोरोना नंतरच्या जगातही आपले आंतरराष्ट्रीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी अमेरिका चोहोबाजूंनी राजनैतिक प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोरोनानंतरच्या नव्या जगात भारताचे महत्त्व लक्षात घेऊन भारताला एका हाताने द्यायला आणि भारताकडून दुसऱ्या हाताने घ्यायला अमेरिका उत्सूक आहे. संरक्षण आणि व्यापार ही ती दोन क्षेत्रे आहेत, ज्याची राजनैतिक आणि व्यूहात्मक जोडणी अमेरिका करू इच्छित आहे.
चीन बरोबरच्या सीमा तंट्यात भारताच्या बाजूने उभे राहायची किंबहुना चीनला दटावायची अमेरिकेची तयारी आहे. पण त्याचवेळी भारताबरोबरच्या ट्रेड डीलला अमेरिका पुढे रेटण्याचा प्रयत्न करत आहे.
अमेरिकन मुत्सद्दी एलिस वेल्स यांची वक्तव्ये हा दिशा निर्देश करतात. आंतरराष्ट्रीय संघर्षात अमेरिका चीन विरोधातील धार तीव्र करेल. भारत – चीन सीमा तंटा, आग्नेय आशिया सामुद्रधुनीतील चीनचे वर्चस्व मोडण्यासाठी भारताची मदत घेईल.
लडाख, नेपाळमधून चीन ज्या भारत विरोधी कारवाया करेल, त्या विरोधात भारताला अमेरिका साथ देईल. पण त्याच वेळी अमेरिकेला भारताबरोबरचे ट्रेड डील पुढे रेटण्यात रस आहे. कोरोनामुळे खस्ता हालत झालेल्या अमेरिकन आंतरराष्ट्रीय व्यापाराला boost देण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग असल्याची अमेरिकेची धारणा आहे.
हे ट्रेड डील भारत – अमेरिका या दोन्ही देशांच्या मुत्सद्यांपुढे आव्हान बनले आहे. भारत अजूनही अनुदानाच्या जाळ्यातून आणि protectionism मधून कृषी, उद्योग आणि व्यापार या क्षेत्रांना बाहेर काढत नाही. या क्षेत्रांना जागतिक पटलावर मुक्त क्षेत्रात रूपांतरित करत नाही. खुल्या स्पर्धेला मोकळीक देत नाही. तो पर्यंत भारताने खऱ्या अर्थाने आर्थिक सुधारणा धोरण स्वीकारल्याचे दिसणार नाही.
उलट फक्त अमेरिकन हितसंबंध जपण्यासाठी भारत हा देशातील कृषी, उद्योग, व्यापार या क्षेत्रांना अमेरिकन व्याख्येनुसार मुक्त करणार नाही, अशी भारताची भूमिका आहे.
या दोन भूमिकांच्या bottle neck मध्ये ट्रेड डील अडले आहे. पण कोरोनानंतरच्या जगात दोन्ही देश आपापल्या भूमिका मवाळ करून ट्रेड डील पुढे नेतील आणि जागतिक व्यापारातला वाटाही वाढवतील, असे मानले जात आहे. फेब्रुवारी २०२० राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा दौरा झाला. त्यावेळी ट्रेड डील वर मान्यतेची मोहोर उमटेल असे मानले जात होते. पण डील negotiating table वरच अडकले.
आता कोरोनानंतरच्या परिस्थिती ज्यावेळी चीन आक्रमकपणे भारतावर व्यूहात्मक दबाव वाढवेल तेव्हा भारत – अमेरिका जवळ येतील. अमेरिका एका बाजूने भारताला मदत करेल आणि दुसऱ्या बाजूने ट्रेड डील साधण्याचा प्रयत्न करेल, असे आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात मानले जात आहे.