दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या इशाऱ्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी ट्विट करून जगाकडे गाऱ्हाणे मांडत साळसूदपणाचा आव आणला आहे.
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्याच्या भारताच्या इशाऱ्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच धास्तावले आहेत. त्यांनी ट्विट करून जगाकडे गाऱ्हाणे मांडत साळसूदपणाचा आव आणला आहे.
काश्मीरमधील हंदवाडामध्ये दोन दिवसात दोन वेगवेगळया घटनांमध्ये कर्नल, मेजरसह एकूण आठ जवान शहीद झाले. या दहशतवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा भारताने दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान चांगलेच घाबरले आहेत. इम्रान खान यांनी टि्वट करुन आपली चिंता व्यक्त केली आहे.
ते म्हणतात, सध्या तणावग्रस्त परिस्थिती आहे. तिचा फायदा घेत, घुसखोरी होत असल्याचा आरोप भारताकडून होण्याची शक्यता आहे. तसेच याच्या आडून भारत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाईचा बागुलबोवा उभा करण्याची शक्यता आहे. काश्मीरमधील अस्वस्थततेमागे पाकिस्तान आहे असा आरोप भारताने केल्यानंतर इम्रान खान यांनी हे टि्वट केले आहे.
सीमेपलीकडून दहशतवादी कारवाया पाकिस्तान करते हे उघड सत्य आहे. पाकिस्तानातील अनेक संघटना जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केल्या आहेत. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकविला होता. यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली होती.