विशेष प्रतिनिधी
चंदीगड : गेल्या २४ तासांमध्ये पंजाबात ३३० कोरोना पॉझिटिव्ह केसेस आढळल्यानंतर मुख्यमंत्री अमरिंदर सिंह आणि महाराष्ट्राचे मंत्री अशोक चव्हाण या दोन काँग्रेस नेत्यांमध्ये चांगलीच राजकीय जुगलबंदी जुंपल्याचे दिसून आले.
नांदेडच्या हुजूर साहेब गुरुद्वारातून पंजाबमध्ये परत आलेल्या ५०० जणांपैकी सुमारे २०० जणांची कोरोना चाचणी पंजाबमध्ये पोहोचल्यावर पॉझिटिव्ह निघाली. त्यावरून पंजाबचे काँग्रेस सरकार आणि महाराष्ट्राचे महाआघाडी सरकार यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले. महाराष्ट्र सरकारने नांदेडच्या हुजूर साहेबमध्ये अडकलेल्या भाविकांची चाचणीच घेतली नाही. त्यांना तसेच पंजाबमध्ये पाठवून दिले. त्यामुळे आमच्या राज्यात कोरोना वाढला, असा आरोप पंजाबचे आरोग्यमंत्री बलबीर सिध्दू यांनी केला. त्याला महाराष्ट्रचे मंत्री आणि नांदेडचे आमदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. भाविकांच्या तीन चाचण्या घेतल्या. त्या निगेटिव्ह आल्या होत्या, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. भाविकांना पंजाबमध्ये पोहोचल्यावर कोरोनाची लागण झाली असावी, असा दावा चव्हाण यांनी केला.
यावर पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आक्षेप घेत महाराष्ट्र शासन आणि प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला. कोरोनाचे स्वरूप लक्षात घेता एका दिवसात भाविक कसे काय पॉझिटिव्ह सापडू शकतील? सर्व भाविक दोनच दिवसांमध्ये पंजाबमध्ये पोहोचले आहेत. याचा अर्थ त्यांना महाराष्ट्रातच कोरोना लागण झाली होती. तेथे चाचण्या झाल्या असतील तर त्याचे रिपोर्ट चुकीचे होते असे म्हणावे लागेल, असा टोला अमरिंदर सिंग यांनी महाराष्ट्र सरकारला लगावला