कोरोनामुळे मृतांचा आकडा सांगताहेत ६९; प्रत्यक्षात कोरोना प्रोटोकॉलनुसार ३१४ मृतदेहांवर अंत्यसंस्कार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनाग्रस्तांचे आकडे लपविण्याचे प्रकार कोलकाता आणि मुंबईतून पुढे आल्यानंतर दिल्ली सरकारने या प्रकारात नंबर लावला आहे.
दिल्लीच्या सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील विविध रूग्णालयांमध्ये ६९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे, तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आखून दिलेल्या कोरोना प्रोटोकॉलनुसार ३१४ मृतांवर स्मशान आणि कब्रस्तानात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आकड्यातील ही तफावत मोठी आहेच. पण आकडे नेमके कोणत्या पातळीवर लपविले जाताहेत याचे गौडबंगाल वाढले आहे.
एम्स, राम मनोहर लोहिया रूग्णालय, राजीव गांधी रुग्णालय या प्रमुख हॉस्पिटलमधील मृतांचे आकडे वेगळी कहाणी सांगतात तर आईटीओ कब्रस्तान आणि निगमबोध घाट आणि पंजाबी बाग स्मशानभूमीतील आकडे वेगळी कहाणी सांगतात. हॉस्पिटलमधील सूत्र आणि स्मशानभूमीतील आणि कब्रस्तानातील कर्मचारी आपले आकडे अधिकृत असल्याचेच सांगतात.
निगमबोध घाटावर १५३, पंजाबी बाग स्मशानभूमीत ७२ मृतदेहांचे दहन; तर आईटीओ कब्रस्तानात ८९ मृतदेहांचे दफन करण्यात आल्याचे तेथील कर्मचारी सांगतात. हे सर्व अंत्यसंस्कार कोरोना प्रोटोकॉलनुसार झाल्याचीही कागदोपत्री अधिकृत नोंद आहे.
पण दिल्लीतील विविध रूग्णालयांमधील कोरोनाग्रस्त मृतांच्या आकड्याशी ते जुळत नाही. मृतांचा सरकारी आकडा ६८ आहे. आकड्यातील तफावती विषयी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन आणि पद्मिनी सिंघला यांना विचारणा केली तर त्यांनी फोन न उचलणे, मेसेजला उत्तर न देणे असले प्रकार चालविल्याने दिल्लीतील कोरोनाग्रस्त आणि मृत यांच्या आकड्यांविषयीचे गौडबंगाल कायम राहिले आहे.