विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : टाइट लॉकडाऊनच्या काळातील महसूसी तूट भरून काढण्यासाठी केजरीवाल सरकारने पेट्रोल मूल्यवर्धित करात (व्हॅट) ३ टक्क्यांनी तर डिझेलवरील व्हॅटमध्ये जवळपास दुपटीने वाढ केल्याने दिल्लीतील पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
पेट्रोलवर ३०% तर डिझेलवर २६% मूल्यवर्धित कर (VAT) लावल्याने पेट्रोलचे दर १.६७ रुपयांनी वाढून ७१.२६ रुपये तर डिझेलचे दर ७.१० रुपयांनी वाढून ६९.३९ रुपयांवर पोहोचले आहेत. लॉकडाऊनच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या मागणीत ६०% अधिक घट झाली आहे. पण लाॅकडाऊन टप्प्याटप्प्याने उठविण्यास सुरूवात झाल्याने इंधन गरज हळू हळू वाढण्याची चिन्हे आहेत.
दिल्ली सरकारने कालच दारूची दुकाने उघडल्याबरोबरच प्रचंड गर्दी झाल्याने दारूची दुकाने दोन तासांतच बंद करावी लागली. आता दारूवर ७० टक्के कर लावण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आहे. गर्दीला आळा आणि महसूलात भर असा उद्देश त्यामागे आहे.
लॉकडाऊनच्या नियमांमध्ये थोडी शिथिलता येताच महसूली तूट भरून काढण्याची दिल्ली सरकारची ही खटपट आहे.