• Download App
    इतर राज्यांचे उद्योगांना रेड कार्पेट, महाराष्ट्रात मात्र लाल फीत... | The Focus India

    इतर राज्यांचे उद्योगांना रेड कार्पेट, महाराष्ट्रात मात्र लाल फीत…

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : चीनी व्हायरसमुळे उद्योग ठप्प आहेत, अर्थव्यवस्था संकटात आहे. यावेळी गुजरात, उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात मात्र या अत्यंत महत्त्वाच्या विषयाला लाल फितीत का गुंडाळून ठेवताय? असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

    याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, जगातील औद्योगिक परिस्थिती विलक्षण बदलली असून संभाव्य मोठे बदल होणार हे लक्षात घेऊन गुजरात, उत्तर प्रदेश, कर्नाटक या सारख्या राज्यांनी तातडीने उद्योगांना रेड कार्पेट घालायला सुरुवात केली. कारण लॉकडाउन आणि चीनी व्हायरस याचा अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला असून प्रत्येक राज्यात त्यामुळे मोठी स्पर्धाच सुरु झाली आहे,” असं म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

    “चीनसारख्या देशातून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना आकर्षित करण्यास महाराष्ट्र उशिर का करत आहे? राज्याच्या अर्थकारण, रोजगार या दुष्टीने अत्यंत महत्त्वाच्या विषयाला केवळ एक समिती स्थापन करुन शासकीय लाल फितीत का गुंडाळून ठेवत आहे? तातडीने यावर कोणताही निर्णय का घेतला जात नाही?,” असे प्रश्न त्यांनी सरकारला केले आहेत.

    “केंद्र सरकारने या बदलत्या परिस्थितीनुसार तातडीने बदल आणि नवी धोरणे आखायला सुरुवात करताच उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक या राज्यांनी जुने कायदे बदलण्यात आघाडी घेतली. सध्याचे उद्योग टिकतील व नवे उद्योग आकर्षित होतील असे नवे धोरण व पोषक वातावरण तयार करण्यास सुरुवात केली,” असल्याचही त्यांनी सांगितलं.

    जगातील बदललेल्या औद्योगिक परिस्थितीत अन्य देशातील उद्योग आपल्या महाराष्ट्रात जास्तीतजास्त यावेत याचे धोरण तयार करण्यात महाराष्ट्राला उशिर का होतोय? चीनी व्हायरसशी संघर्ष करतानाच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या या विषयाकडे लक्ष द्या,असे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

    वास्तविक महाराष्ट्र हे औद्योगिक दुष्ट्या प्रगत राष्ट्र असून ओळखले जाते, अशावेळी महाराष्ट्र सर्वात आधी पुढाकार घेते. पण यावेळी महाराष्ट्राने याबाबत उशीर केला आहे. अन्य राज्यांनी रेड कार्पोरेट टाकल्यानंतर आपण आता समिती स्थापन केली आहे. वास्तविक अन्य राज्यांची सुरू झालेली स्पर्धा पाहता यामध्ये झालेला कोणताही विलंब महाराष्ट्राचे मोठे नुकसान करणारा ठरणार आहे. त्यामुळे तातडीने अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणून राज्य शासनाने या विषयात काम करणे आवश्यक असल्याचे आशिष शेलार यांनी पत्रात नमूद केलं आहे.

    राज्यातील उपलब्ध साधने, कायदे आणि बेरोजगार तरुणांची संख्या त्यांच्याकडे असणारे कौशल्य या सगळ्याचा सखोल विचार करुन नवे धोरण जाहीर करा, तसेच महाराष्ट्राची बाजू जागतिक औद्योगिक व्यासपीठावर मांडण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभी करा, अशी विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

    Related posts

    एनडीटीव्हीच्या फेक न्यूजने कोट्यवधींच्या आशेला ग्रहण लावण्याचा प्रयत्न; लशीबाबतचे खोटे वृत्त आरोग्य मंत्रालयाने फेटाळले

    कॅनडा पाठोपाठ ब्रिटनने शेतकरी आंदोलनात नाक खुपसले -३६ ब्रिटिश खासदारांनी ब्रिटन सरकारला लिहिले पत्र

    राहुल गांधींच्या नेतृत्वावर पवारांचा वार; यशोमती ठाकुरांचा पवारांवर पलटवार