• Download App
    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख स्वयंसेवक पोहोचविणार १० लाख कुटुंबांमार्फत मदत | The Focus India

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे १ लाख स्वयंसेवक पोहोचविणार १० लाख कुटुंबांमार्फत मदत

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर :  सध्या देशावर कोविड१९चे संकट ओढवले आहे. या संकटकाळात समाजातील पीडितांच्या मदतीसाठी देशभरात दहा हजार ठिकाणी एक लाखाहून अधिक संघ स्वयंसेवक विविध प्रकारच्या सेवाकार्यात सहभागी झाले आहेत. देशातील  दहा लाख कुटुंबांपर्यंत स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह सुरेश उर्फ भय्याजी जोशी यांनी दिली.

    रामनवमीच्या निमित्ताने फेसबुक लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधला. त्आज रामनवमीचे पर्व असले तरी सध्या आपण एका भिन्न प्रकारच्या वातावरणात हे पर्व साजरे करीत आहोत, असे सांगून भय्याजी म्हणाले की, प्रभू रामचंद्राने असुरी शक्तींशी संघर्ष करून मूल्यांचे आणि मानवजातीचे रक्षण केले. आज आपण एका वेगळ्या  संकटास तोंड देत आहोत. कोविड१९ हा संक्रमणाने पसरणारा आजार असून जगभरातील असंख्य माणसे या आजाराच्या भयाने चिंताक्रांत झाली आहेत.

    संक्रमण रोखणे हेच या समस्येवरील उत्तर आहे. प्रशासन, डॉक्टर्स यांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले तर आपण या संकटातून लवकर मुक्त होऊ शकतो. राम नवमीच्या निमित्ताने, संकटकाळात कसे वागावे याचे उदाहरण घालून देत भारताने जगासमोर एक आदर्श प्रस्थापित करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

    भय्याजी जोशी म्हणाले की, किराणा माल, हँड सॅनिटायझरसारख्या उपयुक्त वस्तू, अन्य जीवनावश्यक वस्तू पोहोचविणे, रुग्णालयांना विविध  सेवा पुरविणे आदी विविध कार्ये स्वयंसेवकांच्या माध्यमातून केली जात आहेत. विविध ठिकाणी भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशा बांधवांसाठी काही स्थानी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

    त्याचप्रमाणे एक हजार स्वयंसेवकांनी रक्तदान करून रुग्णालयांच्या रक्तसाठ्यात भर घातली आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणार्यांच्या भोजन, अल्पोपाहारांची सोयही करण्यात येत आहे. पत्रके प्रसिद्ध करून जनजागरणाचे  काम विविध केले जात आहे. स्थलांतर करणार्यांच्या मनात विश्वास निर्माण करायला हवा. संघाचे अनेक स्वयंसेवक अशाना मदत करण्याच्या कार्यात व्यस्त आहेत. पुढचे  दोन आठवडे आव्हानात्मक आहेत. ते लक्षात घेऊन  आपण सूचना, निर्बंध यांचे पालन केल्यास  लवकरात लवकर या संकटातून बाहेर पडू, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

    Related posts

    पनवेलच्या फार्म हाऊसवर सलमान खानला चावला साप, बिनविषारी साप असल्याने बचावला

    ठाकरे – फडणवीस आणीबाणीवरून एकमेकांना भिडले; आणीबाणी लागू करणाऱ्या पक्षातले नेते हसले

    शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी