याचसाठी केला अट्टाहास, मुख्यमंत्रीपदी बसावा वसंतदादांचा “विचार”??, असा सवाल विचारायची वेळ शरद पवारांनी स्वतःवर आणली आहे. Will sharad pawar be able to digest Congress chief minister in maharashtra after assembly polls??
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पवारांनी जंग जंग पछाडले. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विविध प्रकारे “इंधनपुरवठा” केला. केंद्रातल्या मोदी सरकार विरुद्ध घटना बदलण्याचे खोटे नॅरेटिव्ह चालवले. नाईलाजास्तव ठाकरे आणि काँग्रेसशी जुळवून घेतले. या सगळ्याचा परिणाम पवारांना लोकसभा निवडणुकीत जरूर दिसला, पण तो कुंपणाच्या आतच उडी पडल्यासारखा झाला. कारण पवारांना त्यांच्या नेहमीच्याच सिंगल डिजिट आठच जागा मिळाल्या. भले त्यांचा स्ट्राईक रेट 80 % राहिला, पण म्हणून जागांचा डिजिट बदलला नाही.
त्या उलट महाविकास आघाडीत ठाकरे दुसऱ्या नंबर वर 9 जागांसह राहिले आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा काँग्रेसला डबल डिजिट मध्ये तब्बल 14 जागांचा झाला. याचा “महत्तम उपपरिणाम% म्हणून काँग्रेसची महत्त्वाकांक्षा प्रचंड वाढली आणि त्या महत्त्वाकांक्षेतूनच आज जाहीर भाषा समोर आली, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होईल आणि तो वसंतदादा पाटलांच्या विचारांचाच असेल!!
ही भाषा समोर आल्यामुळेच वर उल्लेख केल्याप्रमाणे याचसाठी केला अट्टाहास, मुख्यमंत्रीपदी बसावा वसंतदादांचा “विचार”??, असा सवाल पवारांना विचारायची वेळ आली. पवारांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी एवढी सगळी राजकीय मशक्कत का केली??, उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी केली की सुप्रिया सुळे यांची पर्मनंट राजकीय व्यवस्था लावण्यासाठी केली??, याची उत्तरे पवारांनी थेट दिली नाहीत, तरी ती महाराष्ट्राला समजल्याशिवाय राहिली नाहीत.
मूळात पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, तीच सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व स्वीकारता येणार नाही या मुद्द्यावर!! तरीदेखील तो मुद्दा पवारांनी चतुराईने आपल्या अंगावर “डिफ्लेक्ट” करून घेतला आणि लोकसभेमध्ये त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जोरदार तडाखा दिला. तो तडाखा अजितदादांच्या राष्ट्रवादीला बसलाच, पण त्याचबरोबर भाजपलाही बसला आणि जाता जाता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चाटून गेला.
पण पवारांना फक्त अजित पवारांच्या राष्ट्रवादीला भाजपला किंवा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला फटका द्यायचा होता का किंवा ठोकून काढायचे होते का??, तर याचे उत्तर अर्धसत्य आहे. उलट या सगळ्या पक्षांना पवारांना यासाठी ठोकायचे होते, की त्यांना आपली कन्या सुप्रिया सुळे यांची राजकीय व्यवस्था पर्मनंट लावायची होती. त्यासाठी पवारांनी स्व पक्षाच्या काँग्रेसमधल्या विलीनीकरणाचे पिल्लू देखील मध्यंतरी सोडून दिले होते. पवारांना आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष “दुबळ्या” काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आत्ता मिळाले, तेवढे मोठे यश मिळणार नाही. काँग्रेस “दुबळी”च राहील. मोदी अगदी 400 पार गेले नाहीत, तरी 300 पार जाऊन सत्तेवर येतील आणि मग काँग्रेसला आपल्यासारख्या प्रादेशिक पक्षांची गरज निर्माण होऊन आपल्या अटी शर्तींवर आपली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन करता येईल, असा पवारांचा त्यावेळी होरा होता.
पण लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी सगळेच मूसळ केरात गेले. ना मोदी 400 पार गेले, ना पवारांना अपेक्षित असलेला काँग्रेसला झटका बसला, ना खुद्द पवार सिंगल डिजिटच्या पलीकडे जाऊ शकले!! उलट महाराष्ट्रात पवार आणि ठाकरे यांच्या प्रचाराच्या बळावर विस्कळीत संघटना असलेली काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये डबल डिजिट जागा मिळवून डोक्यावर येऊन बसली!! काँग्रेसला 14 जागा मिळाल्या. त्यामुळे अर्थातच विधानसभा निवडणुकीच्या तिकीट वाटपात काँग्रेसची “दादागिरी” प्रस्थापित झाली. त्यातूनच नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या तोंडी वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात बसला पाहिजे अशी भाषा आली आणि या भाषेचाच खऱ्या अर्थाने पवारांना हादरा बसला!!
– पवार आणि खंजीर
कारण वसंतदादा आणि पवार हे नाते हे राजकीय नाते “पाठ आणि खंजिराचे” आहे!! वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाल्याचा राजकीय कलंक त्यांच्यावर आहे. तो पुसण्याचा महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय विचारवंतांनी खूप प्रयत्न केला. त्यासाठी पवारांच्या राजकीय कर्तृत्वाचे त्यांनी वेगवेगळ्या शब्दफुलांनी “डेकोरेशन” केले, पण वसंतदादांच्या पाठीत पवारांनी खंजीर खूपसल्याचा राजाकीय कलंक पुसला गेला नाही. उलट आता विश्वजीत कदम आणि विशाल पाटलांनी वसंतदादांच्या विचारांचा मुख्यमंत्री बसला पाहिजे, असे म्हणून पवारांच्या जुन्या जखमेवरची खपली काढली.
मग पवारांना महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीनंतर वसंतदादांच्या “विचारांचा” मुख्यमंत्री खपणार आहे का??, तो तसा त्यांना खपवून घ्यायचा नसेल, तर दुसरा कोण मुख्यमंत्री होईल??, त्यांना उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदी बसवावे लागेल का?? पवारांना अशा सगळ्या तडजोडी कराव्या लागल्या, तर मग ज्यासाठी सगळा अट्टाहास केला, त्या सुप्रिया सुळेंचे पर्मनंट राजकीय बस्तान बसणार नसेल, तर मग महाविकास आघाडीचा खटाटोप तरी कशाला केला किंवा तो अट्टाहास करून पवारांनी काय मिळवले??, हा सवाल जसाच्या तसा कायम राहील!!