बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतलेल्या आजच्या यशस्वी नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने शीर्षकात उल्लेख केलेला सवाल निर्माण झाला आहे. बारामतीत आज नमो रोजगार मेळावा रंगला, की तो प्रत्यक्षात शरद पवारांचा वानप्रस्थ सोहळा ठरला?? हा तो सवाल आहे!!Sharad pawar political retirement program in baramati!!
हा सवाल मनात येण्याचे कारणही तसेच घडले. बारामतीतल्या या शासकीय कार्यक्रमात सुरुवातीला निमंत्रण पत्रिकेतच शरद पवारांचे नावही नव्हते. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री बारामतीत येणार आणि त्यांच्यासमोर आपण बारामतीच्या राजकारणातही संदर्भहीन होणार हे राजकीय भीतीदायक चित्र शरद पवारांसमोर निर्माण झाले होते. त्या भीतीपोटी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचे निमंत्रण पाठवून “डिनर डिप्लोमसी” साधून घेण्याचा प्रयत्न केला, पण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तो “मोदी प्रयोग” फेटाळून लावला, पण त्यातून पवारांना फक्त एक साध्य करून घेता आले, ते म्हणजे त्यांना नव्या शासकीय निमंत्रण पत्रिकेवर स्थान मिळवता आले आणि त्या पाठोपाठ शासकीय कार्यक्रमाच्या व्यासपीठावर देखील स्थान मिळाले.
मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, रोजगार मंत्री या सगळ्यांनी भाषणांमधून त्यांचे नाव घेतले, पण बारामतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शासकीय विकास कामांच्या शासनानेच निर्माण केलेल्या चित्रफितीत शरद पवार किंवा खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावांचा पुसटसा उल्लेख देखील नव्हता. बारामती बस स्थानक, बारामती पोलीस उप मुख्यालय, वालचंद नगरचे पोलीस स्टेशन, पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांची वसाहत या विकास कामांविषयीची ही चित्रफीत होती. पण त्या चित्रफितीत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांचा पुसटसा देखील उल्लेख नव्हता.
बारामती हे “विकास मॉडेल” असल्याचा उल्लेख फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केला. याखेरीज मंगलप्रभात लोढा, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या विकास मॉडेलचा उल्लेख देखील केला नाही. उलट या सगळ्या नेत्यांनी शरद पवारांचे नाव प्रोटोकॉल नुसार चौथ्या – पाचव्या क्रमांकावरच घेतले.
दस्तूरखुद्द शरद पवारांना भाषणाची संधी शासकीय कार्यक्रमात दिली गेली, पण ही संधी देताना देखील पवारांना त्या भाषणात केवळ आणि केवळ फक्त विकास कामांचा समयोचित उल्लेख करावा लागला. इतकेच नाहीतर ज्या रोजगाराच्या मुद्द्यावर ते आणि त्यांच्या “इंडिया” आघाडीतले नेते रोज ठणठणपाळ करत असतात, त्या रोजगाराच्या मुद्द्यावर पवारांना दोन्ही सरकारांची स्तुती करावी लागली. तरुणांना रोजगार देण्यासाठी महाराष्ट्रातले शिंदे – फडणवीस सरकार आणि केंद्रातले मोदी सरकार चांगले काम करत असल्याचे सर्टिफिकेट देखील भाषणात द्यावे लागले!!
एरवी बारामतीत शरद पवार म्हणजे मोठे “विकास पुरुष” असे त्यांची प्रतिमा रंगवली जाते, त्यांचे भाषण प्रत्येक कार्यक्रमात अंतिम असते, पण नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमावर पूर्णपणे अजित पवारांची छाप होती. त्यामध्ये अजित पवारांचा थेट “विकास पुरुष” असा उल्लेख केला गेला नाही, पण बारामतीतील सगळी विकास कामे ही फक्त अजित पवारांच्या पुढाकारातून झाली, हे सगळे वक्त्यांनी आवर्जून अधोरेखित केले. त्याउलट शरद पवारांचा प्रत्यक्ष चित्रफितीत उल्लेखही नव्हता आणि वक्त्यांनी देखील जाता जाता सन्मानपूर्वक उल्लेख करणे अशा आशयाचाच त्यांचा उल्लेख केला.
बारामतीतला नमो रोजगार मेळावा अजित पवारांनी स्वतःचे राजकीय प्रस्थापन मजबूत करण्यासाठी साध्य करवून घेतला, पण प्रत्यक्षात तो शरद पवारांचा वानप्रस्थ सोहळा ठरला. या वानप्रस्थ सोहळ्यात सुप्रिया सुळे यांना भाषणाची देखील संधी मिळू शकली नाही, हे बारामतीतल्या कार्यक्रमाचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य ठरले, जे “पवारबुद्धीच्या” मराठी माध्यमांनी सांगण्याचे टाळले!!