विनायक ढेरे
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मुंबईतील मंडळांमध्ये सुरुवात जरी शांतारामाच्या चाळीपासून झाली असली, तरी सध्या मुंबईतला लालबागचा राजा जगप्रसिद्ध आहे, तो नवसाला पावणारा सेलिब्रिटींचा गणपती म्हणून!! Sarvajanik ganeshotsav : Lalbaugh Raja ganpati mandal from nationalists movement to celebratiy festival
सुरुवातच नवसाने
पण मूळातच या गणेशोत्सवाची सुरुवात नवसानेच झाली आहे. 1932 मध्ये स्थानिक कोळी बांधव आणि व्यापारी बंधूंनी कायमस्वरूपी मंडई मिळावी म्हणून त्या वेळच्या लालबाग अर्थर रोड गरम खाडा न्यू मार्केट सार्वजनिक गणेशोत्सवातील गणरायाला नवस केला होता आणि त्याचेच फलित म्हणून त्यांच्यासाठी कायमस्वरूपी मंडई स्थापन झाली. आता हेच मंडळ लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणून प्रसिद्ध पावले आहे. याची स्थापना 12 सप्टेंबर 1934 रोजी झाली. मंडळाच्या संस्थापकांमध्ये त्या वेळचे नगरसेवक कुवरजी जेठाबाई शाह, डॉ. व्ही. बी कोरगावकर, नाखवा कोकम मामा, भाऊसाहेब शिंदे डॉक्टर यु. ए. राव आईधा यांचा समावेश होता.
मूलभूत राष्ट्रीय प्रेरणा
मंडळाची मूलभूत प्रेरणा त्यावेळच्या अन्य मंडळांपेक्षा वेगळी नव्हतीच. ती स्वातंत्र्यलढ्याचीच प्रेरणा होती आणि त्या प्रेरणेतूनच मंडळाच्या मूर्ती देखील त्यावेळच्या राष्ट्रीय नेत्यांच्या रूपात साकारलेल्या आपल्याला दिसतात. मंडळाने याचा चित्रमय इतिहासच सादर केला आहे. प्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांची यासाठी संकल्पना आणि मांडणी आहे. लालबागच्या राजाची मूर्तीच मूळात विविध राष्ट्रीय नेत्यांच्या रूपात त्यावेळी साकारली गेल्याचे दिसते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अयोध्येच्या सिंहासनावर सीतामाईसह विराजमान श्रीराम, गदाधारी भीम, टकळीवर सूत कातणारे महात्मा गांधी, ग्रामीण भारताची धुरा सांभाळणारे पंडित जवाहरलाल नेहरू, ब्रिटिश सिंहाच्या मस्तकावर पाय आणि भाला रोवून हातात तलवार घेऊन उभारलेले नेताजी सुभाष चंद्र बोस आदी राष्ट्रीय नेत्यांच्या रूपातले गणराज साकारलेले दिसले आहेत.
सामाजिक, राष्ट्रीय मुद्द्यांचे प्रतिबिंब
इतकेच नाही तर त्या वेळच्या सामाजिक आणि राजकीय भूमिकांचे प्रतिबिंब देखील लालबागच्या राजाच्या मूर्तीच्या रूपात आणि देखाव्यांच्या रूपात आपल्याला दिसून येते पंडित नेहरू – यशवंतराव चव्हाण यांच्यातील चर्चा, भारत अंतराळ युगात प्रवेश करताना प्रेरणा देणारे श्री गणेश हे देखावे मंडळाने अभिमानाने साकारलेले दिसतात. सार्वजनिक गणेशोत्सवाचे अधिष्ठान जरी धार्मिक आणि अध्यात्मिक असले तरी त्याचा उद्देश 100% आणि बावनकशी राष्ट्रीय होता. त्याचेच प्रतिबिंब लालबागच्या राजाच्या रूपाने आपल्याला दिसून येते.
सेलिब्रिटींचा राजा
आज लालबागचा राजा सेलिब्रिटींचा राजा म्हणून ओळखला जातो. राज कपूर ते अमिताभ बच्चन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते विलासराव देशमुख या सगळ्यांचे मन लालबागच्या दर्शनासाठी आतुर झालेले दिसले आहे. पण या सगळ्याची मूळे लालबागच्या राजा मंडळाने अवलंबलेल्या राष्ट्रीय वृत्तीत आहे आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्याला विविध मूर्तींमधून दिसून येते.