शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे मावळते खासदार संजय राऊत यांनी काल मुंबईतल्या जंगी स्वागताच्या वेळी एक महत्त्वाचे “राजकीय राज” जाहीर करून टाकले…!! आपण “पवारांचे माणूस” आहोत, असे त्यांनी जाहीररीत्या सांगून टाकले. वास्तविक संजय राऊत हे “पवारांचे माणूस” आहेत हे पत्रकारांना फार पूर्वीपासून माहीत होते. दिल्लीत ज्यांनी थोडीफार पत्रकारिता केली आहे, त्यांना तर त्याची निश्चित माहिती होती. पण आपण “पवारांचा माणूस” आहोत हे सांगताना संजय राऊत यांनी पवारांच्या माणसांची राजकीय भवितव्य कशी भूतकाळात गेली किंवा काळाच्या पडद्याआड गेली हे सत्य मात्र सांगितले नाही…!! Pawar Men: “Pawar’s men” and their past political future !!
राऊतांनी जरी सत्य सांगितले नसले तरी त्या सत्याचा शोध घेतल्यानंतर “पवारांच्या माणसांचे” नेमके काय होते? आणि त्यांचे राजकीय भवितव्य काय असते…??, हे पाहिले की संजय राऊत नावाच्या “पवारांच्या माणसाचा” नेमका राजकीय “मागोवा आणि पुढावा” घेता येतो…!!
फार जुनी गोष्ट सांगण्यात मतलब नाही, ती म्हणजे सुंदरराव सोळंके यांची. कारण ती लिहिणारी माणसे आज हयात नाहीत आणि स्वतः सुंदरराव सोळंकेही हयात नाहीत. शिवाय शरद पवारांची “पवार” ही राजकीय ओळख अधोरेखित होण्यापूर्वीची ती गोष्ट आहे.
पण त्यानंतर जी – जी माणसे पवारांची म्हणून ओळखली गेली, त्यांचे राजकीय भवितव्य कसे भूतकाळात दडपले गेले आणि होत्याचे नव्हते कसे झाले… याची उदाहरणे खूप आहेत. त्यातली थोडीच उदाहरणे द्यायची झाली तर मावळचे कृष्णराव भेगडे, पुसदचे सुधाकरराव नाईक, वर्धाचे दत्ता मेघे, उस्मानाबादचे पद्मसिंह पाटील यांच्याकडे पहा… म्हणजे “पवारांच्या माणसांचे” नेमके काय होते…?? हे लक्षात येईल.
वर उल्लेख केलेली ही सगळी माणसे पवारांची अतिशय जवळची माणसे होती. किंबहुना राजकारणातली त्यांची ओळख “पवारांची माणसे” म्हणूनच अधिक होती. पण मग या सर्वांचे राजकीय भवितव्य आपापल्या पातळीवर 10 – 15 वर्षांपेक्षा जास्त टिकले का…?? त्यांच्या भवितव्याला खूप मोठी झळाळी मिळाली का…?? या प्रश्नांची उत्तरे शोधायला गेले तर बहुतांश मोठा नकार मिळताना दिसतो.
यातले सुधाकरराव नाईक सोडले तर कोणीही कधीच मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. पद्मसिंह पाटील तर पवार यांचे नातेवाईक. त्यांच्याबद्दलचा प्रश्न नगर जिल्ह्यातल्या एका पत्रकार परिषदेत विचारल्यानंतर पवार भडकले होते. त्या नवोदित पत्रकाराला त्यांनी बाहेर काढायला लावले होते. पण खुद्द पद्मसिंह पाटलांची गृह मंत्रीपदावरून कशी हकालपट्टी झाली आणि नंतर हळू हळू ते राजकीय अंधारात कसे जाऊन पोहोचले याची कहाणी ते स्वतः आणि त्यांचा मुलगा राणा जगजितसिंह हे सांगतील. आज राणा जगजितसिंह हे भाजपचे आमदार आहेत. त्यांना राष्ट्रवादीचे दरवाजे पवारांनी कायमचे बंद केले आहेत.
सुधाकरराव नाईक यांना पवार यांनी “आपला माणूस” म्हणून मुख्यमंत्री पदी नेमले ते 1992 संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेल्यानंतर…!! पवारांना वाटले होते, सुधाकरराव नाईक “आपला माणूस” आहे. बाकीच्या “आपल्या माणसांना” देखील ते ते जपतील. पण सुधाकरराव नाईक यांना काय माहिती की पवारांची “आपली माणसे” आपल्या स्वतःपेक्षा त्यांच्या जास्त जवळची आहेत… ही माणसे म्हणजे हितेंद्र ठाकूर आणि पप्पू कलानी…!! सुधाकरराव नाईकांनी या दोघांच्या या साम्राज्यात हात घातला आणि अखेरीस त्यांना स्वतःलाच “राजकीय बळी” होऊन बाजूला व्हावे लागले. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर सुधाकरराव नाईक यांना राज्यपाल पद जरूर मिळाले पण त्यांचे राजकीय भवितव्य झाकोळले ते काही परत उजळले नाही…!!
बाकीच्या वर उल्लेख केलेल्या माणसांची तर आमदारकी पलिकडे झेप कधी गेलीच नाही. म्हणजे जाऊ दिली नाही. वास्तविक कृष्णराव भेगडे यांची राजकीय पार्श्वभूमी जनसंघाची. म्हणजे अगदी रामभाऊ म्हाळगी यांच्या काळातल्या जनसंघाची. पण पवारांच्या “राजकीय नादी” लागले आणि भेगडे फसले. एक टर्म आमदारकी शिवाय त्यांच्या पदरात काही पडले नाही. पण आधीच्या जनसंघाचा हा माणूस नंतरच्या काळात मात्र “पवारांचा माणूस” म्हणून शिक्का कायमचा घेऊन बसला…!!
दत्ता मेघे हे असेच पवारांचे जवळचे माणूस. पण खासदारकी पलिकडे त्यांना देखील फारसे काही मिळाले नाही. केंद्रीय मंत्रीपदी पवारांचा जवळचा माणूस म्हणून प्रफुल्ल पटेलांना ओळख मिळाली, ती थेट विजय मल्ल्या, एअर इंडिया या घोटाळ्यापर्यंत जाऊन पोहोचली. पण विदर्भातला एकेकाळचा दत्ता मेघे नावाचा “पवारांचा माणूस” खासदारकी पेक्षा फारसे काही मिळवू शकला नाही. आज दत्ता मेघे यांचे चिरंजीव हे देखील भाजपचे आमदार आहेत.
पवारांची ही खासियत आहे, कोणतीही माणसे फार काळ “त्यांची माणसे” म्हणून राहू शकत नाहीत…!!
या लेखात फक्त राजकीय व्यक्तींचा उल्लेख केला आहे. बाकीच्या बीसीसीआय मधल्या अथवा अन्य क्षेत्रांमधल्या माणसांचा उल्लेख केलेला नाही. अन्यथा बीसीसीआय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शरद पवारांना केवळ एका मताने पराभव पत्करावा लागल्यानंतर “पवारांच्या एका माणसाचे” नेमके काय झाले…??, याचा अधिकृत थांगपत्ता अद्याप कोणाला लागलेला नाही…!!
ठीक आहे आता संजय राऊत हे “पवारांचे माणूस” आहेत. सध्या ते ईडीच्या स्कॅनर खाली असले तरी त्यांना स्वतःला त्यांचे राजकीय भवितव्य पवारांच्या पंखांखाली सुरक्षित असल्याचे वाटते आहे. हरकत नाही. ज्याचे त्याला काय वाटावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे…!!
बाकी पवारांच्या माणसांचे राजकीय भवितव्य10 – 12 वर्षांपेक्षा अधिक नसते हे इतिहासाने सिद्ध केले आहे. अर्थात इतिहास कोणाला वाचायचा नसेल आणि वाचला तरी त्या इतिहासातून कोणाला धडा घ्यायचा नसेल तर त्याला बाकीचे कोणीही काही करू शकणार नाहीत…!! हे उघड आहे.
Pawar Men : “Pawar’s men” and their past political future !!
महत्त्वाच्या बातम्या
- फिलिपाइन्ससोबतचा ब्राह्मोस करार द्विपक्षीय; रशियावरील निर्बंधांचा परिणाम होणार नाही
- आता रोज येशील का? : कंगनाने घराबाहेर उभ्या असलेल्या पापाराझीला फटकारले
- Thackeray – Pawar : दोन मंत्री तुरुंगात, दोन तुरुंगाच्या वाटेवर तरी मंत्रिमंडळाच्या फेरबदलात पवारांच्या “मुत्सद्देगिरीची” भलामण!!
- देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले
- डीएचएल कंपनीचे मालवाहू विमान धावपट्टीवर कोसळले; कोस्टारिका बेटावरील दुर्घटना