माणूस बोलतो कसा यावरूनच नाही, तर तो कोणासमोर उभा कसा राहतो, सर्वांमध्ये बसतो कसा यावरूनही त्या माणसाचे मन आपण पारखत असतो. कॉर्पोरेटमध्ये काम करताना फक्त आपल्या देशाचे नव्हे, तर ज्या परदेशी कंपनीचे काम आपण करत आहोत तिथलेही शिष्टाचार आपण पाळतो किंवा पाळावे लागतात. विनम्रता ही या शिष्टाचाराचे शुद्ध स्वरूप आहे, कारण फक्त माणसेच नाही, तर सर्व जीवसृष्टीबद्दल मनात असलेला आदर आणि आपलेपणाही यामध्ये समाविष्ट आहे. Life Skills: How to talk to others, how to behave is also very important
विनम्रता वागण्यातून, बोलण्यातून, खास करून संवाद, संभाषण आणि देहबोली यावरून आपल्याला ओळखू येते. अनेक वेळा स्त्री दाक्षिण्य म्हणून काहीजण कारचे दार उघडून देणे किंवा दार उघडून आपण आधी पुढे जावे, असे सूचक वागणे. असे करताना आपण पाहतो. कोणी मोठ्या पदावरची व्यक्ती आली तर आपण उठून उभे राहतो, किंचित मान वाकवून शुभेच्छा देतो. याला शिष्टाचार पाळणे असेही आपण म्हणतो. करावे लागते म्हणून आपण किती करतो आणि आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग म्हणून ते किती वेळा घडते, यावरून आपण विनम्र या मनोभूमिकेत आहोत की नाही ते समजते. जर त्या मनाच्या भूमिकेत आपण नसू, तर हे शिष्टाचार केवळ कामाचा भाग म्हणून पाळले जाणारे.
मग एरवी तसेच दिसत नाहीत. समोर असताना नीट बोलणे मग माघारी टिंगल, टवाळी, मस्ती असेही प्रकार दिसतात. समोरासमोर उर्मट आणि उद्दामपणे वागणे बोलणे जितके योग्य नाही तितकेच माघारी वाईट बोलणे आणि अपमानकारक बोलणे हे योग्य नाही. कारण ही माणूस म्हणून कोणाविषयी असणारी समजूत नाहीये. त्यामुळे दिवसभरात आपण इतरांशी कसे वागतो याला फार महत्व आहे. यावरून आपणाला समोरचे लोक जोखत असतात. त्याचे भान तरी नेहमी कायम राखावे व त्याप्रमाणे वागावे.