• Download App
    कंगना - राहुल "वैचारिक मैत्रभाव"!!|Kangana - Rahul "Ideological Friendship

    कंगना – राहुल “वैचारिक मैत्रभाव”!!

    या लेखाचे शीर्षक वाचून कोणालाही असा संभ्रम पडेल की लेखक कोणत्या क्रूजवर पार्टीला गेला होता काय? तिथून आल्यावर हा लेख खरडला आहे काय??… पण नाही. लेखकाची क्रूजवर पार्टीला जाण्याची ऐपत नाही…!! असो मुद्दा इथे वेगळाच आहे, खरंच कंगना राणावत आणि राहुल गांधी यांच्यातला “वैचारिक मैत्रभाव” गेल्या काही दिवसांपासून जागृत झालेला दिसतो आहे, ऐतिहासिक सत्य नसलेल्या गोष्टी रेटून बोलत राहणे आणि आक्रस्ताळेपणाने मांडणे हे या “वैचारिक मैत्रभावाचे” लक्षण आहे…Kangana Ranut and Rahul Gandhi; both are examples of political immaturity

    लोहचुंबकाचे समान ध्रुव परस्परांना आकर्षित करत नाहीत पण विरुद्ध ध्रुव मात्र एकमेकांना आकर्षित करतात तसाच आक्रस्ताळेपणा हा कंगना आणि राहुल यांच्यातल्या परस्परांच्या आकर्षक “मैत्रभावाचे” निदर्शक आहे. या दोन्ही व्यक्ती ऐतिहासिक दृष्ट्या अक्षरश: खोटे बोलत आहेत पण आपापल्या नेत्यांचे आणि हिरोंचे समर्थन करताना हे दोघेही आणि त्यांचे – त्यांचे परिवार इतके टोकाला गेले आहेत की त्यांच्यातला “आक्रस्ताळी वैचारिक मैत्रभाव” जागृत झाला आहे.



    राहुल गांधींनी सावरकरांना “माफीवीर” ठरवून टाकले ना… मग आम्हीही सावरकर विरोधक असणाऱ्या महात्मा गांधींना “भीकवीर” ठरवून टाकणार… असा हा “मैत्रभाव” आहे…!! तुम्ही एक मूर्खपणा केलात ना मग आम्ही दहा मूर्खपणे करणार… तुम्ही गळ्यात सरी बांधली की आम्ही दोरी बांधणार अशाच पैकी हा प्रकार आहे. यात कुठलेही वैचारिक बंध नाहीत
    वैचारिक प्रगल्भता, वैचारिक खोली हे तर शब्दही त्यांना माहिती नाहीत. कंगना आणि राहुल यांचे आपण समजू शकतो. उथळ पाण्याचा तो फार खळखळाट आहे. पण त्यांच्या समर्थनासाठी उतरणारे सत्तरी – पंच्याहत्तरी गाठलेले प्रगल्भ अभिनेते, नेते यांचे काय?? की त्यांचेही “साठी बुद्धी नाठी” असे झाले आहे??

    विक्रम गोखले वास्तविक पाहता प्रगल्भ अभिनेते. पण कंगनाच्या स्वातंत्र्य भिकेत मिळाले, या वक्तव्याचे समर्थन करण्याचे काय कारण होते? खरंच ती ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे काय?, तर अजिबात नाही. स्वातंत्र्य आपल्याला भिकेत मिळालेले नाही. उघडून डोळे नीट बघितले तर भारतीय स्वातंत्र्य म्हणजे सत्तांतर होते. ज्याला इंग्रजीत transfer of power असे म्हणतात. ही कोणती भीक नसते. तर ती प्रक्रिया असते. हे कंगनाला कळत नसेल पण विक्रम गोखलेंनाही ते कळत नाही? कमाल आहे.

    दस्तुरखुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य कसे मिळाले?, याची कारणमीमांसा दोनदा केली आहे. अभिनव भारताच्या सांगता समारंभात भाषण करताना सावरकर म्हणाले होते, की या देशाचे स्वातंत्र्य 1857 च्या स्वातंत्र्य समरापासून ते 1947 पर्यंत सर्व क्रांतिकारकांचे सर्व अहिंसक आंदोलनकर्त्यांचे किंबहुना माझ्या देशाला स्वतंत्र कर अशी देवाकडे प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे श्रेय आहे, अशी निःसंदिग्ध ग्वाही त्यांनी अभिनव भारताच्या सांगता समारंभाच्या भाषणात दिली होती.

    कंगना राणावतने कदाचित हे भाषण वाचले नसेल. पण विक्रम गोखले यांनी तर ते नक्कीच वाचले असेल. त्याही पलिकडे जाऊन 1965 चाली ऑर्गनायझरला दिलेल्या मुलाखतीत सावरकरांनी हाच मुद्दा पुन्हा अधोरेखित केल्याचे दिसते. देशाचे स्वातंत्र्य मिळवण्यात अनेक घटक होते. यामध्ये सशस्त्र क्रांतिकारकांपासून अहिंसक आंदोलनापर्यंत त्याच बरोबर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेचा खूप मोठा वाटा होता, असे सावरकरांनी नमूद केले आहे.

    एवढेच नाही तर नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेच्या प्रेरणेतून ब्रिटिश नाविक दलात जे बंड झाले आणि ब्रिटिश हवाई दलात बंड होऊ घातले होते त्याच्या भितीने देशाला स्वातंत्र्य मिळाले, असे सावरकरांनी या मुलाखतीत नमूद केले आहे. ब्रिटिश भारतीय आर्मी ब्रिटिश सरकारला निष्ठावंत राहिली नाही म्हणून सत्तांतर करणे भाग आहे असे ब्रिटिश पंतप्रधान अटली म्हणाले होते याची आठवण देखील सावरकरांनी करून दिली आहे.

    देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले? यावर एवढी स्पष्ट भूमिका सावरकरांनी मांडलेली असताना त्यांचे अनुयायी म्हणणाऱ्यांनी कंगना राणावतच्या आक्रस्ताळ्या विधानांना पाठिंबा द्यावा? हे कोणत्या विवेक बुद्धी निकषात बसते? राहुल गांधींचे ठीक आहे. त्यांच्या कंपुतल्या मणिशंकर अय्यर, दिग्विजयसिंग, चिदंबरम यांचेही ठीक आहे. सत्ता गेल्यामुळे आणि ती परत मिळण्याची शक्यता नसल्यामुळे यांना फ्रस्ट्रेशन आले आहे. त्यातून भाजप – संघासारख्या विरोधकांवर हल्ले करताना ते “सरकतात.”

    पण म्हणून स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या प्रगल्भ अभिनेत्यांनी, नेत्यांनी आक्रस्ताळेपणा करून जे इतिहासात घडलेच नाही किंवा जे ऐतिहासिक सत्य नाही ते आक्रस्ताळेपणाने सांगण्याची काय गरज आहे? हा मुद्दा येथे महत्त्वाचा आहे. राहुल गांधी आणि त्यांचा कंपू हे पुरेसे “एक्सपोज” होत असताना स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्यांनी असा आक्रस्ताळेपणा करणे हे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे.

    जे राहुल गांधींच्या बाबतीत इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी म्हटले आहे, राहुल गांधी यांच्यात काँग्रेस परिवाराचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. तेच कंगना राणावतच्या बाबतीत लागू आहे. तिच्यात हिंदुत्ववादी परिवाराचे नेतृत्व करण्याची क्षमता नाही. डोक्याने चांगल्या असणाऱ्या बाकीच्या हिंदुत्ववाद्यांनी आपले नेतृत्व तिच्याकडे जाऊ देऊ नये. एवढा सुज्ञपणा हिंदुत्ववाद्यांनी दाखविणे अपेक्षित आहे.

    राहुल गांधी आणि कंगना राणावत यांच्यात त्यांच्या निम्नस्तरीय बुद्धिमत्तेने “मैत्रभाव” तयार झाला आहे. त्याला हिंदुत्ववादी मंडळींनी खतपाणी घालू नये एवढेच या निमित्ताने सांगावेसे वाटते…!!

    Kangana Ranut and Rahul Gandhi; both are examples of political immaturity

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!