नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 60 वर्षे वावरत असताना शरद पवारांनी जी काही राजकीय मशागत, पेरणी, कापणी आणि मळणी केली आहे, तिचे वर्णन त्यांचे समर्थक आणि मराठी माध्यमे काहीही करोत, पण पवारांच्या राष्ट्रवादीने नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाकांक्षा अशी काही फुलवली आहे की, ती केवळ महत्त्वाकांक्षा न राहता, तिचे रूपांतर राजकीय रोग किंवा विकारात झाले आहे. पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीला भावी मुख्यमंत्री पदाची लागण झाली आहे. या लागणीतूनच आता जितेंद्र आव्हाड यांचे देखील बॅनर मुलुंडमध्ये भावी मुख्यमंत्री म्हणून लागले आहेत.
या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्ती मध्ये नेमके भावी मुख्यमंत्री आहेत तरी किती?? आत्तापर्यंत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर रस्त्यांवर झळकले होते. त्यात परवाच धनंजय मुंडेंची आणि आज जितेंद्र आव्हाडांची भर पडली. या दोघांचेही भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर आपापल्या मतदारसंघांमध्ये लागले.
शिवसेनेत हे फारसे कधी दिसले नाही. काँग्रेस मध्ये दिसले, पण ते मर्यादित प्रमाणात. महाराष्ट्राच्या राजकारणात नगर जिल्ह्याचे वर्णन करताना सगळेच नेते “चीफ मिनिस्ट्रियल मटेरियल” पण ते आपापल्या तालुक्यांपुरते असे केले जायचे!! ते एक प्रकारे नगर जिल्ह्यातल्या नेत्यांना डिवचण्यासारखेच होते. कारण नगर जिल्ह्यातले सगळे नेते असे काही राजकारण खेळायचे, की जणू काही आपण संपूर्ण महाराष्ट्राचे राजकारण हालवतो आहोत, असा त्यांचा आवा असायचा, पण प्रत्यक्षात ते आपापसात जिल्ह्यापुरते आणि तालुक्यापुरते भांडत असायचे. शंकरराव काळे – शंकरराव कोल्हे, तनपुरे, विखे, आदिक, ससाणे, गडाख, थोरात, पिचड अशा कितीतरी नेत्यांची आणि कुटुंबांची नावे या यादीत देता येतील. यातल्या प्रत्येकाने हिरीरीने राजकारण खेळले. ते महाराष्ट्रात गाजले. यातले प्रत्येक नेते मंत्री झाले. पण नगर जिल्ह्यातून महाराष्ट्राला अजून एकही मुख्यमंत्री मिळालेला नाही. कारण नगर जिल्ह्याने कधी एकमुखी नेतृत्व तयार केले नाही आणि कुणी कुणाचे एकमुखी नेतृत्व मान्य केले नाही.
पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचे नेमके हेच झाले आहे. दिल्लीत काँग्रेस मध्ये आपल्या राजकारणाची डाळ शिजली नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसची स्वतंत्र चूल मांडली. त्याला काही वैचारिक कारण किंवा वैचारिक डूब द्यायची म्हणून स्वाभिमानाचे नाव दिले. पण स्वतःच्या पक्षाची वाढ करताना स्वतंत्रपणे काही व्यूहरचना आणि आखणी करण्यापेक्षा त्यांनी काँग्रेस पोखरली. काँग्रेस मधूनच नेते आणि कार्यकर्ते आपल्या पक्षात आणले त्यामुळे काँग्रेसी प्रवृत्ती पवारांच्या राष्ट्रवादीत शिरल्या. मिळेल तिथे आणि मिळेल तशी सत्ता खेचायची त्या पलीकडे काही करायचे नाही ही प्रवृत्ती पवारांच्या राष्ट्रवादीचे व्यवच्छेदक लक्षण बनली.
पण त्यामुळे पक्ष संघटना वाढवताना काही भव्य दिव्य ध्येय डोळ्यासमोर ठेवावे लागते, नेते आणि कार्यकर्त्यांच्या फक्त महत्त्वाकांक्षा फुलवून चालत नाहीत, तर त्यांना संघटनेचे जाळे व्यापक करण्यासाठी खरी प्रेरणा द्यावी लागते. समाजातल्या सर्व घटकांना खऱ्या अर्थाने बरोबर घेऊन त्यांना सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये समतोल पणे सामावून घेऊन सर्वसमावेशक भूमिका घेत संघटनेचे जाळे विणावे लागते. तेव्हा संघटना मोठी होते. राजकीय डावपेच हा एकूण राजकारणाचा एक छोटा भाग असतो, पण त्यापलीकडे सर्वसमावेशक भूमिका तुमच्या पक्षाची खरी व्याप्ती वाढवत असते, हे संस्कार पवारांना आपल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये कधी रुजवताच आले नाहीत. कारण काँग्रेसमध्ये राहून देखील खुद्द पवारांनी स्वतःमध्ये सर्वसमावेशकतेचे खरे संस्कार रुजवून घेतले नाहीत. त्यामुळे खुद्द त्यांच्या फक्त महत्त्वाकांक्षा फुलल्या, अगदी त्या पंतप्रधानपदापर्यंत पोहोचल्या, पण त्यांच्यापेक्षा खऱ्या अर्थाने मुत्सद्दी असणाऱ्या नेत्यांनी त्यांचे पंख कापल्याबरोबर पवारांच्या महत्त्वाकांक्षा धाडकन खाली कोसळल्या.
पण पवारांच्या राजकारणाचे मूल्यमापन करताना त्या महत्त्वाकांक्षा त्यांना कायमच्या चिकटल्या. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष ताकदीपेक्षा प्रतिमा मोठी अशाच स्वरूपात बघायला लागले. थोडक्यात जर पवार पंतप्रधान पदाचे स्वप्न बघू शकतात, तर आपण मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न का बघायचे नाही?? असे नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटू लागले, पण त्यासाठी स्वबळावर बहुमत कमवावे लागते, पक्ष संघटना सर्वव्यापी करावी लागते, महत्त्वाकांक्षेपेक्षा संघटना आणि तिचे ध्येय मोठे असावे लागते, हे पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी प्रवृत्तीला कधी समजलेच नाही. म्हणून त्यांचे नेते तुटपुंज्या राजकीय कर्तृत्वावर भावी मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षा फुलवून भराऱ्या मारायला लागले.
पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी प्रवृत्तीचा हा राजकीय अनुवांशिक दोष आहे. भाजप किंवा संघ परिवाराला खोटा नॅरेटिव्ह तोडता न येणे, हा जसा त्यांचा अनुवंशिक राजकीय दोष आहे, तसाच खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक भूमिका घेऊन नंतर महत्त्वाकांक्षा फुलवण्यापेक्षा आधीच महत्त्वाकांक्षा फुलवणे आणि ती तुटपुंज्या कर्तृत्वाच्या आधारे पूर्ण करण्यासाठी बॅनर वर लिहिणे हा पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीचा राजकीय अनुवंशिक दोष किंवा विकार आहे. अनेक भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवरून तो जाहीरपणे मांडला जात आहे.
Jitendra Ahwad : Future chief ministership is an inherent flaw of pawar created NCP!!
महत्वाच्या बातम्या
- Preeti Sudan : प्रीती सूदन UPSCच्या नव्या अध्यक्ष; मनोज सोनी यांच्या राजीनाम्यानंतर नियुक्ती, संरक्षण मंत्रालयासह अनेक खात्यांचा 37 वर्षांचा
- Ajit Pawar vs Sharad pawar : अजितदादांचे मंत्री, आमदारांविरोधात पवारांचा “मोठा प्लॅन”; पण तरुणांना उमेदवारी देण्याशिवाय दुसरा पर्याय काय??
- Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी दिली अधीर रंजन चौधरींना खुली ऑफर, म्हणाले…
- Ismail Haniyeh : हमास प्रमुख इस्माईल हनियाच्या हत्येबाबत इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे पहिली प्रतिक्रिया आली समोर!