नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत; पण 22 वर्षांच्या मुलीने दाखवून दिले, पवार म्हणजे बारामती नाहीत!!, हे राजकीय वास्तव देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर समोर आले.
मुंबईत ठाकरे बंधूंनी आज युती जाहीर केली. मराठी माध्यमांनी ठाकरे बंधूंच्या युतीची फार मोठी वातावरण निर्मिती केली. ठाकरे बंधूंच्या पत्रकार परिषदेनंतर मराठी माध्यमांनी अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. त्यामध्ये अर्थातच प्रमुख प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांची होती. त्यांनी ठाकरे बंधूंच्या युतीची खिल्ली उडवली. मला वाटले एकीकडून झेलन्स्की निघाले, दुसरीकडून पुतिन निघाले आणि त्यांची युती झाली की काय, पण ठाकरे बंधूंची युती झाली. हरकत नाही. दोन बंधू एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे, पण ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत. ठाकरे म्हणजे मराठी माणूस नाहीत, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी हाणला.
– पवार म्हणजे बारामती नाहीत
पण त्या आधीच्याच नगरपरिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने बारामती सारख्या शहरात पवारांना “बाय” देऊन टाकला होता. पवारांच्या समोर त्यांनी शस्त्र टाकली, तरी देखील पवार म्हणजे बारामती नाहीत, हे 22 वर्षांच्या एका मुलीने दाखवून दिले. एकीकडे बारामतीत बलाढ्य भाजप पवारांच्या राष्ट्रवादीशी लुटूपुटूची लढाई लढत असताना बहुजन समाज पक्षाच्या काळुराम चौधरी यांनी राष्ट्रवादीशी जोरदार टक्कर दिली. त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवारापेक्षा जास्त मते मिळवून दाखविली. शरद पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला 5053 मते मिळाली तर काळुराम चौधरी यांना 6652 मते मिळाली.
– 22 वर्षांच्या मुलीने पवारांना हरविले
पण बारामतीतली खरी लढत तर त्यांच्या मुलीने जिंकली. 22 वर्षांच्या संघमित्रा काळूराम चौधरी यांनी बहुजन समाज पक्षाच्या हत्ती चिन्हावर निवडणूक लढवली. त्यांनी प्रभाग क्रमांक 14 मध्ये बाकी सगळ्या पक्षांवर मात करून निवडणूक जिंकली. बारामतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 35 जागा जिंकल्या. विरोधकांना फक्त 6 जागा मिळवता आल्या. पण 35 जागा मिळवताना अजित पवारांना त्यांचे पारंपरिक विरोधक असलेल्या तावरे घराण्याशी हातमिळवणी करावी लागली.
– भाजप पडला तोकडा
त्या उलट काळूराम चौधरी यांनी बहुजन समाज पक्ष कधी सोडला नाही. ते बहुजन समाज पक्षाचे राज्य सरचिटणीस आहेत. त्यांनी कायमच पवार घराण्याविरोधात भूमिका घेतली. पवार घराण्याशी तडजोड केली नाही, ते पवार घराण्याच्या विरोधात सतत संघर्ष करत राहिले. पवार म्हणजे बारामती नाहीत, हे खरंतर भाजपने दाखवून देणे अपेक्षित होते. कारण भाजपच्या कार्यकर्त्यांनी बारामतीत वर्षानुवर्षे संघर्ष केला होता. पण ठाकरे म्हणजे मुंबई नाहीत असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपने पवार म्हणजे बारामती नाहीत, असे दाखवून दिले नाही. काळुराम चौधरी आणि त्यांच्या 22 वर्षांच्या मुलीने मात्र ते नक्की दाखवून दिले.
Fadnavis said, “Thackeray is not Mumbai”; but a 22-year-old girl has shown that Pawar is not Baramati!
महत्वाच्या बातम्या
- New Zealand : भारत-न्यूझीलंड दरम्यान मुक्त व्यापार करार; भारतात येणारे अर्ध्याहून अधिक सामान आता शुल्कमुक्त
- जैन कुंभमेळा णमोकार तीर्थक्षेत्रासाठी 36.35 कोटींचा सुधारित आराखडा मंजूर; फेब्रुवारी 2026 मध्ये कुंभमेळा
- इम्रान मसूद यांनी प्रियांका गांधींची सोंगटी पुढे ढकलली; त्याच दिवशी राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची “भविष्यवाणी” झाली!!
- Piyush Goyal : पीयूष गोयल म्हणाले, भारत कधीही आपले डेअरी सेक्टर उघडणार नाही; अमेरिकेशी व्यापार करार पुढच्या टप्प्यात