नाशिक : हरियाणा आणि जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस जिंकून सत्तेवर आली, तर पक्षाचे उत्तरे मधले पुनरुज्जीवन सुकर होणार आहेच, पण हे पुनरुज्जीवन महाराष्ट्रात तरी ठाकरे आणि पवारांच्या पक्षांच्या मूळावर येण्याची शक्यता असून त्यांच्या बळावर काँग्रेसचा महाराष्ट्रात सत्ता खेचायचा डाव राहणार आहे.
हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभांच्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांवर विश्वास ठेवून जर जसेच्या तसे आकडे आले, तर काँग्रेस दणक्यात सत्तेवर येणार ही उघड बाब आहे. जम्मू काश्मीर मध्ये अब्दुल्लांच्या नॅशनल कॉन्फरन्स बरोबर काँग्रेस सत्तेवर यायची शक्यता असली, तरी त्याच वेळी उत्तरेतल्या हरियाणा सारख्या जाट प्रभावक्षेत्रात काँग्रेसने तब्बल 10 वर्षांनंतर सत्ता मिळवल्यानंतर पक्षाचे उत्तरेत पुनरुज्जीवन होणार आहे. ज्याचा परिणाम उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या हिंदी भाषक पट्ट्यामध्ये तर होणार आहेच, पण त्याचबरोबर पंजाब आणि राजस्थान देखील या प्रभावापासून फारसे वेगळे राहू शकणार नाहीत. पण पंजाब आणि राजस्थान मध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्याने त्याचा प्रत्यक्ष मतदारांवरचा परिणाम मात्र लगेच दिसण्याची शक्यता नाही.
त्या उलट हरियाणातल्या काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाचा परिणाम महाराष्ट्राच्या निवडणुकीवर झाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी चौथ्या नंबरचा पक्ष म्हणून “गप्प” पडून राहिलेली काँग्रेस लोकसभा निवडणुकीनंतर दंडात बेटकुळी फुगवून वर आली. 14 खासदारांच्या बळावर महाविकास आघाडीत “दादागिरी” करू लागली. उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाला बाकी कुठल्याही पक्षाने नव्हे, तर काँग्रेसनेच निर्णायक पहिला सुरुंग लावून टाकला. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा काही उपयोग झाला नाही.
त्यात हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या विजयाची भर पडली, तर काँग्रेसची “दादागिरी” महाराष्ट्रात किती वाढेल, याचा अंदाजच केलेला बरा!! तसेही मराठी माध्यमांमध्ये ठाकरे आणि पवार विशेषत: पवारांच्या “चाणक्यगिरीचे” कितीही गुणगान गायले जात असले, तरी प्रत्यक्षात काँग्रेस एक पक्ष म्हणून पवारांपेक्षा कितीतरी बळकट आहे. इतकेच नाही, तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या निर्णयात पवारांच्या कुठल्याही “चाणक्यगिरी”पेक्षा दिल्लीतल्याच काँग्रेसच्या नेत्यांची “चाणक्यगिरीच” चालते, हा “इतिहास” “वर्तमान” आणि “भविष्य” आहे. काँग्रेसच्या दिल्लीतल्या नेत्यांच्या “चाणक्यगिरीवर” मात करणे, हा पवारांचा घास नाही.
– ठाकरे काय करतील??
त्यातच हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने यश मिळवल्यानंतर त्या पक्षाच्या बाहूंमध्ये जे बळ भरले जाणार आहे, त्यातून खरा तोटा ठाकरे आणि पवारांचाच होण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची सत्ता आली, तर काँग्रेसच्या सत्तेच्या वर्चस्वाखाली मुकाटपणे महाविकास आघाडीतले घटक पक्ष म्हणून बसण्याखेरीज त्यांना पर्याय उरणार नाही. मग ठाकरे काय करतील??
Congress revival, a damage for thackeray – pawar parties
महत्वाच्या बातम्या
- kisan Sanman Nidhi : 9.4 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20000 कोटी रुपये येणार ; मोदी जारी करणार 18वा हप्ता
- Haryana Exit Poll : हरियाणात एक्झिट पोलच्या बळावर काँग्रेसचे 3 – 4 मुख्यमंत्री एकदम चढले गादीवर!!
- Haryana : हरियाणामध्ये मतदानादरम्यान भाजपची मोठी कारवाई
- PM Modi targets : महाराष्ट्र दौऱ्यात राहुल गांधींचे जुनेच संविधान नॅरेटिव्ह; पण मोदींच्या ड्रग्स विरोधी हल्ल्यात काँग्रेस गारद!!