नाशिक : काँग्रेसला खरं तर अख्ख्या बिल्डिंग रीडेव्हलपमेंटची गरज आहे, पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तातडीची वेळ अशी की निदान काँग्रेसला प्लंबरची तरी गरज आहे!! Congress actually needs a whole building redevelopment
काँग्रेस पक्ष हा जुन्या गढी वाड्यासारखा आहे. पण त्याची पडझड इतकी झाली आहे की, तिथला मालक कधीकाळी हा वाडा त्याच्याभोवतीचे शेत शिवार आपले होते असे मानत आहे. पण आता त्याचे काही उरले नाही अशा शब्दांमध्ये मध्यंतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसचे वाभाडेयुक्त वर्णन केले होते. पवारांनी वर्णन केलेल्या शब्दांमध्ये अजिबात असत्य नव्हते.
काँग्रेस एकेकाळी खरंच प्रचंड मोठा गढी वाडा होता. त्या वाड्याभोवती हजारो एकर शेती काँग्रेसच्याच मालकीची होती. म्हणजे एकूण काँग्रेस पक्ष प्रचंड समृद्ध होता. सत्तेच्या रेशमी बेलबुट्टीदार झुली त्याने पांघरल्या होत्या, पण काळाच्या ओघात वाडा पडला. गढी उद्ध्वस्त झाली. त्या वाड्याच्या आश्रयाला वर्षानुवर्षे राहिलेले अनेक जण निघून गेले. काही जण कायमचे लुप्त झाले आणि आता त्या वाड्याकडे बघून अनेक लोक हळहळले त्यापैकी एक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आहेत.
पण दरम्यानच्या काळात काँग्रेसच्या गढी वाड्याचे मालक काही स्वस्थ बसले नव्हते. त्यांनी मध्यंतरी संपूर्ण भारतभर हजारो किलोमीटरची भारत जोडो न्याय यात्रा काढली. अख्खा भारत उभा आडवा पिंजून काढला. त्यातून काँग्रेसच्या गढी वाड्याची दुरुस्ती होईल, डागडुजी होईल, अशी अपेक्षा निर्माण झाली. त्या वाड्याला पुन्हा जुन्या वैभवाचे दिवस दिसतील, असे काँग्रेसच्या वाड्याच्या मालकांच्या समर्थकांना वाटू लागले, पण प्रत्यक्षात तसे घडताना दिसले नाही. उलट काँग्रेसमधल्या वाड्यातून गळती जशीच्या तशी सुरूच राहिली. किंबहुना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तर ती अधिकच वाढली. अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, संजय निरुपम, नसीम खान यांच्यासारखे काँग्रेस मधले अनेक छोटे मोठे नेते निघून गेले. आणखी काही निघून जाण्याच्या बेतात आहेत.
त्यामुळे खरे तर काँग्रेसच्या गढी वाड्याची दुरुस्ती किंवा डागडूजी जेव्हा केव्हा व्हायची तेव्हा होईल, काँग्रेसची अख्खी बिल्डिंग रीडेव्हलपमेंटला जेव्हा जायची तेव्हा जाईल, पण निदान काँग्रेसला आज गळती रोखण्यासाठी एका प्लंबरची गरज आहे. त्या प्लंबरने काँग्रेसच्या वाड्याच्या नळांची तरी दुरुस्ती करावी, जेणेकरून काँग्रेस मधून होणारी गळती थांबेल… आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीला जेमतेम सामोरे जाता येण्याइतपत काँग्रेसमध्ये “पाणी” उरेल!! अन्यथा ते उरलेसुरले “पाणी” देखील वाहून जायला वेळ लागणार नाही आणि मग देशात किंवा महाराष्ट्रात जो काही दुष्काळ पडायचा तो पडला असला, तरी तिथे टँकर लॉबी मार्फत पाणी पुरवता येईल. पण काँग्रेसच्या पडलेल्या गढी वाड्याला पाणीपुरवठा कोण करणार??, हा प्रश्न जसाच्या तसा उरेल. म्हणून काँग्रेसने निदान आपल्या गढी वाड्याचे नीट प्लंबिंग करून घेऊन गळती रोखावी एवढीच अपेक्षा!!
Congress actually needs a whole building redevelopment
महत्वाच्या बातम्या
- राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या फाईलींचे कपाट तुम्हीच मोदी साहेबांना उघडायला सांगा; अजितदादा गटाचा पवारांना टोला!!
- अखिलेश यादव यांनी कन्नौजमधून दाखल केली उमेदवारी, जाणून घ्या, यादव कुटंबाकडे किती संपत्ती?
- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही 2019 च्या तुलनेत 88 जागांवर झाले कमी मतदान!
- मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडी 8 मे पर्यंत वाढवली