• Download App
    ईडी असो वा सीबीआय... बंगाली वाघीण दिल्लीशी टक्कर घेतीये आणि महाराष्ट्रातून...?? Bengali leader has guts to fight with Modi but Maharashtra leader has no guts to take on Modi and central BJP

    ईडी असो वा सीबीआय… बंगाली वाघीण दिल्लीशी टक्कर घेतीये आणि महाराष्ट्रातून…??

    विनायक ढेरे

    पश्चिम बंगाल मधील कोळसा घोटाळ्यात ईडीच्या चौकशीला त्यांच्या दिल्लीतल्या कार्यालयात आठ तास सामोरे जाऊन बाहेर आल्यानंतर तृणमूळचे नेते अभिषेक बॅनर्जी चिडू शकतात. खवळू शकतात. चवताळू शकतात. भाजपला समोर जाऊन अंगावर घेऊ शकतात. किंबहुना भाजपला प्रत्येक राज्यात जाऊन ठोकायची भाषा बोलू शकतात…!! Bengali leader has guts to fight with Modi but Maharashtra leader has no guts to take on Modi and central BJP

    ईडीच्या दिल्ली कार्यालयात आठ तास चौकशीला सामोरे जाऊन बाहेर आल्यावर अभिषेक बॅनर्जी पत्रकारांना काय म्हणाले…??, “भाजप आमच्या विरोधात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स असली कोणतीही हत्यारे वापरू देत. आमचा राजकीय पराभव करता येत नाही म्हणून ते असल्या हत्यारांचा वापर करतात. पण आम्ही झुकणार नाही. वाकणार नाही. 2024 मध्ये त्यांचा पराभव करूच करू. सगळ्या भाजपशासित राज्यांमध्ये जाऊन त्यांना कडवे आव्हान देऊ…!!” ही हिंमत त्यांनी कुठून आणली…?? कोणी भरली त्यांच्यात ही हिंमत…?? अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे भाचे आहेत. यात सगळे आले…!!

    … पण मग महाराष्ट्रातून केंद्रातल्या भाजपला असे कडवे आणि कट्टर आव्हान देणारा, खऱ्या अर्थाने ठोकून काढणारा आवाज का नाही निर्माण होऊ शकत…?? ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तर बंगाल आणि महाराष्ट्रात दोन्ही राज्यात अनेकांच्या पाठीमागे हात धुऊन लागलेय. बंगालमध्ये त्याची संतप्त, तीव्र प्रतिक्रिया उमटू शकते. पण महाराष्ट्रातून मात्र नुसत्या तोंडाच्या वाफा निघू शकतात किंवा रोखठोक मधून लेखण्याच का कुरकुरत बसतात…?? असे का घडते??

    बंगालची वाघीण भाजपला यशस्वी टक्कर देऊन देशभर राजकीय थैमान घालण्याची क्षमता राखू शकते आणि महाराष्ट्रात मात्र फक्त पत्रकार परिषदांमध्ये आवाज उठवून दिल्लीत भाजपच्या अति वरिष्ठांशी फक्त “पत्रापत्री” खेळायची वेळ का येते…?? बंगालमधून भाजपशी खऱ्या अर्थाने टक्कर घेण्याचा हुंकार उठू शकतो, पण महाराष्ट्रातून मात्र ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांना सामोरे जाण्याची आणि सामोरे जाऊन त्यांच्यावर मात करण्याची हिंमत का
    नाही होऊ शकत…?? नेमकी कशात खोट आहे…?? नेतृत्वात…?? की अनुयायांमध्ये…??



    बंगालमध्ये आपल्याला हवी तशी सत्ता राबवून दिल्लीच्या सर्व तपास संस्थांच्या चरकात पिळून निघून सुद्धा मोठा हुंकार भरला जातो. पण महाराष्ट्रात मात्र यातले काही का घडत नाही…?? हा राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे?? की संपूर्ण महाराष्ट्राने ज्यांच्यावर दिल्लीचे नेतृत्व करण्याची क्षमता असण्यावर विश्वास दाखविला त्यांची अक्षमता, अपात्रता किंवा दुबळेपणा आता उघड्यावर आलाय…??

    त्यांची भाषा तर राणा भीमदेवी थाटाची पण राजकीय कृती मात्र दिल्लीपुढे झुकण्याची…!! ही कृती महाराष्ट्रातल्या बड्या नेत्यांना का करावी लागते…?? घोडे कुठे पेंड खातेय…?? कोणाचे हात कोणत्या दगडाखाली अडकलेत…?? लूकआऊट नोटीस निघून २४ तास उलटले तरी ते अजून सापडत का नाहीत…?? कोणी दडवून ठेवलेय त्यांना…?? ते सापडले तर भीती कोणाला वाटते…?? आणि भीती तरी कशाची वाटते आहे…?? चौकशीला – तपासाला उघडपणे सामोरे जाण्याची हिंमत का होत नाहीये…?? तपासातून कोणाला आणि काय बाहेर येण्याची भीती वाटतेय…?? या “भीती”मध्येच दिल्लीपुढे झुकण्याचे खरे “रहस्य” दडले आहे काय…??

    याचे उत्तर महाराष्ट्राला मिळाले पाहिजे. ते कोणाच्या रोखठोक मधून किंवा कुठल्या कट्ट्यावरून – वट्यावरून किंवा मराठी पेपरमधून स्वत:च्या राजकीय मुत्सद्देगिरीच्या नुसत्या बातम्या पेरून हे उत्तर मिळणार नाही. हे उत्तर खऱ्या अर्थाने दिल्लीशी टक्कर घेण्याची हिंमत दाखवूनच द्यावे लागेल. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या चौकशीला सामोरे जाऊन त्यांना पुरून उरून बाहेर येऊन दिल्ली विरोधी हुंकार भरण्यानेच मिळेल अन्यथा “महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकत नाही”, असे ट्विटर अकाउंटवर फुकाचे ब्रीद वाक्य मिरवून सहकारी बँका, साखर कारखाने, बिल्डर लॉबी यांच्यासाठी दिल्लीतल्या राज्यकर्त्यांना अर्ज – विनंत्या पत्रे लिहिण्याचे “भाग्य” नशिबी येत राहील. किंबहुना हीच त्यांची खरी राजकीय पात्रता आहे हे मान्य करावे लागेल.

    बंगालच्या वाघिणीत आणि महाराष्ट्रामधल्या लबाड लांडग्यांमध्ये हाच तर फरक आहे…!! आणि तो उघड्यावर पडून दिसू लागला आहे…!!

    Bengali leader has guts to fight with Modi but Maharashtra leader has no guts to take on Modi and central BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Thackeray -Pawar : ऐक्य + बैठकांच्या कोरड्या बातम्या; प्रत्यक्षात भाजप प्रणित सरकारला धक्का लावता येत नसल्याच्या निराशा!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    पवार काका – पुतणे आतून एकत्र, फक्त मतभेदांच्या नाटकाचे रचलेय नेपथ्य!!