• Download App
    आला अंगावर, घेतला शिंगावर... | a inspiring story how journalist won battle against corona

    आला अंगावर, घेतला शिंगावर…

    a inspiring story how journalist won battle against corona

    ठणठणीत प्रकृती असताना अचानकपणे भोवळ येते आणि कोरोनाचे निदान होते… ज्याच्यामुळे जग भयचकित आहे, अशा कोरोनाशी प्रत्यक्षात दोन हात करताना आणि अंतिमतः त्यावर मात करतानाचा हा जिवंत, थेट, भिडणारा, रसरशीत अनुभव… जरूर वाचण्यासारखा… a inspiring story how journalist won battle against corona


     

    हा वैद्यकीय सल्ला, उपदेश नाही. केवळ स्वानुभव आहे. ज्यानं-त्यानं कृपया स्वतःच्या जबाबदारीवर वाचावं.

    ऋतू म्हणून उन्हाळा हा लहानपणापासूनच आवडीचा. अनेकांना हिवाळ्यातली थंडी गुलाबी वाटते. पावसाळयातला पाऊस मदमस्त वाटतो. त्यात गंमत आहेच. पण कडक उन, लांबलचक दिवस, रेंगाळणारी दुपार, मोकळं निळं आकाश, स्वच्छ सूर्योदय आणि सूर्यास्त ही मजा उन्हाळ्यातच. वळवाच्या सरींसोबत येणारा औटघटकेचा गारवा किती रुजून बसतो. तापत्या दिवसानंतर हळुहळू थंड होत जाणारी संध्याकाळ आणि पहाटेची मंद झुळूक. चैत्रानंतर गर्द होत जाणारी कडुनिंबाची सावली, गुलाबी-पोपटी पानांनी नवी होणारी चिंच. टपोऱ्या माणकांनी लगडून जाणारा वड आणि लालसर पानांनी चहुअंगानं लसलसणारा अश्वत्थ पिंपळ वैशाख वणव्यातलाच. तामण, बहावा, गुलमोहराच्या उधळणीचं सुख पेटत्या सूर्याखालीच पाहावं. मोगऱ्याची धुंदी, आंबटगोड कैऱ्या-आंबे, करवंदांच्या जाळ्या, जांभळाचे सडे वसंतातच. कोकीळची सादही ऐन ग्रीष्मातली. उन्हाळा म्हणजे सर्वार्थानं सृजन. चकाकत्या रंगांचा, गंधाचा आणि नानाविध स्वादांनी भरगच्च असणारा दुसरा ऋतू नाही.

    पण यंदा सलग दुसऱ्यांदा माझ्या लाडक्या उन्हाळ्याला कोरोनाचं ग्रहण लागलेलं. पाहता पाहता होळी पोर्णिमा मागे पडली. रंगपंचमीही कोरडीच गेली. मुक्तपणे बागडण्याचं बिनपैशाचं सुखसुद्धा कोरोनामुळं पारखं झालं. मोकळेपणानं फिरण्याची सोय राहिली नाही. जिवंत माणूस जरी समोर उभा ठाकला तरी त्याच्याआधी त्याच्याआडून अदृश्य कोरोनाचीच गडद छाया दिसावी असे शंकेखोर दिवस. हा कोंडवाडा झुगारून द्यावा एकदा, टपोऱ्या उन्हात अंगभर निथळून निघावं म्हणून 6 एप्रिलला घराबाहेर पडलो. डोक्यावर टोपी ठरवून घातली नव्हती. डोळ्यांवर गॉगल मात्र होता. वेळही निवडली बरोबर मध्यान्हीची. बारा वाजून गेल्यानंतरची. पुणे परिसरात आसपास टेकड्या, डोंगर पुष्कळ. नेहमीची आवडती टेकडी जवळ केली. उन्हाचा पूर्ण आनंद लुटत डोंगरावर चढ-उतार चालू केली. खिशातल्या स्मार्ट फोननं केलेल्या नोंदीनुसार 12.63 किलोमीटर एवढं अंतर दुपारी साडेबारा ते सव्वादोन दरम्यान कापलं. जे हवं होतं ते मिळालं. अंग मस्त पेटलं. घामानं भिजलो. घरी आलो. थंड पाण्यानं तहान भागवण्याचं सुख उपभोगलं. गार पाण्याखाली नव्हे आनंदधारांखालीच म्हणा ना…अर्धा तास उभा राहिलो.

    यंदाच्या उन्हाळ्यातली पहिलीच दुपार हवी तशी घालवली. तनमन प्रसन्न झालं. रोजच्याप्रमाणं मध्यरात्रीपर्यंत कार्यालयीन काम करुन घरी परतलो. ‘निद्रादेवीची आराधना’ वगैरे भानगडी अजून तरी कराव्या लागत नाहीत. पाठ टेकताक्षणी झोपून गेलो. बुधवारी सकाळी जाग आली तेव्हा अंग सणकून दुखत होतं. अंग म्हणजे गात्र नी गात्र. स्वाभाविकपणे पहिली प्रतिक्रीया मनात उमटली ती अशी – ”उन लागलं. पुरता शहरी झालायसं तू. तुला वीस वर्षं झाली पुण्यात येऊन. वयही तितकंच वाढलं की.” दुसरं मन म्हणालं, ” छ्या…एवढं उन लागत असेल तर काय उपयोग? पुण्यातल्या पारा अजून चाळीशीपारसुद्धा गेलेला नाही. अजूनही 38-40 मध्येच घुटमळतोय. यापेक्षा कडक उन्हात आणि तेही ठार कोरड्या वातावरणात हुंदडलोय वाट्टेल तसं. एकदा नव्हे शंभरदा.” थोडा वेळ जाऊ दिला. लोळत पडलो. खरी गोष्ट अशी होती की उठण्याचं त्राण नव्हतं. सावकाशपणे जाणीव झाली की दमछाक झाल्याचं किंवा उन्हातल्या श्रमाचं हे दुखणं नव्हे. ही अंगदुखी वेगळीच आहे. गरम पाण्यानं अंघोळ केल्यावर बरं वाटेल असं वाटून शॉवरखाली अंग मस्त शेकून घेतलं पंधरा-वीस मिनिटं. ताजतवानं वाटलं. आलं-लिंबाचं सरबत घेतल्यावर आणखी तरतरी आली. अंगदुखी कमी झाली नाही तरी सुसह्य झाली. घराबाहेर पडलो. दुचाकीवरुन पुण्यातल्या मोकळ्या रस्त्यांवरुन छान रपेट मारली. पण हेही काही खरं नव्हतं. वरपांगी, उसनं अवसान होतं. दुपारी कार्यालयात पोहोचलो तेव्हा मला पाहिल्यावर अविनाशची पहिली प्रतिक्रीया – “अरे, किती विचित्र दिसतोय तू. काय झालंय तुला? डोळे लालबुंद आहेत. चेहरा सुकलेला.” मी थोडक्यात सांगितलं कालची दुपार टेकडीवर कशी घालवली. त्यानंतरची अंगदुखी. एव्हाना ती अंगदुखी मलाच असह्य होऊ लागली होती. खुर्चीत बसणंही नकोसं वाटत होतं. “थांबू नकोस ऑफिसमध्ये. घरी जाऊन झोप,” अविनाश म्हणाला. मीही लगेच विनाविलंब ते ऐकलं. घरी आलो आणि दुसऱ्या क्षणी झोपून गेलो. गाढ. मध्यरात्री कधी तरी जाग आली ती घसा कोरडा पडल्यानं. खूप तहान. पोटभर पाणी प्यायलो. पुन्हा झोपून गेलो. चांगली, दीर्घ झोप हे निम्म्या दुखण्यांवरचं रामबाण औषध आहे.

    कधीही अनुभवली नाही अशी अंगदुखी गुरुवारनं (दि. 8) दाखवली. गावाकडच्या शब्दात सांगायचं तर पार पेकाळून गेला. पूर्ण शक्तीपात झालाय असं वाटलं. ‘गलितगात्र’चा अर्थ क्षणोक्षणी उमगत होता. हाही दिवस झोपून होतो…की ग्लानीत कोणास ठाऊक. दिवसभर लिंबू पाण्यावरच होतो. खाण्याची इच्छाच नव्हती. चव गेल्यासारखं वाटलं जिभेची. तेव्हा पहिल्यांदा शंका आली कोरोना संसर्गाची. पण अंगात ताप नव्हता. खोकला नव्हता. श्वास घेण्यात अडचण नव्हती. तीव्र अंगदुखी वगळता कोणतंच लक्षण नव्हतं. त्यामुळं काळजी केली नाही. म्हटलं उद्या सकाळपर्यंत होईल नीट. शुक्रवारची (दि. 9) सकाळही त्याच वेदना घेऊन उगवली. पुरतं त्राण गेलं होतं. बुधवारी रात्रीनंतर काही खाल्लेलं नव्हतं. आलं-लिंबू पाणी आणि डाळिंब एवढाच आहार होता. कोरोना चाचणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळांशी संपर्क साधला. दोन-तीन दिवस ‘वेटिंग’ असल्याचं सांगण्यात आलं. मग सिंहगड रस्त्यावरच्या महापालिकेच्या केंद्रात ‘टेस्टींग’ला जाण्याचं निश्चित केलं.

    गरम पाण्याच्या शॉवरखाली पुन्हा एकदा शेकून घेतलं स्वतःला. आलं-लिंबू (आणि यावेळी साखरही) पाणी घेतलं. तरतरी आल्याचा भास झाला. ठरवलं की कोरोना टेस्टींगसाठी स्वॅब देऊ, पत्रकार संघातली दोन कामं उरकून घेऊ आणि मस्त भोजन करुन घरी येऊ. तसं घडलं नाही. दत्तवाडीतून जात होतो तेव्हाच लक्षात आलं की बाईकवर एकटा येऊन चूक केलीय. शरीर कोणत्याच पद्धतीनं साथ देत नव्हतं. पु. ल. देशपांडे उद्यानाजवळच्या महापालिका केंद्रात कसाबसा पोहोचलो. अर्ज भरण्याची प्राथमिकता पूर्ण केली. ”दहा वाजता टेस्टिंग चालू होईल, तोवर थांबावं लागेल,” हे ऐकून एका खुर्चीत शांत बसलो. दहाचे साडेदहा, पावणेअकरा झाले तरी टेस्टिंग काही चालू होईना. मला इकडे बसवतं नव्हतं. अंगातून घामाच्या धारा सुरु झाल्या. शर्ट पूर्ण ओला होईपर्यंत घामेजलो. घसा कोरडा पडला. बोलण्याचं त्राण नव्हतं. उठवतंही नव्हतं. प्रयत्न करुन मी तिथल्या डॉक्टरांकडे गेलो. त्यांना म्हणालो, “मला खूप अस्वस्थ वाटतं आहे. कृपया लवकर चाचणी घ्या आणि मोकळं करा मला. बसणंही अशक्य झालं आहे. घरी जाऊ द्या लवकर. थोडं पाणीही द्या प्यायला?” डॉक्टरांनी पाण्याची बाटली दिली आणि लगेच ‘टेस्टिंग’ला घेतो असं सांगितलं. तिथून जेमतेम चार पावलांवर असलेल्या खुर्चीत येऊन मी बसलो….आणि त्यानंतरच्या दीड तासातलं मला स्पष्ट काही आठवतं नाही.

    “मी बेशुद्ध झालो. चक्कर येऊन तिथेच कोसळलो,” असं मला नंतर सांगण्यात आलं. मला पुसट आठवतं ते असं – डॉक्टरांनी दिलेलं पाणी घेत असताना मला चक्कर आली. मी खुर्चीतून पडतोय हे मला जाणवलं. त्याचवेळी डॉक्टर माझ्याकडं पळत येत असलेलं मी पाहिलं. त्यांच्यासोबत दोन-तीन परिचारीका आणि अन्य वैद्यकीय कर्मचारी होते. त्यांच्यापैकीच एकानं माझा फोन घेत इमर्जन्सी आहे, कोणाला फोन लावू…असं विचारलं. त्यावर मीच त्यांना अविनाशचा फोन लावून दिला. स्ट्रेचर नसल्यानं सहा-सात जणांनी मला उचलून आतल्या बाजूला खाटेवर नेऊन ठेवलं. मी मनातून शांत होतो. अजिबात घाबरलो नव्हतो. त्यानंतर माझ्या दोन्ही हातांमध्ये सुया खुपसल्या जात असल्याचं समजलं. सलाईन लावण्यासाठी त्यांना शीर सापडत नव्हती. तीन-चार ठिकाणी सुया खुपसून झाल्यावर एकदाची ती सापडली. त्यानंतर आठवंत ते मला अँम्ब्युलन्समधून एका प्रथितयश रुग्णालयात घेऊन चालल्याचं.

    दरम्यान माझी अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. मी कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. रुग्णालयात अँम्ब्युलन्स पोहोचली तेव्हाही मी अर्धवट ग्लानीत होतो. अंगात जराही त्राण नव्हतं. अंगदुखी सोसवत नव्हती. रुग्णालयात रुग्णांची प्रचंड गर्दी होती. मला आपत्कालीन सेवा विभागात नेण्यात आलं होतं. तिथं गेल्यानंतर पुन्हा सलाईन लावण्यात आली. अर्ध्या तासानंतर मी ग्लानीतून बाहेर आलो. एकामागून एक तीन-चार डॉक्टर माझ्याकडे येऊन गेले. एकाने चक्कर येण्याच्यावेळची चौकशी केली. डोळ्यापुढे अंधारी आली का, डोकं दुखतंय का, डावा पाय उचला, उजवा पाय उचला, उजवा हात-डावा हात….वगैरे करुन झालं. चक्कर येण्याचा आणि मेंदुचा काही संबंध आहे का हे त्यांना पाहायचं होतं. दरम्यानच्या काळात माझा रक्तदाबही एकदम योग्य होता.

    नंतर ‘शिफ्ट इनचार्ज’ डॉक्टर आल्या. त्यांनी प्रश्नांची सरबत्ती चालू केली. त्याचा गोषवारा असा होता – कोण आहेत हे पेशंट? आत्तापर्यंत 23 फोन येऊन गेले. खाटांची उपलब्धता अजिबात नाही. तरीही आम्ही तुमच्यासाठी व्यवस्था करतोय. पण कृपया आम्हाला अर्धा तास तरी द्या. आत्ता तुम्हाला काय होतंय नेमकं ते सांगा प्लीज?

    एव्हाना मी बऱ्यापैकी ठीक झालो होतो – माझेही प्रश्न सुरु झाले. माझा रक्तदाब ठीक आहे ना? ऑक्सिजन पातळी ठीक आहे ना? अंगदुखी आणि कमालीचा अशक्तपणा वगळता मला काहीही त्रास नाहीए. डॉक्टर म्हणाल्या की, सगळं नॉर्मल आहे. पण तुम्ही बेशुद्ध झाल्यानं काळजी वाटतेय.

    त्यावर मी आत्मविश्वासानं म्हणालो, “त्यात मला फार काळजीचं कारण दिसत नाही. गेल्या दोन-तीन दिवसात मी त्या अर्थानं काही खाल्लेलं नाही. त्याचा परिणाम असणार. पण तुमच्या सलाईनमुळं आता मला हुशारी वाटतेय.” डॉक्टर म्हणाल्या की, शहाळ्याचं पाणीही घ्या.

    तोवर त्या रुग्णालयाचे साथरोग प्रमुख मला पाहण्यास आले. त्या ‘तेवीस फोन कॉल्स’चा परिणाम असणार. बड्या रुग्णालयांमध्ये एक बरं असतं. लगेच तुमची फाईल तयार होते. सगळे रिपोर्ट, आकडेवारी पाहात डॉक्टर म्हणाले की तुमच्या खाटेची व्यवस्था झालीय. तातडीने ऑक्सिजन लावुयात. सगळं ठीक होईल. मी विचारलं, “पण त्याची गरज आहे का?” डॉक्टर म्हणाले की, चोवीस तास आपण काळजी घ्यायला हवी.

    हा क्षण महत्त्वाचा होता. डॉक्टरांच्या दृष्टीने ते बरोबर बोलत होते. आता निर्णय रुग्ण म्हणून मला घ्यायचा होता. मला आतून स्पष्ट जाणवत होतं की बेशुद्ध झालो त्यामागे गेल्या चोवीस तासातला उपास हे मुख्य कारण होतं. ऑक्सिजन पातळी जर ठीक आहे, अंगात ताप नाही तर मग विनाकारण रुग्णालयातली खाट अडवून का ठेवायची? केवळ पैसे, सत्ता किंवा अन्य प्रभावाचा वापर करुन अकारण भरती होणाऱ्यांचे बरेच किस्से ऐकून होतो. त्या अप्पलपोट्या गर्दीचा भाग व्हायची इच्छा नव्हती माझी.

    माझा निर्णय झाला. मी डॉक्टरांना म्हणालो, “थॅंक यू डॉक्टर. पण मला वाटतं की मी घरीच विलगीकरणात राहावं. काही वाटलं तर पुन्हा येतो.” डॉक्टर म्हणाले, “निर्णय तुम्ही घ्या. पण आम्ही खाट ठेवतोय तुमच्यासाठी. केव्हाही सांगा. कधीही या.” डॉक्टरांनी पंधरा दिवसांच्या गोळ्या, कधी कोणत्या रक्त चाचण्या करायच्या हे पानभर लिहून दिलं.

    एव्हाना दुपारचे दीड-दोन झाले होते. सकाळी नऊ ते दोनच्या दरम्यान बरंच रामायण घडून गेलं. शरीरात तीन सलाईन आणि पोटात दोन शहाळी गेली होती. दोन-तीन इंजेक्शनही टोचून झाली होती. या सर्वाचा परिणाम म्हणून अंगदुखी अचानक कमी झाल्यासारखं वाटलं.

    शुक्रवार (9 एप्रिल) पासून चौदा दिवस गृह विलगीकरणात राहणं मी स्वीकारलं. आंघोळ करताना साबणाचा सुगंध आलाच नाही. नंतर आलं-लिंबाचीही चव लागेनाशी झाली. पण आश्चर्य म्हणजे गेले तीन दिवस असह्य झालेली अंगदुखी एकदम कमी झाली होती. ताप तर गेल्या चार दिवसात एकदाही आला नव्हता.

    डॉक्टरांनी गृह विलगीकरणासाठीची औषधं आणि सूचना ताव भरुन लेखी दिल्या होत्या.

    1) ताप, डोकेदुखी, अंगदुखी असेल तर – पॅरासिटामॉल (650 एमजी), दिवसात दोन
    2) व्हिटॅमिन म्हणून बिकॉझिंक (दिवसातून एक) आणि सेलीन (दिवसात दोन)
    3) अपराईज डी 360 के – आठवड्याला एक याप्रमाणे चार आठवड्यांसाठी
    4) अँसिडीटीसाठी – पॅन 40 सकाळी एक.
    5) खोकल्यासाठी सिरप – टॉसेक्स
    6) रक्त पातळ ठेवण्यासाठी इकोस्प्रीन – दुपारी एक

    शिवाय, दर सहा तासाने शरीराचं तापमान आणि ऑक्सिजनचे प्रमाण पल्स ऑक्सिमिटरने मोजण्यास सांगितलं.

    14 एप्रिल या दिवशी रक्ताच्या CBC/CRP/D-Dimer/Ferritin/LFT/RFT या चाचण्या करण्यास सांगितलं.

    डॉक्टरांनी सांगितंल ते माझ्या काळजीपोटीच. पण परिस्थितीनुसार मीच त्यात परस्पर बदल करत गेलो. म्हणजे असं की – व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा डोस पूर्ण केला.
    पॅरासिटामॉल (650 एमजी) ही गोळी शनिवारनंतर बंद केली.
    खोकला नव्हता त्यामुळं टॉसेक्सची गरज पडली नाही.
    इकोस्प्रिन गोळी रविवारनंतर बंद केली.
    अपराईज डी 360 के ही गोळी एकदाच घेतली.

    मी डॉक्टर नसताना त्यांचा सल्ला न ऐकण्याचं हे धाडस मी का केलं? पाच कारणांमुळं.
    1) मला एकदाही ताप आला नाही.
    2) माझी ऑक्सिजन पातळी कधीच 95 च्या खाली आली नाही.
    3) श्वासोच्छ्वास करताना मला कधीही त्रास झाला नाही.
    4) माझं डोकं कधी दुखलं नाही.
    5) कोरोना पॉझिटिव्ह आलो त्या दिवसानंतर (शुक्रवार, 9 एप्रिल) माझी अंगदुखी लक्षणीयरित्या कमी होत गेली. याचा अर्थ मी असा काढला की कोरोना चाचणीला गेलो, चक्कर आली तोच दिवस संसर्गाचा सर्वोच्च बिंदू होता. त्यानंतर शरीराचा प्रतिकार आणखी वाढला आणि विषाणु निष्प्रभ ठरण्यास सुरुवात झाली.

    एकुणात काय तर सुधारणा होत होती. अशक्तपणा मात्र जाणवत होता. चव-गंधाची जाणीव नसल्यानं खाण्यापिण्याची वासना गेल्यासारखं झालं होतं. त्यामुळं खाण्यापिण्याची इच्छा होत नव्हती. पहिल्या चार दिवसात झोप मात्र भरपूर घेतली. अगदी दिवसातले चौदा-पंधरा तास झोपेत घालवले. यापूर्वी इतकं झोपल्याचं कधी आठवत नाही. कुठं तरी वाचलं होतं की प्राणी त्यांना बरं वाटत नसलं की शक्यतो काही न खातापिता एका जागी पडून राहतात. फक्त भरपूर झोप आणि मिताहार यामुळंच निम्मे आजार बरे होतात. ही निसर्गाची रीत आहे. विषाणूजन्य आजाराला हे किती लागू होतं मला सांगता येणार नाही. पण अंगदुखी ओसरु लागली होती. अशक्तपणा दूर होत होता. हा परिणाम घेत असलेल्या मर्यादीत गोळ्यांचा की भरपूर विश्रांतीचा? दोन्हीचा असावा.

    कोरोना बाधित असल्याच्या चाचणीनंतर खूप फोन येऊन गेले. पण बहुतेकवेळा मी जागा नसल्याने त्यांना उत्तर दिलं गेलं नाही. सख्ख्या मित्रांना वाटलं की माझी स्थिती भयंकर खालावली आहे आणि त्यामुळं आता माझं काही न ऐकता मला उचलून रुग्णालयात टाकलं पाहिजे. प्रेमातून आलेली ही काळजी होती. अविनाशला राहवलं नाही. तो घरी आला. दरवाजात उभं राहून त्यानं फोनाफोनी चालू केली. प्रथितयश डॉक्टरांसोबतच्या कॉनकॉलमध्ये मला घेण्यात आलं. फोनवरुन पुन्हा माझी चौकशी, मार्गदर्शन, सूचना हा क्रम पार पडला. सरतेशेवटी आधी काही चाचण्या तातडीनं करुन घ्याव्यात आणि त्यानंतर गरजेनुसार रुग्णालयात दाखल व्हावं, यावर मी सगळ्यांना राजी करण्यात यशस्वी झालो.

    चाचण्यांसाठी सोमवारचा (दि. 12 एप्रिल) दिवस मुक्रर झाला. पुण्यातल्या आणखी एका मान्यताप्राप्त रुग्णालयात भल्या सकाळी आमची स्वारी दाखल झाली. ‘व्हीआयपी पेशंट’ (!) असल्याची वर्दी माझ्या मित्रांमुळे परस्पर पिटली गेली होती. त्यामुळं ‘वेटिंग’ वगैरे सोपस्कारात अडकावं लागलं नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग कितपत झालाय हे पाहण्यासाठी छातीचा एक्स-रे आणि फुप्फुसाची कसली तरी चाचणी करायची होती. आधी एक्स-रे काढला. तो पाहून डॉक्टर म्हणाले की काळजीचं काहीच कारण दिसत नाही. सगळं नॉर्मल आहे.

    लागलीच मी माझा निर्णय ऐकवला. मग आता दाखल होण्याची आणि फुप्फुसाची चाचणी करण्याची गरज वाटत नाही मला. कृपया अनुमती द्यावी. डॉक्टर म्हणाले, “गृह विलगीकरणाचं आमचं पॅकेज घ्या. अमुक ठिकाणी तमूक रक्कम भरा.” डॉक्टरांना मी नम्रपणे सांगितलं की सध्या मी गृह विलगीकरणातच आहे आणि दुसऱ्या एका रुग्णालयानं दिलेली औषधं घेतो आहे. त्यावर डॉक्टर म्हणाले की तरी आमचं पॅकेज घ्या. लवकर बरे व्हाल. मी त्यांना नको म्हणून सांगितलं. तरी ‘व्हीआयपी पेशंट’ असल्याचा निरोप आल्यानं असेल बहुधा त्यांनी आणखी एक औषध चिठ्ठी लिहून दिलीच. ही यादी पहिल्यापेक्षाही मोठी होती.
    1) Fabiflu 400 mg – पहिले दोन दिवस सकाळ-संध्याकाळ साडेचार गोळ्या. त्यानंतर पुढचे दहा दिवस सकाळ-संध्याकाळ दोन गोळ्या
    2) Doxy 100 mg – सकाळ-संध्याकाळ एक
    3) Limcee 500 – सकाळ-संध्याकाळ एक
    4) Becozinc – दुपारी एक
    5) Paracetamol 500 – ताप, अंगदुखी असल्यास दिवसात दोन
    6) Ecosprin 75 mg – दुपारी एक

    आभार मानून बाहेर आलो. अविनाश थोरात सोबत होता. त्याला म्हणालो ‘ही औषधचिठ्ठी अशीच खिशात ठेवतो. ही औषधं घेण्याची गरज मला वाटत नाही.’ एक विनोदही त्याला ऐकवला. ”आजारी पडलं की डॉक्टरकडे जावं. तो सांगेल ते ऐकावं. त्याचे पैसे द्यावेत कारण त्याला जगायचं आहे. त्यानं दिलेली औषधचिठ्ठी घेऊन दुकानात जावं. औषंध घ्यावीत आणि त्याचे पैसे अदा करावेत कारण दुकानदाराला जगायचं आहे. औषधं घेऊन घरी यावं आणि सरळ ती फेकून द्यावीत कारण तुम्हालाही जगायचं आहे.” वैद्यकीय व्यवस्थेबद्दल कणभरही अनादर व्यक्त करण्याचा हेतू नाही. पण मानसिकता अशी की शक्यतो डॉक्टरांकडे जायचंच नाही. औषध-गोळ्या, इंजेक्शनऐवजी घरगुती उपचार, दोन-चार दिवस अंगावर काढूनच बरं व्हायचं. महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी कुटुंबांमधली, सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये हीच प्रथा असते. मी काही जगावेगळं थोडंच सांगतोय? माझं बालपण असंच गेलं. आई-वडिलांना असंच वागताना पाहिलं. एवढंच काय पण गावाकडचे आमचे डॉक्टरसुद्धा असेच जुन्या जमान्यातले, भले गृहस्थ होते. आला पेशंट की दे औषध-गोळ्या, टोच इंजेक्शन असले प्रकार त्यांना कधीच आवडले नाहीत. “आला पेशंट की टोच त्याला,” ही व्यावसायिकता त्यांनी कधी दाखवली नाही त्यामुळं अलिकडच्या काळात त्यांच्याकडची गर्दी एकदम कमी झाली. ‘इन्शुरन्स’ची लफडी वाढली गेल्या दोन-अडीच दशकात. त्यामुळं वैद्यकीय उपचार पद्धती पुरत्या बदलल्या आणि अनेक वाईट पायंडे पडले. असो. तर अविनाशला सांगून ती औषधांची भलीमोठी यादी तशीच सुरनळी करुन खिशात ठेवली. रुग्णालयाबाहेर आलो, दोन शहाळी प्यायलो. थेट घरी आलो.

    डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं न घेताही ताप नाही, ऑक्सिजन पातळी योग्य, अंगदुखी ओसरलेली, डोकेदुखी नाही अशी स्थिती होती. झोप गाढ आणि शांत. चव नसली तरी भूक लागत होती. नैसर्गिक विधी वेळच्यावेळी, विनाअडथळा. रविवारपासूनच गाडी पूर्वपदावर येऊ लागली होती. पण सोमवारी काढलेल्या एक्स-रेमध्ये काहीही चिंताजनक न आढळल्यानं आत्मविश्वास आणखी वाढला.

    सोळा दिवसांची शिदोरी…
    1) आपलं काय होणार, मरणार की वाचणार, कोरोना संसर्गाचं स्वरुप काय असेल असलं काहीच एकदाही मनात आलं नाही. त्यासाठी ‘थिंक पॉझिटिव्ह’ वगैरे थेरं मुद्दाम करावी लागली नाहीत. मरण एक तर नैसर्गिक यावं किंवा वीरमरण. अपघाती आलं तर तेसुद्धा किमान दोनशे-तीनशेच्या वेगानं बाईक चालवताना. किंवा एव्हरेस्टरवर पोहोचावं आणि हिमवादळात गोठून जावं. किंवा विमानातून पॅराशुटसह उडी घ्यावी आणि पॅराशुटच उघडू नये…असा काही तरी भव्यदिव्य अपघात घडावा. पण ‘तरुणपणी एका फुटकळ विषाणूच्या संसर्गानं मी मेलो’ ही कल्पनासुद्धा मला आजारपणातही करवत नव्हती.

    2) मी बरा होणार असल्याची खात्री वाटत होती कारण ऑक्सिजन पातळी कधीच धोकादायक स्थितीला गेली नाही ना कधी ताप, खोकला आला.

    3) डॉक्टरांनी सांगितलेले औषधोपचार पूर्ण केले नाहीत, काही औषधं अजिबातच घेतली नाहीत, काही चाचण्या अजूनही केल्या नाहीत यामागं उद्दामपणा नव्हता. सांगितलेलं ऐकायचं नाही, असा उद्धटपणा नव्हता. तर शरीर आतून जे सांगत आहे ते मी ऐकत गेलो, त्यावर विश्वास ठेवला.

    4) व्हॉट्स अँप, वृत्तवाहिन्या, नियतकालिकं यांना चौदा दिवस आयुष्यात जराही थारा दिला नाही. त्यानंतरही व्हॉट्स अँपचा वापर अगदी मर्यादीत ठेवला. कोरोना पूर्वकाळापासूनच वृत्तवाहिन्या आयुष्यातून जवळपास पूर्ण वजा केल्या आहेत. कोरोनाबाधीत झाल्यापासून नियतकालिकांना अजूनपर्यंत दूर ठेवलं आहे. यामुळं अडलं काहीच नाही; उलट अनावश्यक माहिती, खरे-खोटे तपशील, लागू-गैरलागू संदर्भ आदींचा कचरा मनात-मेंदुत साठणं बंद झालं.

    5) भरपूर पुस्तकं वाचली. सिनेमे पाहिले. लहानपणी घरी टीव्ही नसल्यानं अनेक क्रिकेट सामने बघायचे राहिले होते. यु-ट्यूबवर त्या सामन्यांचा आनंद मनापासून लुटला. या सगळ्यामुळं मन प्रसन्न राहिलं.

    6) दिवसातून अमुकवेळा वाफ घ्या, सारखं गरम पाणी प्या, तमूक काढे प्या यातला कोणताच उपाय गेल्या सोळा दिवसात एकदाही केला नाही. दीर्घ श्वसनाचा व्यायाम मात्र जरुर केला.

    7) ‘वॉटर इन टेक’ वाढवा, आहारात ‘प्रोटिन्स’ वाढवा हेही अट्टाहासानं मुळीच केलं नाही. ‘शरीराला गरज पडली की तहान लागतेच,’ या सूत्रानुसार पाणी घेत होतो. ज्वारीची भाकरी, पालेभाजी, वरण, तुप-गुळ हाच आहार प्रामुख्यानं होता. चव यावी म्हणून लिंबाचं लोणचं चाखत होतो. जेवणात कच्ची काकड़ी, टोमॅटो, गाजर असायचं. मांसाहार अजिबातच नाही. डाळिंब, केळं, आंबा, कलिंगड, द्राक्षं, पपई यातलं एक तरी फळ रोज भरपूर प्रमाणात खात होतो. चहा-कॉफी घरी कधीच घेत नाही. कोरोनाकाळातही त्याची आठवण होण्याचं कारण नव्हतं.

    8) सकाळी दहानंतरच्या उन्हात रोज अर्धा तास तरी बसत होतो. डी जीवनसत्त्व किती मिळालं माहिती नाही, पण ते मिळत आहे ही भावनाच उर्जा देत होती.

    9) सगळ्यात महत्त्वाचं – मनाची उमेद कायम होतीच. शरीरालाही तयार करायचा निर्णय घेतला. 22 एप्रिलपर्यंत गृह विलगीकरणाचा कालावधी होता. पण रविवारी (दि. 18 एप्रिल) संध्याकाळी एकांतवास शोधून चालत निघालो. सव्वासहा किलोमीटरची रपेट मारुनच थांबलो. घरी आलो तेव्हा घामाने भिजलो होतो पण दमछाक अजिबात झालेली नव्हती. पाय थोडे दुखल्यासारखे वाटत होते, पण तितकं तर अपेक्षित होतं. त्यानंतर पुढचे चार दिवस दररोज घड्याळ लावून चाललो. अंतरही रोज वाढवत नेलं. 8.44 किलोमीटर (19 एप्रिल), 9.70 किलोमीटर (20 एप्रिल), 10.60 किलोमीटर (21 एप्रिल) इतकं चाललो. निकष एकच दहा मिनिटांपेक्षा कमी वेळेत एक किलोमीटर अंतर कापायचं. गुरुवारी (22 एप्रिल) विश्रांती घेतली. गृह विलगीकरणाचा शेवटचा दिवस होता म्हणून. शुक्रवारी (23 एप्रिल) अंतर आणखी वाढवलं आणि 11.44 किलोमीटर चालून आलो. शनिवारी, रविवारीही सरासरी दहा किलोमीटर चाललो. ना दमछाक झाली ना श्वासोच्छ्वासास अडला. पुण्यात आलो त्याला आता दोन दशकं झाली. या दोन दशकात नियमित व्यायाम करण्याचा संकल्प मी किमान दहा हजारवेळा तरी सोडला असेल. पण आजवर कधी तो प्रत्यक्षात उतरलेला नाही. कोरोना संसर्गानंतर तरी तो आता प्रत्यक्षात यावा, अशी अपेक्षा आहे.

    10) गेल्यावर्षी कोरोनाची साथ सुरु झाली त्यानंतर एक बातमी आली होती. युरोपातल्या दोन फुटबॉल टीम आख्याच्या आख्या कोरोनाबाधीत झाल्या होत्या.
    व्यावसायिक फुटबॉलपटूंएवढी दमदार फुप्फुसं खचितचं कोणाची असू शकतील. यावरुन तेव्हाच खुणगाठ बांधली होती की कोरोनाचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. घरात एकही दिवस न बसलेल्या आपल्याही कधी तरी हा गाठेलच. संसर्ग होणं म्हणजे माळरानावरुन अनवाणी चालताना सराटा टोचण्यासारखंच आहे. एखाद्याच्या पायाला टोचेल एखाद्याच्या नाही. पण महत्त्वाचं काय तर संसर्ग झाल्यानंतर तुमचं मन आणि शरीर त्याला कसं प्रत्त्युतर देतं? किती वेगानं, किती सहजतेनं तुम्ही त्याच्यावर मात करता? शरीर खंबीर तेव्हाच होईल जेव्हा मन आधी ठाम असेल. रक्तदाबाचा त्रास, हृदयविकार, मधुमेह आदी सहव्याधी नसल्याचा आणि वय कमी असल्याचाही फायदा मला निश्चितच झाला असेल. पण जोडीला असणारी माझी जन्मजात बेफिकीरी जास्त कामी आली असा माझा दावा आहे.

    10) फोनवरुन बऱ्याच जणांनी सांगितलं. डॉक्टरांनी कल्पना दिली. या सर्वांचा हेतू चांगला आहे. त्यांचं म्हणणं असं की कोरोना विषाणूचे परिणाम शरीरात बरेच दिवस राहतात. अशक्तपणा एक-एक दोन-दोन महिने जात नाही. बघू कसं होतं ते. आत्ता कुठे सुरुवात झालीय संघर्षाला. मात्र गेल्या सोळा दिवसातले प्रत्यक्ष कोरोनाबाधित होण्याच्या आधीचे तीन दिवस आणि बाधित झाल्याचे समजल्यानंतरचे दोन दिवस असे एकूण पाच दिवस काय तो अंगदुखीचा त्रास झाला. बाकी सध्याला माझी प्रकृती दमदार आणि मन:स्थिती गुलजार आहे.

    11) एक गोष्ट चांगली झाली या कोरोनाच्या सक्तीच्या एकांतवासात. जे आयुष्य आजवर जगलो त्याकडं वळून पाहिलं. पुढं काय, याचाही अदमास घेण्याचा प्रयत्न झाला. काही गाठी पुन्हा पक्क्या बांधल्या मनाशी. काही मुलायम निरगाठी नव्यानं जुळवल्या. कोरोना अंगावर आला खरा पण त्याला माझ्या पद्धतीनं शिंगावर घेतलंय. कोरोना विषाणूला आव्हान देण्याचं मी ठरवलंय. अर्थात यातला ‘मी’ फक्त दर्शनी. त्यामागची सगळी ताकद आहे ती 9 एप्रिलच्या शुक्रवारी रुग्णालयातल्या ‘शिफ्ट इनचार्ज’ला माझ्या काळजीपोटी गेलेल्या त्या तेवीस ‘फोन कॉल्स’ करणाऱ्यांची. सोबतीचे सख्खे मित्र कोणत्याही प्रसंगात मागे हटणार नाहीत याची खात्री असल्यानंच खरं तर माझी बेफिकिरी चौखूर उधळत राहते. असे कित्येक विषाणू येतील आणि जातील त्यांच्याविरोधातल्या ‘अँटीबॉडीज’ पुरवणारी जिवाभावाची नाती आहेत तोवर जजीवाणू-विषाणूंची काळजी करायला आहे कोण इथं मोकळं?

    (सौजन्य : फेसबुक)

    Related posts

    Thackeray brothers : म्हणे, ठाकरे बंधू एकत्र, अफाट ताकदीच्या वल्गनांना फुटले पंख!!

    Rahul Gandhi राहुल गांधींच्या तोंडून नेहरुंचे “री ब्रॅण्डिंग”, गांधीजींच्या सत्यशोधनाच्या जॅकेटचे केले “री फिटिंग”!!

    Sangram thopte संग्राम थोपटेंना काँग्रेसने दिले तोकडे बळ, पवारांनी नेहमीप्रमाणे केला विश्वासघात; थोपटेंना निवडावा लागला भाजपचा पर्याय!!