कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर चांगले शिक्षण घेण्याशिवाय तरणोपाय नाही. अर्थात येथे शिक्षण घेणे म्हणजे फक्त पदवी घेणे नाही. शिक्षण म्हणजे खरे शिक्षण, स्वतःमधील वाढ, विकास, ज्ञान, आजूबाजूच्या परिस्थितीचे भान, आपल्या भोवतालच्या समाजाचे भान या अर्थाने बघूया. Learn from the surroundings to succeed in any field
जेव्हा काही शिकता शिकता आपल्यालाही असे वाटते, की या अध्ययनातून नवी दृष्टी मिळाली, एक भान आले, तेव्हा काय बदल होतो आपल्यात असा कधी विचार करून पाहा. तेव्हा लक्षात येईल की एरवी आपल्याला जे प्रश्न पडतात, की हे जग असे का आहे, लोक असे का वागतात, सामाजिक मानसिकता कशी बदलते आहे आणि यात आपण कसे वागावे, याची सर्व उत्तरे नाही मिळाली तरी याबद्दलची स्पष्टता आपल्या मनात येऊ लागते.
आत्ताच्या कोरोनाच्या आक्रमणात पूर्ण समाजाची मानसिकता बदलून गेली आहे. अशावेळी एरवी अनेकांच्या वागण्याने नाराज होणारे आपण नकळत एकमेकांना सहकार्य करायला लागलो आहोत. यशासाठी हे चांगले वातावरण आहे असे मानले पाहिजे. आज प्रसारमाध्यमांमुळे या संकटाची कल्पना प्रत्येकाला आली आहे, संकटाला तोंड कसे द्यायचे हे शिकवले जात आहे म्हणून हे सहकार्य दिसते आहे. या शिक्षणामुळेच एका प्रकारे ही सहकार्याची भावना निर्माण झाली आहे.
जे आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांच्याबद्दल कृतज्ञता आहे. जे काम करायला नाही म्हणत आहेत, त्यांची भीती समजून घेतली जात आहे. हीच भूमिका मनाने घेतलेल्या विनम्रतेमध्ये आहे. पण महत्त्वाचा फरक संकट आल्यानंतर झालेल्या या बदलात आणि विनम्रतेमध्ये असा, की हा विनम्र भाव कोणत्याही अशा भयानक संकटाची वाट पाहत नाही. ती मनोभूमिका कशाला तरी प्रतिक्रिया नसते. तर ती एकुणातच जगण्याच्या अभ्यासातून येणारी गाढ समजूत असते.
कोणी कसाही वागो पण विनम्र माणूस हा संयत आणि समतोल राखूनच बोलताना किंवा वागताना आपल्याला दिसतो. संयत व दीर्घकालीन यश मिळवायेच असेल तर अशा वागण्याशिवाय पर्याय नाही याचे भान प्रत्येकाला आले पाहिजे हे नक्की.