Pandharpur : आषाढी वारीआधी भाविकांसाठी मोठी सूचना! 23-24 जूनला विठ्ठल मंदिर राहणार बंद; विठुरायाच्या मूर्तीचे होणार वैज्ञानिक संवर्धन
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 23 आणि 24 जून रोजी सर्व प्रकारच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. विठ्ठलाच्या मूर्तीची झीज रोखण्यासाठी आणि तिचे दीर्घकालीन संवर्धन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग (ASI) आणि राज्य पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली विशेष लेपन प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्यामुळे मंदिर प्रशासनाने या दोन दिवसांत दर्शनासाठी पंढरपूरला येऊ नये, असे आवाहन भाविकांना केले आहे.