Maharashtra SEC : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत व्हीव्हीपॅट नाहीच; कायद्यात तरतूद नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून चर्चा असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ‘व्हीव्हीपॅट’ वापरण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. व्हीव्हीपॅटचा वापर करण्यासाठी सध्याच्या कायद्यांमध्ये कोणतीही तरतूदच नाही आणि बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे तांत्रिक यंत्रणाही तयार नाही, असे आयोगाने ठणकावून सांगितले आहे. निवडणुका तातडीने घेण्याची मागणी करणाऱ्या सत्ताधारी आणि विरोधकांनाही आयोगाने एक प्रकारे कायदेशीर आणि तांत्रिक आव्हान स्पष्ट करून, व्हीव्हीपॅट वापरणे ‘सद्य:स्थितीत शक्य नाही’ असा संदेश दिला आहे.