PM Modi : हिंदुहृदयसम्राटांच्या जन्मशताब्दीस मोदींकडून आदरांजली; मराठीतून पोस्ट- बाळासाहेबांचं नेतृत्व आजही प्रेरणादायी!
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणाऱ्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून आदरांजली वाहिली आहे. आज, 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून याच दिवसापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे. या विशेष प्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा दिला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन छायाचित्रे शेअर करत, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य याविषयी गौरवोद्गार काढले आहेत.