Shinde Sena : ‘शिंदेसेना’ म्हटल्यावरून शिवसेना – ठाकरे गट समोरासमोर; आम्ही शिंदेसेना नाही शिवसेना – देसाई
विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप केला. आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखले जावे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्याने या प्रकाराची विधानभवन परिसरात खमंग चर्चा रंगली होती.