Nitin Gadkari : नितीन गडकरी म्हणाले- राजकारणात एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढले; आयाराम-गयाराम संस्कृतीवर वार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या खास मुलाखतीत सध्याच्या राजकीय प्रवाहांवर स्पष्ट आणि परखड भाष्य करत आयाराम-गयाराम संस्कृतीवर अचूक निशाणा साधला आहे. सध्या भाजपमध्ये सर्वाधिक पक्षप्रवेश होत असून, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे गटासह विविध पक्षांतील नेते भाजपमध्ये दाखल होत असतानाच, गडकरींनी या ‘प्रवेश पर्वा’कडे उपरोधिक शैलीत पाहिले. सत्ता जिथे तिथे जा आणि सत्ता बदलली की पुन्हा दुसरीकडे वळा, हे राजकारणातलं एक्सपोर्ट-इम्पोर्ट वाढलं आहे, असे म्हणत त्यांनी या प्रवृत्तीबद्दल नाराजी व्यक्त केली. भाजप ‘राष्ट्रीय प्रवेश पार्टी’ ठरत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.