Harshvardhan Sapkal : मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे स्पष्टीकरण
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाविकास आघाडीत सामील करून घेण्याच्या चर्चेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विराम दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत दिल्लीत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, मनसेकडून युतीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे सध्या यावर चर्चा करणे ‘जर-तर’च्या प्रश्नासारखे निरर्थक आहे. अशा प्रकारच्या आघाडीची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही. काँग्रेसच्या भूमिकेनुसार, ही आघाडीची चर्चा फक्त इंडिया आघाडीच्या विद्यमान भागीदारांसोबतच पुढे जाऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.