पंडित जवाहरलाल नेहरू लालबहादूर, शास्त्री, इंदिरा गांधी हे हिमालयाच्या उंचीचे नेते होते. ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले. परंतु असे अनेक मोठे नेते होते, ते पंतप्रधान पदापर्यंत पोहोचले नाहीत. तरी देखील त्यांची उंची कमी नव्हती, अशा शब्दांमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना राजकीय दृष्ट्या ठोकून काढले आहे. Y. B. Chavan, Sharad Pawar’s politcs of submission as against Morarji Desai and Narendra Modi’s politics of assertion
बरोबरच आहे हे… हे ठोकून काढत असताना राऊत यांनी हिमालय – सह्याद्री – टेकड्या अशा “उंचीच्या” उपमा वापरल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री यांना हिमालयाएवढ्या उंचीची माणसे, असे म्हटले आहे. याबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. पंडित नेहरू, शास्त्रीजी हे मोठेच नेते होते. त्यांना अखिल भारतीय पातळीवर अधिमान्यता होती. त्यांची लोकप्रियता अफाट होती आणि कर्तृत्व देखील मोठ्या उंचीचे होते यात कोणतीही शंका नाही. पण चीन विरोधातील युद्धामध्ये पंडित नेहरू यांच्याकडून हिमालयाएवढ्या चुका झाल्या हे देखील मान्य करावे लागेल. तेही बरोबरच आहे. “जितक्या उंचीचा माणूस तितक्या उंचीची चूक” हा निकष लावला तर पंडित नेहरू यांच्यासारख्या हिमालयाएवढ्या उंचीच्या नेत्याचा हिमालयाएवढ्या चुका झाल्या असतिल तर ते मान्य करण्याचे “छोट्या टेकड्यां”एवढे तरी धैर्य दाखवले पाहिजे ना…!!
असो… जे पंडित नेहरूंच्या बाबतीत तेच शास्त्रीजी आणि इंदिराजींच्या बाबतीत. त्यांचेही कर्तृत्व हिमालयाएवढे होते, यात शंका नाही. त्यांच्या चुकांना हिमालयाएवढ्या चुका म्हणता येणार नाहीत. त्यांच्या राजकीय कर्तृत्वाविषयी कोणाला शंका असणार नाही. बाकी आणीबाणी वगैरे गोष्टी होतच राहतात. त्यांना काही “चुका” म्हणता येणार नाही…!!
असो… पण पंडित नेहरूंनी जेव्हा हिमालयाएवढे चूक केली तेव्हा त्यांच्या मदतीला यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने सह्याद्री धावून गेला होता. दस्तुरखुद्द आचार्य अत्रे यांनी त्यांच्या मराठा वर्तमानपत्रांतून यशवंतरावांच्या अफाट राजकीय कर्तृत्वाला ही सह्याद्रीची उपमा दिली होती. यशवंतरावांनी सह्याद्री बनून देशाच्या संरक्षण मंत्रिपदावरून भारताचे संरक्षण केले. सैनिकांना प्रेरणा दिली. त्याचे परिणाम 1965 सालच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात दिसले. भारतीय सैन्याचे मनोधैर्य उंचावले असल्याने लालबहादूर शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली आणि यशवंतराव चव्हाण यांच्या संरक्षणमंत्री पदाच्या छायेखाली भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभूत केले. …पण त्यानंतरच्या ताश्कंद करारानंतर काय घडले? हा इतिहास आता हळूहळू बाहेर येऊ लागला आहे. ताश्कंदमध्ये देशाने हिमालयाच्या उंचीचा एक पंतप्रधान गमावला. तेव्हा “सह्याद्रीचे कर्तृत्व” काहीच का बोलले नाही?, हा प्रश्न आता विचारला गेला पाहिजे…!! त्यावेळी “सह्याद्रीला” “हिमालयाची उंची” गाठण्याची संधी होती. ती सह्याद्रीने घेतली नाही किंवा जमले नाही…!! हरकत नाही… हिमालयाची उंची गाठता आली नाही म्हणून सह्याद्रिची उंची कमी होत नाही. पण एकदा नव्हे, तर अनेकदा “सह्याद्रीला” हिमालयाला गवसणी घालण्याची संधी आली होती. पण तीही त्यावेळच्या सह्याद्रीने दवडली… हरकत नाही. म्हणून सह्याद्रिची उंची अजिबात कमी होत नाही…!!
पण त्याच सुमारास 1977 मध्ये गुजरात मधल्या एका माजी आयएएस अधिकाऱ्याने हिमालयाएवढ्या उंचीच्या इंदिरा गांधी यांना आव्हान देऊन पंतप्रधानपद काबीज करून दाखवले होते. त्यांचे नाव मोरारजी देसाई. मोरारजी यांच्याकडे ना सह्याद्रीचा वारसा होता, ना हिमालयाची उंची होती…!! तरी देखील त्यांनी हिमालयाच्या उंचीच्या इंदिराजींना पराभूत करून पंतप्रधानपद पटकावून दाखवले होते. इतकेच नाही तर त्यांनी अनेकदा “हिमालयाला” आव्हान देण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नात दोनदा अपयश आले म्हणून त्यांनी शरणागती पत्करली नव्हती, तर त्यांनी आव्हान स्वीकारून आणि हिमालयाएवढ्या उंचीचा इंदिराजींना आव्हान देऊन ते यशस्वी करून दाखविले होते…!! हे झाले “सह्याद्रीचे” आणि गुजरातच्या “सपाट प्रदेशतून” मोरारजी देसाईंचे…!!
यानंतर 1991 मध्ये “विद्यमान सह्याद्रीला” हिमालयावर चालून जाण्याची संधी आली होती. पण त्यावेळी तेलंगण मधल्या एका शेतकरी कुटुंबातल्या साध्या व्यक्तीने हिमालयाची उंची गाठून दाखवली आणि “विद्यमान सह्याद्री” दोनच वर्षात दिल्लीतून महाराष्ट्रात आले…!! महाराष्ट्रात जनतेने त्यांचा पराभव केला. त्यानंतर त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. पुन्हा एकदा 1999 मध्ये त्यांना संधी आली. पण ती संधी त्यांना घेता आली नाही. त्यावेळी परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीने “सह्याद्रीच्या कर्तृत्वाला” कोलदांडा घातला. हरकत नाही… परदेशी मूळ असलेल्या व्यक्तीमुळे सह्याद्रिची उंची कमी होत नाही…!!
सह्याद्री 2004 पर्यंत कायमच हिमालयाच्या उंचीच्या स्पर्धेत राहिला. पण 2004 मध्ये देखील “सह्याद्रीला” मागे ठेवण्यात आले. सह्याद्रीने हिमालयाशी तडजोड केली. महाराष्ट्रात अफाट कर्तृत्व गाजवून तीन टर्म सरकार आणले. यात महाराष्ट्रातल्या “हिमालयाच्या छायेतील टेकड्यां”बरोबर सह्याद्रीने जुळवून घेतले होते. विद्यमान सह्याद्रीने कायमच हिमालयाशी स्पर्धा करण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली होती पण हिमालयाने कायमच त्यावरून “रिक्षा फिरवली”…!! हरकत नाही… त्यामुळे सह्याद्रिची उंची कमी होत नाही…!!
आता तर काय महाराष्ट्रात फक्त “टेकाडेच” उरली आहेत. सह्याद्रिची उंची त्यांना गाठताच येणार नाही. पण या टेकड्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांना ना सह्याद्रिची उंची गाठायची आहे, ना हिमालयाशी स्पर्धा करायची आहे!!ना सह्याद्रिची उंची गाठायची आहे… त्यांना गुजरात मधल्या “सपाट प्रदेशच्या” छायेत राहून आपली राजकीय गुजराण करायची आहे…!!
गुजरात मधल्या दुसऱ्या “छोट्या व्यक्तीने” दिल्लीला आव्हान देऊन पंतप्रधानपद पटकावले. अर्थात त्या व्यक्तीची उंची हिमालयाएवढी नाहीच… फक्त फरक एवढा आहे, की गुजरात मधल्या “सपाट प्रदेशातून” आलेल्या एका चहावाल्या सामान्य व्यक्तीने दिल्लीत हिमालयाच्या उंचीचा वारसा सांगणाऱ्यांना टेकड्यांपेक्षाही कमी उंचीचे करून ठेवलेय…!!
हिमालयाखालच्या उंचीचे सह्याद्री मात्र अजून महाराष्ट्रातच आहेत…!! हरकत नाही. त्यामुळे देखील सह्याद्रिची उंची कमी होत नाहीच…!!