• Download App
    “WHO चीनच्या हातची बाहुली;” अमेरिकेने संबंध तोडले | The Focus India

    “WHO चीनच्या हातची बाहुली;” अमेरिकेने संबंध तोडले

    •  ट्रम्प यांची संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा
    •  निधीचा वापर इतर आरोग्य संघटनांसाठी करणार, ट्रम्प यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन : जागतिक आरोग्य संघटना WHO शी अमेरिकेने संबंध तोडून टाकले. जगभरात करोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत. या संकटाला चीन जबाबदार असल्याचा हल्लाबोल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचा आरोप करत डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

    “जागतिक आरोग्य संघटनेवर पूर्णत: चीनची पकड आहे. अशा परिस्थितीत अमेरिका त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध तोडत आहे,” असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. “सुरूवातीला जागतिक आरोग्य संघटना करोना व्हायरसचा प्रसार रोखण्यात अपयशी ठरली. वर्षाला केवळ ४० दशलक्ष डॉलर्सची मदत करूनही जागतिक आरोग्य संघटनेवर चीनचे वर्चस्व आहे, त्याच्या तुलनेत अमेरिकेकडून ४५० दशलक्ष डॉलर्सची मदत केली जात होती. परंतु संघटना आवश्यक त्या सुधारणा करण्यास अपयशी ठरली. त्यामुळे आम्ही सर्व संबंध तोडत आहोत,” असे ट्रम्प यांनी सांगितले. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात येणारा जो निधी थांबवण्यात आला आहे, तो जगातील अन्य आरोग्य संघटनांच्या मदतीसाठी वापरला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चीनच्या विरोधात घेतलेल्या निर्णयांचीही माहिती दिली.

    वुहान व्हायरसमुळे १ लाख जणांचा मृत्यू

    ट्रम्प यांनी पुन्हा एकदा या व्हायरसला वुहान व्हायरस असे संबोधले. “चीनने वुहान व्हायरसची माहिती लपवल्यामुळेच तो जगभरात पसरला. या व्हायरसमुळेच अमेरिकेतील १ लाखांपेक्षा अधिक लोकांचा मृत्य़ू झाला. तर जगभरातही लाखो लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे,” असे ट्रम्प म्हणाले.

    थांबवला होता WHO चा निधी

    ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता. जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समिक्षा केली जात नाही तोवर हा निधी थांबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. तसंच त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

    Related posts

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा

    भारत-पाक तणावात राफेल उत्पादक कंपनीचे शेअर्स वधारले; डसॉल्ट एव्हिएशनचे शेअर्स 2 आठवड्यांत 8% वाढले

    Operation sindoor : तुर्की ड्रोन ते नागरी विमानांची “ढाल”; भारताने प्रेस ब्रीफिंग मध्ये वाचली पाकिस्तानची पापे, पण वाचा जे सांगितले नाही ते!!