वृत्तसंस्था
वाराणसी – काशी विश्वनाथ मंदिर आणि ज्ञानवापी मशीद वादासंदर्भात वाराणसीमधील स्थानिक न्यायालयाने पुरातत्व खात्याला सर्वेक्षणाची परवानगी दिली आहे. काशी विश्वानाथ मंदिर परिसराला लागूनच असलेल्या ज्ञानवापी मशीदीच्या सर्वेक्षणाची परवानगी वारणासीमधील दिवाणी न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीशांनी दिली आहे. Varanasi Court gives a go-ahead for survey of Kashi Vishwanath Temple-Gyanvapi Mosque
वाराणसीमधील दिवाणी न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने ज्ञानवापी मशीदीची जागा मूळात हिंदूंची असल्याचा दावा केला आहे. मुघल बादशाह औरंगजेबने १६६४ साली २००० वर्षे जुन्या काशी विश्वनाथ मंदिराचा काही भाग पाडून त्या जागी ज्ञानवापी मशीद बांधली, असेही या याचिकाकर्त्याने म्हटले आहे. पुराण काळापासून येथे भगवान शंकराचे स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाला काशी विश्वेश्वर म्हणून ओळखले जाते. या भूमीवर मुसलमांनी आक्रमण करण्याच्या खूप आधीपासून हे मंदिर बांधण्यात आले होते. हे मंदिर राजा विक्रमादित्यने बांधल्याचे सांगितले जाते.
मुसलमान राज्यकर्त्यांनी धार्मिक आक्रमणात या मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद तयार करण्यात आल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. आता या ज्ञानवापी मशिदीचे पुरातत्व सर्वेक्षण करून या दाव्यातील तथ्य तपासण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाचा सगळा खर्च उत्तर प्रदेश सरकार करणार आहे.