विशेष प्रतिनिधी
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी रश्मी ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांनी हातावर शिवबंधन बांधले. यातून त्यांचा विधान परिषदेतील आमदारकीचा राज्यपाल नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी त्यांचा शिवसेना प्रवेश तेवढ्या आमदारकीपुरताच मर्यादित नाही, असे मानण्यास वाव आहे.
urmila matondkar news
त्याच बरोबर मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणूकांच्या दृष्टीने शिवसेनेसाठी ही राजकीय विस्ताराची पायाभरणी सुरू असल्याचेही मानण्यात येते आहे. शिवसेना – राष्ट्रवादी – काँग्रेस यांची महाविकास आघाडी पुढच्या निवडणूका एकत्र लढविणार असल्याचा घोषणा कितीही केल्या तरी त्यांच्यातील राजकीय खेचाखेच लपून राहिलेली नाही.
त्यातही महाविकास आघाडीतील सध्याचे राजकारण ठाकरे – पवार यांच्याभोवतीच केंद्रीत असल्याने त्यात काँग्रेसची तिय्यम भूमिका असल्याकडेही राजकीय निरीक्षक लक्ष वेधत आहेत. अशी अवस्था काँग्रेस नेत्यांनी स्वतःहून ओढवून घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण ते ठाकरे – पवार सरकारला दिलेल्या पाठिंब्याची पुरती राजकीय किंमत वसूल करत नाहीत. उलट राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी वाटपातही तिय्यम स्थान दिल्याचे स्पष्ट दिसते आहे.
urmila matondkar news
या राजकीय पार्श्वभूमीवर उर्मिला मातोंडकरांच्या शिवसेना प्रवेशाकडे पाहिले असता, मुंबईत काँग्रेस पक्ष फोडण्याचा तर शिवसेनेचा डाव नाही ना?, अशी शंका घ्यायला वाव आहे. त्यातही मुंबईत काँग्रेस नेत्यांनी महापालिका निवडणूक स्वतंत्रपण लढण्याचा सूर मोठा केला आहेच. हा मोठा सूरही एक प्रकारे शिवसेनेच्या राजकीय पथ्यावर पडला आहे. त्यांना आपला पक्ष बळकट करण्यासाठी काँग्रेसच्या रूपाने एक टार्गेट सापडले आहे.