जयंत विद्वांस
घर देता का घर ?
कुणी घर देता का घर ?
एकेका गरीब आमदाराला कुणी घर देता का ?
एकेक आमदार ईडीच्या नोटिशीतून, अनेक घरोब्यांपासून, जप्त झालेल्या घरावाचून, जवळच्या नातेवाईकांच्या जप्तीतून, सीबीआयच्या दयेवाचून मुंबईच्या जंगलात हिंडतोय.
जिथून कुणी अटक करणार नाही, ज्याची कधी चौकशी होणार नाही असं एक घर धुंडतय.
कुणी घर देता का घर ?
To apply or not to apply that is the question…
घ्यावं की न घ्यावं हा एकच सवाल आहे. ह्या मुंबईच्या मोक्याच्या जागेवर म्हाडाच्या घरात न राहता भाडेकरू ठेवून आपण आपल्या मालकीच्या सदनात जगाव बेशरम लाचार आनंदान ?
का विकून टाकावं कॅश पैसे घेऊन?
आणि मागावा नंतर अजून एक सगळ्यांच्या संमतीने?
माझा तुझा ह्याचा अन त्याचाही.
बहुमताच्या महासर्पाने आयुष्याला असा गोड डंख मारावा…
की नंतर येणा-या रकमेवर नसावा आयटी, ईडीचा पहारा कधीही..
पण मग..
पण मग त्या केंद्राला पुन्हा स्वप्न पडु लागलं तर….? तर…तर…
इथेच मेख आहे.नव्या फ्लॅट्सच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणुन आम्ही सहन करतो जुने फ्लॅट्स
सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणाने घरावर होणारे नोटिशींचे बलात्कार…
अस्तित्वाच्या गाभा-यात असणा-या सत्वाची विटंबना..
आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन उभे राहतो खालच्या मानेने आमच्याच फ्लॅटवाट्या लोकांच्या दाराशी.
केंद्रा.. तु इतका कठोर का झालास?
एका बाजुला आम्ही जे साठवलं त्यावर धाडी घातल्यास आणि आणि दुस-या बाजुला जे फुकट मिळतंय त्यावर ही लक्ष ठेवणार असशील तर मग आम्ही आमच्या खाखाई सुटलेले जबडे घेऊन हे करुणाकरा…
आम्ही गरिबांनी कोणाच्या घरात रहायचं? कोणाच्या घरात?
कोणाच्या ? कोणाच्या???
– (वि. वा. शिरवाडकर यांच्या लेखनावर आधारित)