माणसाच्या शरीराचे सामान्य तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट म्हणजेच ३७ अंश सेल्सिअस निश्चित करून आता सुमारे दोन शतके झाली आहेत. या तापमानापेक्षा जास्त तापमान झाले तर ताप आला असे समजले जाते. परंतु सुदृढ माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान कमी होत असल्याचे शास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. सुदृढ मानवाच्या शरीराचे सरासरी तापमान ९८.६ अंश फॅरेनहाइट असेल तर ते सामान्य तापमान असेल, असे जर्मनीतील डॉक्टर कार्ल वुंडरलिच यांनी सुमारे दोन शतकांपूर्वी सिद्ध केले होते. The temperature of the human body has started to decrease, changes are taking place after two hundred years
तेव्हापासून त्याच्या आधारेच जगभरातील डॉक्टर रुग्णांची तपासणी करत आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये मानवाचे सरासरी तापमान कमी झाले असल्याचे निरीक्षणांतून दिसून आले आहे. ब्रिटनमध्ये नुकतीच सुमारे ३५ हजार प्रौढांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर २०१९ मध्येही अशीच पाहणी अमेरिकेमध्ये करण्यात आली. ब्रिटनमधील पाहणीत शरीराचे सरासरी तापमान ९७.९ अंश फॅरेनहाइट तर अमेरिकेतील पाहणीत हेच तापमान ९७.५ अंश फॅरेनहाइटपर्यंत खाली आल्याचे नोंदविले गेले. बोलिव्हियातील चिमाने लोकांच्या शरीराचे सरासरी तापमान गेल्या १६ वर्षांत ०.०९ अंश फॅरेनहाइटने कमी होऊन ९७.७ अंश फॅरेनहाइट झाल्याचे त्यांचे निरीक्षण आहे. आपल्या आजूबाजूचे तापमान आणि वजन अशा गोष्टींचाही शारीरिक तापमानावर परिणाम होत असल्याचे संशोधकांचे निरीक्षण आहे.
शारीरिक तापमान कमी होण्याचे नेमके कारण अद्याप सांगणे शास्त्रज्ञांना शक्य झालेले नाही. परंतु गेल्या काही वर्षांपासून मानवाचे राहणीमान बदलले आहे. १९५०-६०च्या दशकापूर्वी जशी रोगराई पसरली जात असे, तशी आता पसरली जात नाही, रोगांचे योग्य वेळी निदान होणे व त्यावर औषधोपचार करणे शक्य झाले आहे, तसेच लसीकरण, चौरस आहार या सर्वांचा एकत्रित परिणाम शारीरिक तापमान कमी होण्यात झाला असू शकतो, असा एक सिद्धांत यासाठी मांडला जात आहे. माहितीचे विश्लेषण कोणत्याही पद्धतीने केले तरी सुदृढ व्यक्तीच्या शरीराचे सरासरी तापमान कमी झाल्याचे स्पष्ट आहे. परंतु, अमेरिका आणि बोलिव्हिया अशा दोन वेगळ्या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या शारीरिक तापमानात साधारण सारखाच बदल कसा दिसून आला, याचे विश्लेषण करण्याची गरज आहे, असे शास्त्रज्ञांचे मत केले.