विशेष प्रतिनिधी
पुणे :शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात पुणे पोलिसांनी अपात्र बोगस शिक्षक म्हणून ७,८८० जणांची यादी तयार केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पुणे पोलीस, सायबर विभाग टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्याचा तपास करत आहे. यात अनेकजणांना अटक केलेली असून, आता पैसे देऊन नोकरी मिळवणाऱ्या अपात्र उमेदवारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे.TET SCAM
पुणे साइबर विभागाच्या प्रमुख डीसीपी भाग्यश्री नवटक्के यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला बोलताना ही माहिती दिली.
परीक्षेत नापास झालेल्या उमेदवारांची नावं पैसे घेऊन पात्रता यादीत घुसवण्यात आल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं होतं.
या प्रकरणात पोलिसांनी मोठ्या अधिकाऱ्यांसह परीक्षा आयोजित करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही अटक केलेली आहे. आता पोलिसांनी ज्या उमेदवारांना पैसे घेऊन पात्र ठरवण्यात आलं आहे. त्यांची यादी तयार केली आहे. २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत ७,८८० बोगस शिक्षकांची भरती करण्यात आलेली असून, त्यांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. पुणे साइबर विभागाने ही यादी तयार केली असून, पुढील काही दिवसांत ती राज्य शिक्षण विभागाकडे सोपवली जाणार आहे.
त्यानंतर शिक्षण विभाग बोगस शिक्षकांपैकी किती जण कार्यरत आहे. त्यांची माहिती घेऊन चौकशी करणार असल्याचं समजतं. त्यामुळे अपात्र असतानाही गैरमार्गाचा अवलंब करून नोकरी मिळवणाऱ्या या शिक्षकांवर शिक्षण विभागाकडून कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती आहे.