वृत्तसंस्था
काबूल : काबूल शहर आणि परिसरात तालिबानचा सैनिकी मुकाबला करण्याची तयारी सुरुवातीला दाखविणाऱ्या अध्यक्ष अशरफ घनी सरकारने आता तालिबानपुढे शरणागती पत्करण्यास जमा असून तालिबानचे सैन्य काबूलमध्ये घुसले आहे. त्यांना प्रतिकार करण्यात येत नाही. तालिबानचे प्रतिनिधी काबूलमधील अध्यक्षीय प्रासादाकडे रवाना झाले असून सत्तांतराच्या वाटाघाटी ते करणार आहेत. Taliban negotiators are heading to Afghan presidential palace to prepare for a ‘transfer’ of power
अफगाणिस्तानमधील सत्तेतील सर्व महत्वाची पदे तालिबानने आपल्याकडे मागितली आहेत. अशरफ घनी सरकारमधील अंतर्गत सुरक्षा मंत्री अब्दुल सत्तार मिरजवाला यांनी शांततापूर्ण सत्तांतराची सरकारची तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तानमध्ये तालिबानची राजवट येणार असल्याचे पक्के झाले आहे.
काबूल मधून कोणत्याही नागरिकांनी पलायन करू नये. त्यांच्या जीवाला धोका नाही, असा दावा तालिबानच्या प्रवक्त्याने केला आहे. काबूलमधील कोणत्याही परदेशी दूतावास अथवा कार्यालयास तालिबान धक्का लावणार नाही. तालिबानच्या राजवटी त्यांना धोका पोहोचणार नाही, अशी ग्वाही देखील तालिबानच्या प्रतिनिधींनी दिली आहे.
अशरफ घनी यांच्या सरकारने शांततापूर्ण सत्तांतराची तयारी दाखवल्यानंतर तालिबानने काबूलवर हल्ला करायचा नाही, असा निर्णय घेतला होता. आता तालिबानचे प्रतिनिधी काबूलमध्ये सत्तांतराच्या तयारीसाठी तसेच चर्चेसाठी अध्यक्ष अशरफ घनी यांची भेट घेणार आहेत. काबूलमध्ये सुरुवातीस तालिबानच्या फौजांचा मुकाबला करण्याची तयारी सुरू होती. परंतु, तालिबानच्या फौजांचा जोर आणि सरकारी फौजांमध्ये असलेला आत्मविश्वासाचा अभाव त्यामुळे अशरफ घनी सरकारने तालिबानपुढे जवळजवळ शरणागती पत्करली याचे स्पष्ट झाले आहे.