शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सैनिक, महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनाने शिवसेनेचा एक चालता-बोलता इतिहास काळाच्या पडद्याआड गेला आहे.Sudhirbhau Joshi: Chief Minister in Balasaheb’s mind
शिवसेनेत सुधीरभाऊ म्हणून त्यांना ज्येष्ठत्वाचा मान होता. शिवसेनेच्या राजकीय वाटचालीतील अनेक चढ-उतार त्यांनी आपल्या आयुष्यात पाहिले. शिवसेनेचे मुंबईचे महापौर, आमदार, कार्यक्षम मंत्री या पलिकडे शिवसेनाप्रमुखांचे अत्यंत निष्ठावान सैनिक ही त्यांची खरी ओळख होती.
1995 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा तडाखेबंद प्रचारातून महाराष्ट्रात प्रथम शिवसेना-भाजपा युतीची सत्ता आली, तेव्हा सुधीरभाऊ जोशी यांच्याकडेच मुख्यमंत्रीपद सोपवायचे ही बाळासाहेबांच्या मनातली गोष्ट होती…!!
किंबहुना आज “महाराष्ट्रातल्या मनातले आम्ही मुख्यमंत्री”, आहोत असे अनेक नेते मानून चालत आहेत. अशी अनेक उदाहरणे आपल्याला महाराष्ट्रात – मराठवाड्यात सापडतील… पण सुधीरभाऊ जोशी हे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या मनातले मुख्यमंत्री होते…!! ही 1995 चे राजकिय वस्तुस्थिती होती. त्यासाठी त्यांना “मनातल्या मुख्यमंत्रीपदाचा” प्रचार करावा लागला नव्हता…!!
शिवसेनेचे बाळासाहेबांचे दुसरे निष्ठावंत नेते आणि पुण्यातले ज्येष्ठ नेते शशिकांतभाऊ सुतार यांनी या संदर्भात एक मोलाची आठवण सांगितली होती. युतीची सत्ता येणार हे पक्के झाल्यानंतर बाळासाहेबांनी निष्ठावंत शिवसैनिकांची बैठक बोलावली होती आणि त्यामध्ये सुधीरभाऊंच्या मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तबही झाले होते. सुधीरभाऊंच्या शपथविधीसाठी त्यांना जोधपुरी सुट शिवण्यात आला होता. परंतु आयत्या वेळेला “राजकीय कळ” फिरली आणि मुख्यमंत्रीपदाची माळ मनोहर जोशींच्या गळ्यात बाळासाहेबांना घालावे लागली…!!
त्या वेळच्या राजकीय चर्चेनुसार यामध्ये शरद पवारांचा हात होता. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस जरी पराभूत झाली होती
तरी युतीला पूर्ण बहुमत नव्हते. अपक्ष 45 आमदारांच्या पाठिंब्यावर युती राज्य करणार होती. शरद पवारांनी अपक्ष 45 आमदारांच्या मार्फत मुख्यमंत्री पदाचा निर्णय फिरवला, असे त्यावेळी बोलले गेले.
मात्र, त्यामुळे सुधीरभाऊंचे मुख्यमंत्रीपद जरी हुकले असले तरी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी सुधीरभाऊंना आपल्या मंत्रिमंडळात मानाचे स्थान दिले. सुरुवातीला त्यांनी त्यांच्याकडे महसूल खाते सोपवले आणि नंतर महाराष्ट्राच्या शिक्षणमंत्री पदाची जबाबदारी सोपवली. सुधीरभाऊ आणि मनोहरपंत हे मामा – भाचे. त्यामुळे राजकारणातले चढ-उतार देखील या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या जवळ राहून पाहिले.
सुधीरभाऊंच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य असे की मुख्यमंत्रीपद जरी हातातून निसटले तरी त्यांची बाळासाहेबांवरची निष्ठा कमी झाली नव्हती. किंवा शिवसेनेवर याची सुद्धा निष्ठा पातळ झाली नाही. आज “निष्ठा” या शब्दाची राजकीय क्षेत्रात जी वासलात लागली आहे, या पार्श्वभूमीवर सुधीरभाऊ जोशी यांच्यासारखा निष्ठावंत सैनिक उठून दिसायचा. शिवसेनेचा चालता-बोलता इतिहास त्यांच्या रूपाने आज आपल्यातून निघून गेला आहे…!!
Sudhirbhau Joshi: Chief Minister in Balasaheb’s mind
महत्त्वाच्या बातम्या
- मकाई साखर कारखान्याकडून विनापरवाना गाळप; साखर आयुक्तांनी ठोठावला पाच कोटींचा दंड
- येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर; नगरसुलला खंडेराव महाराज यात्रेनिमित्त बारा गाड्या ओढल्या
- ठाण्यात एकाच वेळी १ हजार नागरिकांचे आधारकार्ड बनणार; राज्यातील सर्वात मोठे आधार केंद्र साकारले