विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनमधून भारतात परतलेल्या नागरिकांबद्दल राज्यसभेत निवेदन दिले आहे. तसेच २२ हजार ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी भारतात वापसी केल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली आहे.STUDENTS RETURN FROM UKRAINE: More than 22,500 students return to India from Ukraine; Information of Foreign Ministers in Lok Sabha
आम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने चर्चा करत होतो. पण आमच्यासमोर नागरिकांना पूर्णपणे सुरक्षित ठेवणे हे आव्हान होते. त्यामुळे भारत सरकारकडून ऑपरेशन गंगाला सुरूवात करण्यात आली. ऐवढे मोठे ऑपरेशन अशा परिस्थितीत पार पाडणे कठीण असल्याचं एस जयशंकर यांनी सांगितलं आहे.
पंतप्रधानांच्या सुचनेनुसार, आम्ही ऑपरेशन गंगाला सुरूवात केली असून संघर्षाच्या परिस्थितीत सर्वात आव्हानात्मक कार्य पार पाडले आहे.
आमचे लोक युक्रेनमध्ये होते. ते स्वत: लष्करी आव्हानांना तोंड देत होते. ऑपरेशन गंगा अंतर्गत ९० उड्डाणे चालवण्यात आली आहेत. त्यापैकी ७६ नागरी उड्डाणे आणि १४ वायुसेनेची उड्डाणे आहेत.
रोमानिया, पोलंड, हंगेरी आणि स्लोव्हाकिया येथून विमाने भारतात आली. अर्ध्याहून अधिक विद्यार्थी पूर्व युक्रेनमधील विद्यापीठांमध्ये होते, जो भाग रशियाच्या सीमेवर आहे. यूक्रेनमधून ३५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले आहे, असे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर म्हणाले.
भारतीय दूतावासाने १५,२० आणि २२ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले होते. तरीदेखील मोठ्या संख्येने विद्यार्थी तेथून बाहेर पडतच नव्हते. त्यांच्या अभ्यासाची भिती त्यांना होती. जेव्हा परिस्थिती अधिकच बिघडली तेव्हा १८ हाजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी तिथे अडकले होते. ही बाब लक्षात घेऊन भारतासह युक्रेनमध्ये कॉल सेंटर सुरू करण्यात आले, अशी माहिती परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.