लातूरचे भाजप खासदार सुधाकर श्रृंगारे यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फुटी भव्य पुतळा उभा केला आहे. आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला त्याचे थाटामाटात उदघाटन झाले. महाराष्ट्रातील बाबासाहेबांचा सर्वाधिक मोठा पुतळा असे त्याचे वर्णन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचे स्मरण करणारा हा खास लेख सुधाकर श्रृंगारे यांनी लिहिला आहे… Special article by BJP MP Sudhakar Shringare on Dr Babasaheb Ambedkar
‘बाबासाहेब आंबेडकर’ या दहा अक्षरी मंत्रानं या देशातली माझ्यासारखी कोट्यवधी कुळं उद्धारली. माझ्यासारखीच का? ‘आसेतूहिमाचल’ अशा या खंडप्राय देशातल्या प्रत्येक भारतवासीयाच्या आयुष्यात याच दहा अक्षरी मंत्रानं क्रांती घडवली. होय. जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान डॉ. बाबासाहेबांनी दिलं आणि शेकडो जाती, धर्म, भाषा, प्रांत, पंथ, परंपरा यात विखुरलेला माझा देश एका सुत्रात बांधला गेला. डॉ. बाबासाहेबांचे हे उपकार हा देश आहे तोवर न फिटणारे आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानामुळं १३० कोटी भारतवासीयांच्या अधिकारात समानता आली पण त्यांच्या जगण्यात ती आली काय? हा प्रश्न आज विचारण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षं झाली तरी लाखो-करोडो लोकांना आजही वीजेची जोडणी, पिण्याचं पाणी, घर, वैद्यकीय सुविधा, शिक्षण आदी मुलभूत गोष्टींसाठी झगडावं लागतं आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे सच्चे पाईक आहेत. म्हणूनच त्यांनी समाजातल्या शेवटच्या माणसाच्या प्रगतीला प्राधान्य दिलं आहे.
“समाजातल्या मागास वर्गात, गरीब मातापित्यांच्या पोटी जन्माला आलेला माझ्यासारखा माणूस केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळंच या देशाचा पंतप्रधान बनू शकला,” अशी कृतज्ञता मोदीजी जाहीरपणे व्यक्त करतात. मा. बाबासाहेबांच्या मनातील सामाजिक लोकशाही भक्कम करण्यासाठीच मोदी सरकार अथक प्रयत्न करत आहे. राजकारणासाठी मा. बाबासाहेबांच्या नावाचा गैरवापर आजवर सातत्यानं केला गेला परंतु, मोदी सरकारनं गेल्या साडेसात-आठ वर्षात ज्या पद्धतीनं बाबासाहेबांप्रती आदर, अभिमान व्यक्त केला, त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न केला तसा आजवर कोणीही केलेला नाही.
दिल्लीत आज मोठ्या दिमाखात डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर उभं आहे. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहरावर यांच्या काळात ही संकल्पना मांडली गेली होती. त्याची पूर्तता होण्यासाठी २२ वर्षे लागली आणि त्यासाठी मोदी सरकार यावं लागलं. मा. बाबासाहेबांच्या आयुष्यातील पाच महत्वाच्या स्थळांना तीर्थस्थानाचा दर्जा देऊन ‘पंचतीर्थ’ म्हणून त्यांचा विकास करण्याचं यापूर्वी कोणाला सुचलं नव्हतं. मोदी सरकारनं ते केलं. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला. भविष्यात येणाऱ्या लाखो पिढ्यांना ही ‘पंचतीर्थं’ मा. बाबासाहेबांच्या विचारांची प्रेरणा देत राहतील, ही भूमिका त्यामागं आहे. पण नुसती स्मारकं उभारून मोदी सरकार थांबलेलं नाही. ‘रोटी कपडा और मकान’ या मुलभूत गरजांसह शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा माझ्या गोरगरीब, दलित जनतेला मिळाल्या पाहिजेत यासाठी मोदी सरकारनं अनेक योजना आणल्या आहेत.
‘आयुष्यमान भारत’सारखी महत्वाकांक्षी योजना घ्या. येत्या वर्षाखेरपर्यंत या योजनेअंतर्गत देशात दीड लाख आरोग्य केंद्रांची उभारणी पूर्ण होणार आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या दीनदलित, आदिवासी, गोरगरीबांना या केंद्रांमधून डायबेटीस, कॅन्सर सारख्या अनेक दुर्धर आजारांवर उपचार मिळणार आहेत. या योजनेतून गरिबांच्या कुटुंबांना पाच लाख रुपांपर्यंतचे विमा संरक्षण देण्यात आलं आहे. देशातल्या पन्नास कोटी लोकांना या योजनेत सामावून घेण्याचा संकल्प मोदी सरकारने सोडला आहे. देशभरच्या ११५ आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास जिल्ह्यांना या योजनेत प्राधान्यानं सामावून घेतलं जात आहे. ‘ग्राम स्वराज योजने’च्या माध्यमातून दलित, आदिवासी वस्त्या, गाव, पाडे या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शाळा, आरोग्य केंद्रं या सुविधा पोहोचवल्या जात आहेत.
व्यक्तिगत लाभाच्या योजना हे मोदी सरकारचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं आहे. मग ते रेशन कार्डच्या माध्यमातून दरमहा मिळणारं अन्नधान्य असेल किंवा उज्ज्वला गॅससारखी अनेक सरकारी अनुदानं. स्वतःचं घर, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मोदी सरकारनं या देशात पहिल्यांदा ‘पंतप्रधान आवास योजना’ आणून थेट बँक खात्यात अनुदानाचे अडीच-तीन लाख रुपये पोहोचवण्यास आणि अत्यल्प दरात गृहकर्ज देण्यास सुरुवात केली. गेल्या आठ वर्षात लाखो गरीब, मध्यमवर्गीय कुटुंबांनी या योजनेतून स्वतःची घरे बांधली आहेत. तीनदा या योजनेला मुदतवाढ देण्यात आली.
यंदाच्या अर्थसंकल्पात पीएम आवास योजनेंतर्गत देशात तब्बल ८० लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी ४८ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. मोदी सरकारनं सर्वात भर कशावर दिला असेल तर तो महिलांच्या आर्थिक उन्नतीवर आणि तरुण-तरुणींच्या शिक्षणावर. देशातलं दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण असो की थेट मेडिकल, इंजिनिअरींगचं किंवा परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं असो, यातलं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारनं थेट तुमच्या बँक खात्यात शिष्यवृत्ती पोहोचवणाऱ्या योजना आणल्या आहेत.
पूज्यनीय भारतरत्न बाबासाहेबांनी सांगितलं, “माझं आयुष्य तीन उपास्य दैवतांनी घडलं आहे. पहिले दैवत विद्या. दुसरे दैवत स्वाभिमान आणि तिसरे दैवत म्हणजे शील होय.” दर्जेदार शिक्षण, कौशल्यं आत्मसात केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. म्हणून तर मोदीजींच्या योजनांचा लाभ घेऊन आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.