वृत्तसंस्था
जोहान्सबर्ग:भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका (South Africa vs India Test Series) 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेपूर्वी बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. केएल राहुलची (KL Rahul) टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. South Africa vs India Test Series
रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात उपकर्णधारपदाची धुरा कोणाकडे सोपवणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे.
रोहित शर्माला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने तो आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकणार आहे. सध्या बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत NCA मध्ये रोहित शर्मा फिटनेसवर मेहनत घेत आहे. मागच्या आठवड्यात वनडे संघाच्या कर्णधारपदी रोहितची निवड करण्यात आली.
बीसीसीआयच्या (BCCI) एका सूत्राने एएनआयला सांगितले की “केएल राहुल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत उपकर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. यापूर्वी राहुलला मर्यादित षटकांचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे”.
उपकर्णधारपदासाठी बीसीसीआयसमोर अनेक पर्याय होते. वेगवेगळ्या नावांवरुन तर्क लढवले जात होते. पण अखेरीस लोकेश राहुलच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी अजिंक्य रहाणे बऱ्याच काळासाठी भारतीय संघाचा उपकर्णधार होता. पण मागच्या काही काळातील खराब कामगिरीमुळे अजिंक्यला उपकर्णधारपदावरुन हटवण्यात आलं.