विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक मतदासंघातील निकाल शीर्षकातल्या “इशाऱ्या” प्रमाणे लागले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवारांशी मैत्री राखून असणाऱ्या दोन जुन्या मित्र पक्षांसाठी हा इशारा आहे. यापैकी एकाची मैत्री वैयक्तिक आणि दुसऱ्याची मैत्री आहे, राजकीय… या मैत्रीचे पडसादच जणू निकालात पडले आहेत. पुण्याची “मोतीबाग”, नागपूरची “रेशीमबाग”, मुंबईची “मातोश्री” हरल्यात या तिघांच्या फाटाफुटीचा फायदा मधल्या मध्ये पुण्याच्या “मोदीबागे”ने घेतला आहे. shivsena rashtravadi congress news
भाजपला पवारांविषयी सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि शिवसेनेची सध्या पवारांच्या पक्षाशी राजकीय मैत्री आहे आणि विधान परिषद निवडणुकीत नेमके हेच दोन्ही पक्ष तोट्यात गेले आहेत. महाविकास आघाडीची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात पराभव, भगदाड या शब्दांत माध्यमांनी त्याचे वर्णन केले आहे, ते एका अर्थाने फसवे आहे. कारण महाविकास आघाडीचा फायदा फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेसला झाला आहे. शिवसेनेला नाही. शिवाय या निवडणूक निकालाचे लाँग टर्म परिणाम देखील त्या पलिकडचे आहेत. दीर्घकालीन आहेत.
पवारांशी कोणत्याही प्रकारची मैत्री लाँग टर्ममध्ये तोट्याची ठरते हा या निवडणुकीच्या निकालाने इशारा दिला आहे. या निवडणुकीचा सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला झाला. भाजपचा मोतीबाग अर्थात पुणे आणि रेशीमबाग नागपूर येथे पराभव झाला. मधल्यामध्ये राष्ट्रवादीने आपला विजय साकार करून घेतला. महाविकास आघाडीचा फायदा अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेला झाला नाही.
याचा अर्थ जुने मित्र भाजप आणि शिवसेना एकमेकांपासून बाजूला काढून पवारांनी स्वतःचा फायदा करून घेतला आहे, हे स्पष्ट आहे. किंबहुना त्याचीच ही झलक आहे. पुणे आणि नागपूरच्या जागा भाजप स्वतःच्या हक्काच्या समजत होते. तेथे त्यांना पराभव पत्करावा लागणे हे बुडत्याचा पाय आणखी खोलात जाण्याचे लक्षण आहे. शिवसेना काय किंवा भाजप काय यांनी हिंदुत्ववादी मतदारांचा बेस तयार होत असताना, अगदी प्रचलित परिभाषेत हिंदू वोट बँक तयार होत असताना आपापल्या वैयक्तिक अहंकारातून फारकत घेतली.
मतभेद तुटण्याइतपत ताणले. त्याचे हे परिणाम आहेत. आज ते ६ मतदारसंघांमध्ये दिसले आहेत. उद्या महाराष्ट्राच्या ६० मतदारसंघांमध्ये दिसल्याशिवाय राहणार नाहीत. पवारांसारख्या धुर्त नेत्याला नेमकी हीच अपेक्षा आहे. ती पवार स्वतःच्या राजकीय कर्तृत्त्वाने पूर्ण करून घेत नाहीएत, तर ती अपेक्षा शिवसेना आणि भाजप आपल्या राजकीय मतभेदाचे रूपांतर राजकीय वैमनस्यात करून पूर्ण करवून देत आहेत.
काल प्रकाशशिंग बादलांनी पद्मविभूषण किताब परत करून पंतप्रधान नरेंद्र मोदींशी वैयक्तिक मैत्रीची परतफेड केली. आता शरद पवार इकडे भाजप आणि शिवसेनेचा मतदार पाया अर्थात हिंदू वोट बँक फोडून मोदींनी बहाल केलेल्या “गुरूत्वा”ची परतफेड करत आहेत.