शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यात जरी महाराष्ट्र पातळीवर राजकीय कलगीतुरा रंगला असला तरी स्थानिक महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती या पातळीवर मात्र गावागावातल्या आणि महानगरांमध्ये शिवसैनिकांची झुंज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी होताना दिसत आहे. याचे कारण उघड आहे, 25 वर्षे दोन पक्षांमध्ये युती होती. ती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दृष्टीने जरी “सडलेली वर्षे” असली तरी शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या दृष्टीने मात्र एकमेकांना पूरक ठरलेलीच लढाई होती. कारण या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांचा सामायिक राजकीय शत्रू काँग्रेस आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस हेच होते.
अशा स्थितीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा मान मिळवण्यासाठी जरी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी काडीमोड घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी घरोबा केला असला तरी खालच्या स्तरावर स्थानिक पातळीवर मात्र शिवसैनिकांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी मनोमिलन झालेले नाही मनोमिलन तर सोडाच, कारण मनोमिलन हा शब्द सकारात्मक आहे. त्यापेक्षाही पलिकडे जाऊन शिवसैनिकांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी असलेला संघर्ष मिटलेला नाही तर उलट तो वाढलेला आहे.
या संघर्षाचे प्रत्यंतर आपल्याला मुंबई पट्टा, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येईल. रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये खऱ्या अर्थाने शिवसैनिकांची झुंज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी आहे. रायगड मध्ये तर शिवसेनेचे तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याविरुद्ध एकत्र आले आहे कोणत्याही स्थितीत आदिती तटकरे यांचे नेतृत्व उकडून लावायचे म्हणजे सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाला हादरा बसले ही त्यांची धारणा पक्की झाली आहे तर दुसरीकडे ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेच यांच्या मंत्रिमंडळातले दोन मंत्री एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड आमने-सामने आले आहे दोघांनाही ठाण्यावर आपले वर्चस्व दाखवून द्यायचे आहे.
ठाण्यावर सध्या एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व आहे. त्याच्या एखाद दुसऱ्या कोपऱ्यात जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व आहे. जितेंद्र आव्हाड यांना आपल्या वर्चस्वाचा विस्तार करायचा आहे. यासाठी त्यांची झुंज भाजपशी नाही, तर ती आहे एकनाथ शिंदे यांच्याशी. त्यामुळे हे दोन्ही नेते एकाच मंत्रिमंडळात राहू एकमेकांवर गुरकाताना दिसत आहेत. ठाण्यामध्ये राष्ट्रवादीला पायरोवा करूनच द्यायचा नाही हा “पण” एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांची तडफड होताना दिसते आहे. आणि ठाण्यात आम्हाला जर तुम्ही संधी देणार नसाल तर नवी मुंबई कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादी सहकार्य करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
या संघर्षाचा अर्थ असा की महाराष्ट्र पातळीवर शिवसेनेने भाजपच्या नेतृत्वाशी पंगा घेतला आहे स्थानिक पातळीवर मात्र शिवसैनिकांची झुंज ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी अधिक होताना दिसते आहे. याचा निकाल महापालिका निवडणुकीमध्ये लागेल.
एकाच वेळी दोन आघाड्यांवर शिवसेना कशी लढते लढाईच्या कसोटीवर कशी उतरते हे पाहणे इंटरेस्टिंग तर आहेच पण त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कौशल्याचीही ही कसोटी आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या कौशल्याची ही “लिटमस टेस्ट” ठरू शकते. राजकारण हा “रिस्क” घेण्याचा मोठा खेळ आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपशी काडीमोड घेऊन मुख्यमंत्रीपदाची “रिस्क” घेऊन ती अडीच वर्षे यशस्वी करून दाखविली आहेत. आता महापालिका निवडणुकीमध्ये जर ते यशस्वी झाले, तर राज्याच्या नेतृत्वावरील त्यांची मांड पक्की होईल. अन्यथा त्यांच्या नेतृत्वाला कायमची घर लागण्याची दाट शक्यता आहे आणि मग तिथे मात्र शिवसेनेची घसरण कोणाला रोखता येईल, असे वाटत नाही.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा नेमका तोच डाव आहे. तो डाव कसा उलटवायचा हे उद्धव ठाकरे यांच्या हातात आहे. यात यशस्वी झाले तर शिवसेनेसाठी तर सोन्याहून पिवळे ठरेल. अयशस्वी झाले तर मात्र फक्त उद्धव ठाकरे यांच्याच नाही तर आदित्य ठाकरे यांच्याही नेतृत्वावर सुरुवातीलाच प्रश्नचिन्ह लागलेले असेल…!!